raid-illegal-moneylenders-akl: अवैध सावकारीवर चाप बसविण्यासाठी एकाच वेळी तीन ठिकाणी धाडी;जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची कारवाई




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  शहरात अवैध सावकारीवर चाप बसविण्यासाठी एकाच वेळी तीन ठिकाणी धाडी टाकून जिल्हा उप निबंधक कार्यालयाने एकच खळबळ निर्माण केली आहे.


शहरातील काही अवैध सावकार अवैधरीत्या सावकारी करित असल्याबाबतच्या प्राप्त तक्रारीनुसार अकोला शहरात आज तिन ठिकाणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2024 चे कलम 16 अंतर्गत धाडीचे डॉ. प्रविण लोखंडे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांच्या मार्गदर्शनात धाडी टाकण्यात आल्या..

अकोला शहरातील अकोट फैल, गड्डम प्लॉट व अंबिका नगर, मलकापूर या तीन ठिकाणी एकूण तिन पथकाव्दारे शोध मोहिम आयोजित करण्यात आली. 



सहकार विभागाचे अधिकारी पथक प्रमुख रोहीणी विटणकर, योगेश लोटे,  दीपक शिरसाट तसेच  धाड कार्यवाहीमध्ये फिरते पथक प्रमुख ज्योती मलिये, उपनिबंधक, सहकारी संस्था, तालुका अकोला तसेच सहाय्यक अनिल मनवर व गणेश भारस्कर यांचा समावेश होता. पथकाव्दारे एकूण 18 कर्मचा-याकडून आज धाड टाकण्यात आली. 



या धाडी दरम्यान आक्षेपार्ह खरेदीखत 02, करारनामा 05, कोरे बाँड 09, कोरे धनादेश 34, बँक पासबुक 01, नोंदी असलेल्या डायरी 10, सातबारा 01, फेरफार 01, एटीएम कार्ड 01, कच्च्या चिट्ठी 20 इत्यादी जप्त करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त पोलीस विभाग अकोला यांचेकडून घेण्यात आला. धाडीमधील जप्त दस्तऐवजांची पडताळणी तसेच प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.


सदर प्रकरणी पथक सहायक म्हणून जे. एस. सहारे,  एस. ए. गावंडे,  आर. पी. भोयर,  आर. आर. घोडके,  डी. डी. गोपनारायण,  विनोद खंदारे, आर. एम. बोंद्रे,  एस. एम. वानखडे,  एस. डी. नरवाडे, एम. आर. सोनुलकर, आनंद शिरसाट,  सविता राऊत आदी अधिकारी कर्मचारी धाड कार्यवाहीमध्ये सहभागी होते. कार्यवाहीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी, मत्स्य विभाग, जिल्हा सैनिक कार्यालय, पंच म्हणून तसेच पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग होता.


अकोला जिल्हयात सावकारीचा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तीकडून व्याजाने पैसे दिले जात असल्यास अशा व्यक्तीची तक्रार आवश्यक पुराव्यासह आपल्या तालुक्याच्या उपनिबंधक  सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करावा. तसेच ज्या नागरीकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी नोंदणीकृत पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था किंवा परवानाधारक सावकार यांचेकडून रितसर कर्ज घ्यावे असे आवाहन डॉ. प्रविण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांनी केले.

टिप्पण्या