ashadhi-wari-2024-shegaon: “जय गजानन श्री गजानन” जयघोषाने आसमंत निनादले; गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोर सक्रीय, 38 संशयित पोलिसांच्या ताब्यात




ठळक मुद्दा 

विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. आज शनिवार 15 जुन रोजी राज राजेश्वर नगरीत पोहचली. पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी आषाढी एकादशीसाठी गुरूवार 13 जुन रोजी संत नगरी शेगाव येथून पंढरपूरकडे निघाली. आज शनिवार 15 जुन रोजी टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी अकोला शहरात पोहचली. यावेळी हजारों भाविक डाबकी रोड परिसरात उपास्थित होते. याची देही याची डोळा हा पालखी सोहळा पाहताना भाविकांचा आनंद द्विगुणीत झाला हाेता.



संत गजानन महाराज संस्थेच्या दिंडीचे यंदा हे 55 वे वर्ष आहे. या दिंडीत 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरी सहभागी झाले आहेत. पुढील एक महिना पायी प्रवास करून 15 जुलैला पालखी पंढरपूर येथे पोहोचेल. त्यानंतर सर्व वारकरी पंढरपुरात आषाढी उत्सवात सहभागी होतील. 



आज सकाळी भौरदहून पालखी निघाली. डाबकी रोड जुने शहर येथे पालखी पोहचली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे स्वागत करून प्रसाद वाटप केला.भाविकांनी सुंदर रांगोळ्या काढून पालखी मार्ग सजविला होता. जुने शहरातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात पालखीने विश्राम घेतला. यावेळी मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयात वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. पालखी स्वागत समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी वारकरी सेवेकरी यांचे स्वागत केले. यावेळी गोपाल खंडेलवाल, डॉ. तारा हातवळणे, नाना कुळकर्णी, मधुर खंडेलवाल, किशोर मांगते पाटील, शशी चोपडे, अभय वानखडे, किशोर फुलकर आदी उपस्थित होते.




राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीची अकोलेकरांना दरवर्षी प्रतीक्षा असते.  राजेश्वर नगरीत (अकोला शहर) शनिवारी 15 आणि रविवार 16 जुन रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे. अवघ्या वारी दरम्यान सोलापूर आणि अकोला येथेच पालखीचा दोन दिवस मुक्काम राहणार आहे, हे विशेष.



शेगावमधून निघालेल्या पालखीचा सोहळा पाहण्यासाठी अकोलेकर मोठया संख्येने हजेरी लावतात. आज सायंकाळीं मुंगीलाल बजोरिया विद्यालय प्रांगणात पालखीचा रात्री मुक्काम राहणार असुन उद्या शहरातील गोरक्षण रोड, कौलखेड मार्गी शिवाजी टाऊन स्कूल येथे रात्रीचा मुक्काम राहणार आहे. तर परवा सकाळी वाडेगाव मार्गी पातूर कडे पालखी रवाना होणार आहे.





यंदा पालखीचे 55 वे वर्ष आहे. शेगाव ते पंढरपूर 33 दिवसांची पायी वारी करून करून वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेणार आहे. प्रवासात पालखी ठिकठिकाणी मुक्कामी राहणार आहे. ऊन पावसाची तमा न बाळगता आणि शेकडो किलोमीटरचे अंतर करून 15 जुलै रोजी पालखी श्रीक्षेत्र मंगळवेढावरून  विठुरायाच्या पंढरीत दाखल होणार आहे.


21 जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास




पंढरपूर येथे 17 जुलै रोजी आषाढी  सोहळा आटोपून पाच दिवसांच्या मुक्कामी राहणार आहे. नंतर 21 जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पुन्हा 22 दिवसांचा पायी परतीचा प्रवास करत श्रींच्या पालखीचे 11 ऑगस्ट रोजी स्वगृही शेगाव नगरीत आगमन होईल. 





डाबकी रोड परिसरातून 38 संशयितांना पोलीसांनी घेतले ताब्यात 


दरम्यान आज विदर्भाची पांढरी असलेल्या गजानन महाराजांची पालखी अकोल्यात दाखल झाली. पालखीचे दर्शन आणि स्वागत अकोल्यात मोठ्या उत्साहात केला जातो. याकरिता लाखो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. याच गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचे आभूषण लंपास काही चोरटे करत असतात. महाराजांची पालखीचे आज अकोला शहरातील डाबकी रोड येथे आगमन झाले. श्रींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा उचलून दागिने लंपास करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 38 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. या टोळीत महिला, पुरुष समवेत लहान मुलांचा देखील समावेश आहे.
















टिप्पण्या