- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अमरवेल हे कंदमुळे वर्गातील, पर्णहीन पिवळसर रंगाचे तण आहे. तणाच्या सुमारे १७० प्रजाती आहेत. हे तण पूर्ण परोपजीवी असून, व्दिदल तणांवर वनस्पतींवर अवलंबून राहते. परोपजिवी असल्यामुळे व्दिदल पिकासोबत व्दिदल तणावर (तरोटा,रेशिमकाटा, गोखुरू, हजारदानी, बावची इ.) देखील स्वतःचे जीवनचक्र पूर्ण करते.
सद्यःस्थितीत विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या तणाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. मिरची, मूग, उडीद, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येतो.
दरवर्षी सोयाबीन पिकाखालील लागवड क्षेत्रात झपाटयाने वाढ होत आहे. सोयाबीन पिकातील विविध तणांच्या व्यवस्थापनासाठी तणनाशकांचा वापर प्रभावी ठरत आहे. मात्र तरीही मागील काही वर्षात अमरवेल किंवा अधरवेल या परोपजिवी तणाचा प्रादुर्भाव व्दिदलवर्गीय पिकांवर मोठया प्रमाणात वाढत आहे. बाल्यावस्थेत हा वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर चिटकतो व जमिनीपासून वेगळा होतो. त्यानंतर सुक्ष्म दातासारख्या तंतूच्या मदतीने त्या वनस्पतीमधील अन्नरस शोषून घेतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त वनस्पतीची वाढ खुंटत जाते. परीणामी उत्पादनात मोठी घट येते.
ओळख
अमरवेलाचे बी २० वर्षांहून जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकते. त्यामुळे बिजोत्पादन अवस्थेपूर्वी त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
या तणांच्या बीला उगवणीसाठी अनुकूल १५ ते ३८ अंश सेल्सियस तापमान मिळताच त्याची उगवण होते.
बी आकाराने १.० ते १.५ सें.मी. इतके असते. वेल पूर्णतः मुळरहित असून पिवळसर, नारिंगी व पानेरहित दो-यासारखा दिसतो.
मुख्यतः त्याच्या उगवण स्थानापासून २.५ ते ५.० सें.मी. दुरवरील व्दिदल वनस्पतीवर चिकटतो. परंतू परीसरात व्दिदल वनस्पती नसली तरी त्याचे रोप ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहु शकत नाही.
एक अमरवेल प्रतीदिन साधारण ७ सेंमीपर्यंत वाढून जवळपास ३ चै.मी. क्षेत्र व्यापतो.
साधारणतः ६० व्या दिवसापासून वेलाला बी लागण्याची क्रिया सुरू होते.
या तणांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे १०० टक्के देखील नुकसान होऊ शकते. मुग व उडीद ३१-३४ टक्के, टोमॅटो ७२ टक्के, हरभरा ८५.७ टक्के व मिरची पिकामध्ये ६० ते ६५ टक्के उत्पादनात घट आढळून आली आहे.
व्यवस्थापन
अमरवेल या तणाच्या प्रभवी व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त भागात सामुहिकरीत्या एकात्मिक व्यवस्थापन पध्दतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक, निवारणात्मक उपाय तसेच रासायनीक पध्दतीचा वापर फायदेशीर ठरतो.
प्रतिबंधात्मक उपाय
पेरणीसाठी प्रमाणित किंवा तणविरहित बियाण्यांचा वापर करावा.
पूर्ण कुजलेल्या शेण खताचा वापर करावा.
विशेषतः शेताच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतातील अमरवेल तण काढून गाडून अथवा जाळून नष्ट करावे. कारण झाडापासून वेगळा केलेला अमरवेल अनेक आठवडे जिवंत राहतो.
प्रादुर्भावग्रस्त शेतातील अवजारे स्वच्छ करूनच त्याचा पुन्हा वापर करावा.
निवारणात्मक उपाय
मशागतीय पध्दत
जमिनीची खोल नांगरणी करावी, बियांच्या अंकुराची लांबी कमी असल्याने ८ सें.मी. पलीकडे अमरवेलीची उगवण होत नाही.
जांभूळवाही देऊन उगवण अवस्थेतील तण नष्ट करावे. नियमित डवरणी व निंदनी करून पीक तणविरहीत ठेवावे.
पिकांची फेरपालट करावी. प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये तृणवर्गीय पिकांची लागवड करावी.
अमरवेल ८-१० दिवसांपेक्षा जास्त काळ यजमान झाडाशीवाय जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे यजमान पिकांची लागवड तणनियंत्रण पध्दतींचा अवलंब केल्यानंतर ८-१० दिवसांनी करावी.
रासायनिक व्यवस्थापन
सोयाबीन, भुईमुग, कपाशी, तूर, कांदा, मिरची या पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक, पेंन्डिमिथॅलीन (३८.७ टक्के सी.एस.) ३० ते ३५ मि.ली. प्रती १०लिटर पाणी (एकरी ७०० मि.ली. प्रती २०० लिटर पाणी) याप्रमाणे पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी फवारणी करावी.
व्ही. व्ही. गौड
सहाय्यक प्राध्यापक
अखिल भारतीय तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प,
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,
अकोला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा