- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
pre-kharif-agricultural-fair-akl: कृषी विद्यापीठामध्ये खरीप पूर्व कृषी मेळावा उत्साहात संपन्न; बियाणे खरेदीसाठी शेतकरी बांधवांचा उदंड प्रतिसाद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
विद्यापीठ निर्मित पीक वाण व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून अधिक उत्पादकता शक्य - कुलगुरू डॉ. शरद गडाख
शेतकरी वर्गाचे शाश्वत आर्थिक संपन्नते साठी कृषि विद्यापीठेचं खरे मार्गदर्शक - सीईओ बी. वैष्णवी
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शेतकरी खरीपपूर्व आढावा मेळावा आज सकाळी पार पडला. या मेळाव्यात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. खरीप पिकांचं नियोजन, लागवड पद्धती, बियाणे, खते आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यावेळी विद्यापीठाचं तब्बल दोन लाखांचं बियाणंही शेतकऱ्यांनी विकत घेतलं. सुमारे एकराशे साठ शेतकरी बांधवांनी विद्यापीठ संशोधित नवीन पीक वाण बियाणे खरेदीसाठी अभूतपूर्व प्रतिसाद देत विद्यापीठावरील आपला विश्वास अधोरेखित केला.
खरीपपूर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करिता अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीप मेळाव्याच्या आयोजन करण्यात आलं होत. सध्या शेतकऱ्यांना खरीपाचे वेध लागले आहेत. खरीपात घ्यावयाची पिकं, त्यांचं बियाणं, लागवड पद्धती आणि या सर्व गोष्टींच्या नियोजना सोबतच इतरही प्रश्न शेतकऱ्यांना पडत असतात. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी दरवर्षी अकोल्याचं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतं. विद्यापीठ दरवर्षी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप पूर्व आढावा मेळाव्याचं आयोजन करीत असतं. आजच्या या मेळाव्याला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. नवीन पिक पद्धती, बियाणे, लागवड, तंत्रज्ञान, पिकांवरील रोग नियंत्रण आदी विषय संदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तर्फे मंगळवार 21 मे रोजी सकाळी 10 वाजता खरीपपूर्व कृषी मेळावा आयोजित केला होता. कृषी महाविद्यालय, अकोलाच्या के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित या मेळाव्यामध्ये येत्या खरीप हंगामातील संभाव्य पाऊसमान, विविध पिकांच्या जाती, नवीन संशोधित पीक पद्धती, आंतरपीक पद्धती, मृदा व जलसंधारण व्यवस्थापन, एकीकृत कीड व रोग व्यवस्थापन, सुधारित यंत्र व अवजारे इत्यादी बाबत शेतकरी बंधूंना विविध विषय तज्ञांमार्फत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच याप्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांचे शेतीविषयक प्रश्नांचे शंका समाधान देखील विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी केले. या मेळाव्याचे निमित्ताने विद्यापीठ निर्मित व उपलब्ध बी- बियाणे, जैविक खते, विद्यापीठ प्रकाशने इत्यादी कृषी निविष्ठा शेतकरी बांधवांकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या.
पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतरपिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्चितच फायदेशीर ठरत असून आज व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबतांना शेतकरी उत्पादक कंपन्याचे सक्षमीकरण काळाची गरज असल्याचे स्पष्ट करतांना विद्यापीठ निर्मित पीक वाण व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून अधिक उत्पादकता शक्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. विस्तार शिक्षण संचालनालय द्वारे आयोजित खरीप पूर्व शेतकरी मेळाव्याचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
विदर्भात बहुतांश भागात सिंचनाची अल्प क्षमता असून कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेतील घट, पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीतून पिकांकरिता आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्यांची जेमतेम उपलब्धता आदींचा पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होत असून मागील पन्नास वर्षांचा सरासरी पर्जन्यमानाचा आढावा घेता पाऊसमान कमी झाले नसल्याचे सांगतानाच पाऊस पडण्याच्या तीव्रतेमध्ये आणि दिवसमानांमध्ये फरक झाला असून यंदा 106 टक्के पाऊस मानाचे भाकीत आशादायी असल्याचे सांगताना कपाशी व सोयाबीन पिकासोबत योग्य आंतरपीकाची लागवड करून पावसाच्या लहरीपण मुळे होणारे नुकसान टाळता येणे शक्य असल्याचे डॉ. गडाख यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
तसेच एकात्मिक शेती पद्धती कालसुसंगत असून शाश्वत शेतीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकांची निवड, पिकांची फेरपालट, शेण, गोमूत्र, दुधासह शेतकामासाठी पशुधन आणि परिवारातील सदस्यांचे योगदान काळाची गरज असल्याचे प्रतिपादन देखील डॉ. गडाख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात सांगितले.
नुकतेच विद्यापीठाने गांडूळ खत निर्यात करून गोपालक शेतकरी वर्गाला एका अभिनव व्यवसायाकडे अग्रेसीत केल्याचे देखील डॉ. गडाख यांनी सांगितले.
याप्रसंगी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी,
महाबीजचे गुण नियंत्रण व संशोधन विभागाचे महाव्यवस्थापक संचालक प्रफुल्ल लहाने, शेतकरी प्रतिनिधी गणेश नानोटे, विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तर माजी अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे, डॉ. शैलेश हरणे, प्रगतिशील शेतकरी जामदार काका, महादेवराव भुईभार, श्रीकृष्ण ठोंबरे, दिलीप फुके, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य शेतकरी, मॉडेल व्हिलेज मधील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्याचे सदस्य शेतकरी यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी आपल्या अतिशय संक्षिप्त मात्र तितक्याच अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाचा, तंत्रज्ञानाचा व पिक वाणांचा अवलंब करावा असे सांगतानाच गाव पातळीवर प्रक्रिया उद्योगाचे जाळे निर्माण करण्याची गरज देखील बी. वैष्णवी यांनी अधोरेखित केले व शेतकरी वर्गाचे शाश्वत आर्थिक संपन्नते साठी कृषि विद्यापीठेचं खरे मार्गदर्शक असल्याचे गौरवपूर्ण उदगार देखील बी. वैष्णवी यांनी याप्रसंगी काढले.
याप्रसंगी बोलताना महाबीजचे महाव्यवस्थापक प्रफुल्ल लहाने यांनी शेतकरी शेतकरी बांधवांना पेरण्याची घाई न करण्याचा अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला व पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासा व बीज प्रक्रिया करूनच बियाण्याची पेरणी करण्याचे आवाहन केले पट्टा पद्धतीचा वापर अधिक फलदायी असल्याचे सांगताना पद्धतीचा प्रभावी अवलंब करण्याचे आवाहन देखील प्रफुल्ल लहाने यांनी याप्रसंगी केले व महाबीजकडे सर्वच प्रकारच्या बियाणांची योग्य प्रमाणात उपलब्धता असल्याचे शेतकरी बांधवांना आश्वस्त केले.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने शेतकरी बांधवांच्या पिकांसंबंधीच्या समस्यांवर सांगोपांग चर्चा होऊन निराकरण होत असल्याचे म्हटले. कृषी विद्यापीठाची कृषी संवादिनी शेतकऱ्यांकरिता ग्रामगीता असल्याचे सांगून विद्यापीठाच्या या प्रकाशनामध्ये सर्व पिकांच्या लागवड तंत्राविषयीची अद्यायावत माहिती प्रकाशित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या विविध पिकांवरील किडी व रोगांचे आक्रमण लक्षात घेता शेतकऱ्यांनी सावध राहायला हवे. त्याचप्रमाणे वेळीच शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रगतिशील शेतकरी गणेश नानोटे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आमच्या करिता मार्गदर्शकाचे चे काम करत असल्याचे सांगत कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात शेतकरी शास्त्रज्ञ मंच, मॉडेल व्हिलेज तथा बियाणे विक्रीसाठी सेल काउंटर आम्हा शेतकऱ्यां साठी लाभदायक ठरत असून शेतकऱ्यांच्या ज्ञानाची भूक शमवीण्याकरिता विद्यापीठाकडे आधुनिक कृषी तंत्राची भक्कम शिदोरी उपलब्ध असल्याचे नमूद करून रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवर पिकांना सेंद्रिय खत देणे हा एक उत्तम तोडगा असल्याचे म्हटले. यावेळी शेतीमध्ये ते प्रयोग करीत असलेल्या काही स्वनिर्मिती कृषी तंत्रांचा त्यांनी ऊहापोह केला.
तांत्रिक सत्रामध्ये कृषी विद्यापीठातील डॉ. करुणाकर यांनी 'हवामानाचा आढावा व या वर्षीच्या मान्सून चा अंदाज' याविषयी डॉ. अजय सदावर्ते यांनी 'कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व रसशोषक किडींचे व्यवस्थापन' या विषयावर तर डॉ. सतिश निचळ यांनी 'सोयाबीनचे लागवड तंत्र' या विषयांवर तांत्रिक सादरीकरण केले. डॉ. सुरेंद्र देशमुख यांनी 'कापूस लागवड तंत्रज्ञान', डॉ. संजय भोयर यांनी 'जमिनीचे आरोग्य व पिकाची उत्पादकता', डॉ सुहास लांडे यांनी 'डाळवर्गीय पिकांची लागवड', तर डॉ. राजु घावडे यांनी खरीप पिकांमधील रोगाचे नियंत्रण यावर सादरीकरण केले यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन शंका निरसन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजीव कुमार सलामे यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार कृषी विद्यावेत्ता प्रकाश घाटोळ यांनी केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा