seed-technology-research center: पंदेकृविच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्र राष्ट्रीय पातळीवर ठरले अव्वल




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: भारतीय कृषि अनुसंधान केंद्र (आईसीएआर) अंतर्गत भारतीय बीज विज्ञान संस्थान द्वारे संचालित अखिल भारतीय समन्वित अनुसंधान परियोजना AICRP (बियाणे) ही देशातील सर्वाधिक व्याप्ती असणारी AICRP असून, या संस्थेअंतर्गत 65 गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादन केंद्र आणि 24 बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्र समाविष्ट आहेत. या सर्वच केंद्राच्या कृषि विज्ञान विद्यापीठ, बेंगलोर येथे 1-2 मे दरम्यान आयोजित 39 व्या वार्षिक सभे दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्राला देशपातळीवरील संशोधन कामगिरी करिता उत्कृष्ठ केंद्र म्हणून पुरस्कृत करण्यात आले. केवळ विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी ही अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.



भाकृअनुप, नवी दिल्लीच्या पीक विज्ञान विभागाचे उप-महानिदेशक डॉ. तिलकराज शर्मा यांचे हस्ते अकोला कृषि विद्यापीठाच्या संशोधन उपसंचालक (बियाणे) डॉ. आम्रपाली आखरे व त्यांची चमू बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव मते, डॉ. गजानन लांडे,  अभिलाषा खारकर यांनी पुरस्कार स्वीकारला. भाकृअनुपचे सहायक महानिदेशक (बियाणे) डॉ. डी. के. यादव, भारतीय बीज विज्ञान संस्थानचे संचालक डॉ. संजय कुमार व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. 





संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्रामार्फत बियाणे संबंधीत 50 पेक्षा अधिक तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांनकरिता देण्यात आल्या असून तंत्रज्ञान विस्ताराबाबत हे केंद्र सतत अग्रेसर आहे. 



आदिवासी बहुल मेळघाटातील शेतकऱ्यांच्या सामाजिक-आर्थिक  सक्षमीकरणासाठी अभिनव उपक्रम या केंद्राद्वारे राबविले जातात. बियाणे प्रमाणीकरण, बियाणे शरीरक्रियाशास्त्र, बियाणे कीटकशास्त्र व बियाणे प्रक्रिया या चार विषयात संशोधनाचं काम केले जाते.  



कुलगुरू डॉ शरद गडाख यांच्या नेतृत्वात विद्यापीठाने बियाणे तंत्रज्ञान संशोधन बरोबरच गुणवत्तापूर्ण पैदास्कार बियाणे उत्पादनात भरारी घेतली असून, वर्ष 2023-24 दरम्यान 18,000 क्विंटल बियाणे उत्पादन घेतले आहे. विद्यापीठाद्वारा प्रसारित विविध उत्कृष्ठ पीकवाणांचे गुणवत्तापूर्ण बियाणे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याकरिता महाबीज, शेतकरी उत्पादक संघ, राष्ट्रीय बीज निगम,  कृभको आदी संस्थांना मोठ्या प्रमाणात पैदासकार बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 





विद्यापीठाने बियाणे संशोधन तसेच उत्पादन या दोन्ही बाबींमध्ये उत्कृष्ट कामगीरी करत आघाडी घेतली असून, हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार बियाणे विभागातील सर्व चमूने केलेल्या उत्कृष्ट कार्याची पावतीच आहे. किफायतशीर शेतीकरिता बियाणे हे सर्वात महत्त्वाची कृषी निविष्ठा आहे. या वर्षी गुणवत्तापूर्ण पैदासकार बियाणे निर्मितीत महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठात डॉ. पंदेकृवि अकोला हे अग्रस्थानी आहे. विद्यापीठ द्वारा संशोधित सर्व तंत्रज्ञान हे प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्याकरिता शेतकरी शास्त्रज्ञ मंचांची स्थापना करण्यात आली असून त्या मार्फत अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचविण्यात येत आहे.


डॉ. शरद गडाख 

कुलगुरू 

डॉ. पं दे कृ वि, अकोला.




या पुरस्काराने विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.  तसेच सदर विभागाची बियाणे चाचणी प्रयोगशाळा ही महाराष्ट्र राज्य अधिसूचित असून तिचे बळकटीकरण करण्याकरीता राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रकल्प देखील मंजूर करण्यात आला आहे.


डॉ. विलास खर्चे 

संशोधन संचालक 

डॉ. पं दे कृ वि, अकोला.

टिप्पण्या