- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
farmer-cotton-seeds-akola-dist : शेतक-यांनी कपाशीच्या एकाच वाणाचा आग्रह धरू नये ; जिल्हा प्रशासन व कृषी शास्त्रज्ञांचे आवाहन, साठेबाजी रोखण्यासाठी भरारी पथके निर्माण
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला, दि. 29 : शेतकरी बांधवांनी कपाशीच्या विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध त्याच दर्जाच्या इतर पर्यायी वाणांची निवड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार, कृषी विभाग यांच्याबरोबरच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केले आहे.
खरीप हंगामासाठी कपाशीच्या एकाच कंपनीच्या वाणाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे सदर कंपनीचे बीजोत्पादन कमी झाल्याने पुरवठ्यावर मर्यादा असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. त्याच दर्जाचे इतर समतुल्य वाणही बाजारात उपलब्ध असून त्यांची निवड करण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांसमवेत कृषी शास्त्रज्ञांनी केले आहे.
कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. व्ही. कायंदे म्हणाले की, ठराविक वाणाची मागणी होत आहे. तथापि, त्याच दर्जाचे व चांगले उत्पादन मिळवून देणारे अनेक वाण बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे कपाशीच्या ठराविक वाणांचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध समतुल्य वाण घेऊन कपाशीची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात कपाशीच्या इतर वाणांचा मुबलक साठा उपलब्ध असून, शेतकरी बांधवांनी त्याची निवड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे व कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी केले आहे.
कृषी निविष्ठांची साठेबाजी रोखण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके
जिल्हाधिका-यांकडून आदेश निर्गमित
कपाशीच्या विशिष्ट बियाण्याची मागणी व पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई व साठेबाजीला आळा घालण्यासाठी आता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके निर्माण करण्यात आली असून, ठिकठिकाणी होणा-या विक्री व्यवहारांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.
या पथकांनी जिल्ह्यात विक्री केंद्रांची काटेकोर तपासणी करून कुठेही जादा दराने विक्री व साठवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. तपासणीत कुठेही हयगय होता कामा नये, तसेच कुठेही अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.
कृषी विभागातर्फे खरीप निविष्ठांच्या संनियंत्रणासाठी यापूर्वीच पथके स्थापन केली आहेत. तथापि, कपाशी बियाण्याच्या ठराविक वाणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पथके गठित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी मंगळवारी (28 मे) याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे. या पथकांद्वारे कृषी निविष्ठांच्या विक्रीवर काटेकोर नजर ठेवण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी, वजन मापे निरीक्षक व पं. स. कृषी अधिकारी यांचा पथकात समावेश आहे. पथकांकडून जिल्हाभरात तत्काळ तपासणी व कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली आहे.
शेतकरी बांधवांना बियाणे, खताचा सुरळीत पुरवठा होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कुठेही कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई किंवा जादा दराने विक्री होता कामा नये. अत्यावश्यक वस्तू कायदा, बियाणे कायदा व नियम, बियाणे नियंत्रण आदेश, खत नियंत्रण आदेश, कीटकनाशके कायदा व नियम, तसेच कृषी आयुक्तालयाने निर्मगित केलेल्या प्रत्येक सूचनेची अंमलबजावणी व्हावी व वेळोवेळी कार्यवाहीचा अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांकडे सादर करावा, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा