export-vermi-compost-akola: विदर्भातून प्रथमच गांडूळ खत निर्यात; कृषी विद्यापीठाचा सहयोगातून पथदर्शक प्रकल्प




ठळक मुद्दे


विदर्भात गांडूळ खत निर्मितीसह निर्यातीसाठी मोठा वाव-  कुलगुरू डॉ. शरद गडाख 



युवा पिढीला कृषि आधारित उद्योजकतेकडे अग्रेसित होणे काळाची गरज-  जिल्हाधिकारी अजित कुंभार 


विदर्भात उत्पादित शेतमाल निर्यातीसाठी कटिबद्ध - प्रवीण वानखडे 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: विदर्भातील पशुधनाचा विचार करता अत्यल्प दूध उत्पादकतेमुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून पशुपालन  फायदेशीर ठरत नसताना, उपलब्ध शेण व गोठ्यातील वाया जाणारे मलमूत्र तथा चाऱ्याचे अवशेष इत्यादींच्या प्रभावी वापरातून गांडूळ खत तथा वर्मीवॉशची निर्मिती आर्थिक लाभ देणारी ठरत असून, गुणवत्तापूर्ण गांडूळ खत निर्यातीसाठी आता विद्यापीठाच्या सहयोगातून पर्याय उपलब्ध झाला असून, युनिव्हर्स एक्सपोर्टचे सर्वेसर्वा कृषी पदवीधर प्रवीण वानखडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगताना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विदर्भातील शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी पशु आधारित एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब फायदेशीर असल्याचे सांगितले. 




डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत उद्योजकता विकास फोरमचे सदस्य कृषि पदवीधर प्रवीण चांगदेवराव वानखडे यांचे प्रयत्नातून तथा युनिव्हर्स एक्सपोर्टचे माध्यमातून विदर्भातून प्रथमच कृषी विद्यापीठाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य शेतकरी तथा विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात उत्पादित  उच्चप्रतीच्या गांडूळ खत निर्यातीचे प्रसंगी गांडुळ खताच्या निर्यातिची वणी (रंभापुर) ते दुबई शिपमेंट 

कंटेनरला हिरवी झेंडी दाखवीते वेळी उपस्थित बंधू-भगिनींना तथा उद्योजकता विकास फोरमच्या सदस्य विद्यार्थी वर्गाला अध्यक्ष स्थानावरून संबोधित करताना ते बोलत होते. 



युवा निर्यातदार कृषि पदवीधर प्रविण वानखडे यांचे आई वडील कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापुर येथील मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर गत तीन दशकाहूनही अधिक काळापासून शेत मजूर म्हणून सेवारत होते, आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थित विदयापीठ प्रक्षेत्रावर हा सदर निर्यातीचा "फ्लॅग ऑफ समारंभ" व्हावा, या प्रवीण वानखडे यांच्या विनंतीला मान देत मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र व वणी रंभापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या अतिशय महत्त्वकांक्षी तथा अभिमानास्पद कार्यक्रमाचे प्रसंगी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ धनराज उंदीरवाडे, कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील, कृषी पदवीधर निर्यातदार प्रवीण वानखडे, त्यांचे वडील चांगदेवराव वानखडे आई चंदाबाई वानखडे, मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्राचे संचालक डॉ. ताराचंद राठोड, विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे, डॉ. शैलेश हरणे, डॉ. ययाती तायडे, पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शेषराव चव्हाण, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार, यांचेसह एकात्मिक शेती संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. जयंत देशमुख, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ.नितीन कोष्टी, आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तर परिसरातील शेतकरी, प्रक्षेत्रावरील अधिकारी कर्मचारी, पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाचे प्राध्यापक वृद, उद्योजकता विकास मंचचे सदस्य विद्यार्थी विद्यार्थिनी आदींची सभागृहात उपस्थिती होती. 




सध्या शहरीकरणाकडे वाढलेला युवक-युवतींचा ओढा थांबवत गाव खेड्यांमध्ये चैतन्य फुलविण्यासाठी ग्रामीण भागात उत्पादित होणाऱ्या शेती आणि शेतीपूरक उत्पादनांवर गाव पातळीवर प्रक्रिया करणे गरजेचे असून, प्रत्येक गावं आदर्श होणेसाठी सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थाचे एकात्मिक प्रयत्न काळाची गरज असल्याचे देखील प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी याप्रसंगी केले. आयुष्यात प्रगतीसाठी व जिवनमान उंचावण्यासाठी आर्थिक प्रगती होणे आवश्यक आहे व याकरिता आवश्यक तंत्रज्ञान आणि माहिती अकोला कृषि विद्यापीठात उपलब्ध असून शेतीच्या या महाकुंभात युवक, युवती, स्त्री - पुरुष सर्वांसाठी उपयुक्त सर्वकाही आहे फक्त आपण त्याचा फायदा घेणे गरजेचे असल्याचे देखील डॉ. गडाख यांनी सांगितले. 



याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी समूह गटांचे महत्त्व व त्यातून साध्य होणारा ग्रामविकास अतिशय साध्या सोप्या अल्प शब्दात व्यक्त करीत, आता एकट्याने नव्हे तर समूहाने एकत्रित येत सर्वच शासकीय निमशासकीय विभागांचे सहयोगातून स्वतःचा आणि पर्यायाने गावाचा विकास करण्यासाठी युवा शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे विणावे, असे आवाहन केले. तसेच विद्यापीठाच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक देखील आपल्या भाषणा दरम्यान केले. पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग या त्रिसूत्रीचा अतिशय समर्पक वापर उलगडताना जिल्हाधिकारी कुंभार यांनी गुणवता व आर्थिक निकषावर बाजारात टिकणारा ब्रँड आणल्यास खऱ्या अर्थाने शाश्वत ग्रामविकास दृष्टीपथात येईल असा आशावाद व्यक्त केला. युवा कृषी पदवीधर प्रवीण वानखडे यांचे भरभरून कौतुक करताना कृषी विद्यापीठाच्या उद्योजकता विकास फोरमच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमाची निश्चितच देश पातळीवर नोंद होईल, असा आशावाद देखील व्यक्त केला. 



विदर्भात पिकणारा भाजीपाला फळे व इतर शेतमाल निर्यातीसाठी युनिव्हर्स एक्सपोर्ट तत्पर असून, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सहयोगातून येणाऱ्या काळात शेतमाल निर्यातीत आघाडी घेत वैदर्भीय शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिक संपन्न करण्यासाठी कृषी पदवीधर निर्यातदार म्हणून आपल्या सेवा प्रदान करणार असल्याचे भावनिक प्रतिपादन कृषी पदवीधर युवा निर्यातदार प्रवीण वानखडे यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. ज्या प्रक्षेत्रावर आपले आई-बाबांनी मोलमजुरी करून आम्हाला शिकविले घडविले त्याच प्रक्षेत्रावरून निर्यातदार म्हणून शेतमाल निर्यात करताना होत असलेला आंतरिक आनंद हा शब्दातीत नसल्याचे सुद्धा प्रवीण वानखडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कृषी विद्यापीठा प्रती विशेष आभार व्यक्त करताना प्रवीण वानखडे यांनी आम्ही भाग्यवान कृषी पदवीधर असल्याचे अधोरेखित करत कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे कार्यकाळात केवळ विद्यापीठच नव्हे तर विदर्भाचा देखील विकास होणार असल्याबद्दल विश्वास व्यक्त केला व विद्यापीठाच्या सहयोगाने आपला सर्वांगीण विकास साध्य होईल ,असा विश्वास उपस्थित शेतकरी वर्गाला दिला. 



विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ धनराज उंदीरवाडे यांनी याप्रसंगी विद्यापीठाच्या शेतकरी भिमुख विविध उपक्रमांना अधोरेखित करीत विद्यापीठाच्या एकंदरीत वाटचालीचा लेखाजोखा उपस्थितांना सादर केला. 


याप्रसंगी तीस टन उच्च गुणवत्तेच्या गांडूळ खत वाहतूक करणाऱ्या कंटेनरला उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून फ्लॅग ऑफ करण्यात आला. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्राचे प्राध्यापक डॉ. शिवाजी नागपुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पण्या