- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
agricultural-university-akola: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यातील कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती-2024 च्या बैठकीचे उद्घाटन अकोल्यात उत्साहात संपन्न
विद्यापीठांना स्वयंपूर्ण होण्यासाठी संशोधन कार्याला अधिक बळ मिळावे - कुलगुरू डॉ. शरद गडाख
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाच्या तसेच जागतिक पीक उत्पादन तथा उत्पादकतेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेतीला बदलत्या परिस्थितीत कृषी क्षेत्रासमोरील अनेकानेक आव्हानांना सामोरे जाताना अधिक शाश्वत व शेतकरीभिमुख करण्याचे हेतूने महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आपल्या सर्वोत्कृष्ट उपलब्धींव्दारे शेतकरी बांधवांचे उत्थान साधण्यासाठी मोलाचं योगदान देत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीत सर्व आवश्यक घटकांचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी केले. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती-2024 च्या 52 व्या बैठकीचे उद्घाटन सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील कृषि शास्त्रज्ञ व संशोधक तसेच शासनाच्या कृषी संबंधित विविध तत्सम विभागांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या 52 व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या दिनांक 7 ते 9 जून 2024 दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या कृषी महाविद्यालयाच्या डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात आयोजित त्रिदिवसीय बैठकीचे उद्घाटनपर सत्र आज सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ. गडाख यांनी 'विद्यापीठातील संशोधन क्षेत्राला वन्य प्राण्यांमुळे होत असलेल्या उपद्रवाचा मुद्दा उपस्थित करून संपूर्ण संशोधन प्रक्षेत्रावर संरक्षित कुंपणाची निर्मिती करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच दर्जेदार बीजोत्पादनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांकरिता विद्यापीठांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनुदानाची गरज अधोरेखित करतानाच महाबीज सारख्या संस्थांनी विद्यापीठ निर्मित बियाण्यांच्या विक्रीतून आर्थिक संपन्नता साधली असल्याचे प्रतिपादन करून राज्यातील कृषी विद्यापीठांना संशोधित पीक वाणांचे स्वामित्व धन (रॉयल्टी) मिळाल्यास त्यांच्या आर्थिक स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच कृषी संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण व सर्वोच्च असलेली सदर बैठक यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या 'प्रभाव विश्लेषण' अभ्यासातून विद्यापीठाद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या मुख्य पिकांच्या सहा सुधारित वाण व एका यंत्रामुळे सुमारे रु.21000 कोटींचा महसूल प्राप्त झाल्याचा उल्लेख करून विद्यापीठासाठी सदर बाब आनंददायक व गौरवाची असल्याचे डॉ.गडाख यांनी प्रतिपादित केले.
याप्रसंगी राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे कुलगुरू डॉ . प्रशांत पाटील, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा, विधान परिषद सदस्य ॲड. किरण सरनाईक, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. रणधीर सावरकर, मोरेश्वर वानखेडे, विठ्ठल सरप पाटील, जनार्दन मोगल, डॉ. विजय माहोरकर, हेमलता अंधारे, कृषी सहसंचालक अमरावती विभाग किसनराव मुळे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. बेग, डॉ. शिंगारे, अधिष्ठाता (कृषी) डॉ. एस. एस. माने, डॉ. मोकळे, डॉ. खोडके, डॉ. बोडखे ,डॉ. हळदणकर महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर, कार्यकारी परिषद सदस्य विनायक काशीद इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी फलोत्पादन संचालक कैलास मोते , विधान परिषद सदस्य ॲड. किरण सरनाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर यांनी मागील वर्षातील उत्कृष्ट संशोधन पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित केली. त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी विभागाचे संशोधक डॉ. बकाने, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. राजेंद्र वाघ, डॉ . बाळासाहेब कोंकण कृषी विद्यापीठातील डॉ. विष्णू सावर्डीकर, मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञद्वय डॉ. मेहेत्रे व डॉ. स्मिता सोळंकी यांना त्यांच्या उत्कृष्ट संशोधन कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करून गौरविण्यात आले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांनी आपल्या संबोधनामध्ये सदर बैठक आगळ्यावेगळ्या स्वरूपाची व म्हणूनच अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन करून महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेद्वारे राज्यातील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सत्काराचा स्तुत्य उपक्रम राबवित असल्याबद्दल गौरवौद्गार काढून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीद्वारे शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती विशद केली. तसेच बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी संशोधनाची दिशा बदलावी लागणार असल्याचे प्रतिपादन करून भविष्यात कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा समर्थपणे सामना करावा लागण्याची गरज अधोरेखित केली. यास्तव, कृषी क्षेत्राच्या उर्जितावस्थेसाठी निश्चित करण्यात आलेल्या शाश्वत स्वरूपाच्या विकासात्मक 17 उद्देशांपैकी अकरा उद्देश कृषी क्षेत्राशी संबंधित असल्याचे सांगून यामुळे कृषी संशोधनाला चांगला वाव असल्याचे प्रतिपादन केले.
तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी आपल्या संबोधनामध्ये महाराष्ट्र राज्यातील कृषी संशोधनाची पद्धत वेगळ्या स्वरूपाची व एकमेवद्वितीय असल्यामुळे सदर संशोधनात्मक मॉडेलचे देशपातळीवर अनुकरण होण्याची गरज भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीद्वारे अधोरेखित करण्यात आल्याचे प्रतिपादन करून शेतकरी देवो भव: आणि शेतकरी बांधवांच्या कल्याणाचे कर्म सर्वश्रेष्ठ आहे असे भावपूर्ण उद्गार काढून शेतीमध्ये कमी पाण्यात, कमी खत मात्रेत व कमी खर्चात अपेक्षित उत्पादन देणाऱ्या विविध पिकांच्या जाती विकसित करण्यावर भर दिला. तसेच बियाणे पासून बियाणे या संकल्पनेनुसार यांत्रिकीकरण हा महत्त्वाचा घटक ठरत असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या वाढीव उत्पन्नासाठी व एकूणच ऊर्जितावस्थेसाठी विविध शेती पूरक व्यवसाय आणि कृषी, उद्यान विद्या व पशुधनाची सांगड घालणे क्रमप्राप्त ठरते असल्याचे प्रतिपादन केले.सोबतच शेतकऱ्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी जोखिम व्यवस्थापन आणि कृषी हवामानशास्त्र विभागाच्या माध्यमातून शेती शाश्वत होण्यावर व शेतकरी सक्षम करण्यावर भर दिला.
तसेच डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे यांनी आपल्या संबोधनांमध्ये गतकाळात झालेले कृषी संशोधन व भविष्यातील गरजेनुरूप करावयाच्या संशोधनाच्या रूपरेषेचा उहापोह होण्याची गरज अधोरेखित करून धान पीक आणि समृद्धी संदर्भात हातात हात घालून संशोधन होण्याची गरज प्रतिपादित केली. पुढे संबोधित करताना त्यांनी कृषी विस्तार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित तंत्रज्ञानाचे हस्तांतरण झाले पाहिजे तसेच नाविन्यपूर्ण शेतीमध्ये न्यूट्रिस्युटिकल बाबींचा विचार होणे काळाची गरज असल्याचे सांगून अति घनता आंबा लागवड तसेच अद्यपी न अभ्यासलेल्या इतर पिकांवर संशोधकांनी जोर देणे गरजेचे असण्यावर भर दिला.तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे नेमक्या स्वरूपाचे लाभदायक कृषी संशोधन होण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
बैठकीचे प्रास्ताविक करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी सदर बैठक डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आयोजित करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून सदर बैठकीच्या माध्यमातून कृषी संशोधनाला अंतिम मान्यता व मुर्त रूप देण्यात येत असल्याचे प्रतिपादन करून बैठकीत मान्यता प्राप्त झालेल्या शिफारसी शेतकरी बांधवांच्या उत्थानासाठी प्रसारित केल्या जातात असे प्रतिपादन केले.
बैठकीचा प्रारंभ महामानव डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस व्यासपीठावरील मान्यवरांद्वारे माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आला.
सदर महत्वपूर्ण बैठकीचे औचित्य साधून विद्यापीठांव्दारे ठळक विविध संशोधनात्मक उपलब्धींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
सदर संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या तीन दिवसीय बैठकीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील सुमारे 300 मान्यवर व शास्त्रज्ञ उपस्थित झाले आहेत.
या बैठकीमध्ये मान्यता प्राप्त झालेल्या शिफारसी पुढे शेतकरी बांधवांचा विकास आणि एकूणच उत्थानासाठी कृषी विभागामार्फत प्रसारित करण्यात येत असतात. तिनही दिवस महत्त्वपूर्ण अशा 12 गटातील कृषी संशोधनात्मक व संवादात्मक तांत्रिक सादरीकरणाचे सुटसुटीत आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर ऋणनिर्देश डॉ. हरिहर कौसडी कर संचालक संशोधन, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा