bhendwal-ghat-mandani-2024: भेंडवळ घट मांडणी भाकीत; यंदा देशाचा राजा कायम राहणार, चांगला पाऊस होईल




भारतीय अलंकार न्यूज 24

बुलढाणा:  जिल्ह्यातील भेंडवळ येथील घडमांडणीची भविष्यवाणी आज जाहीर करण्यात आली आहे. अक्षय्य तृतियेच्या मुहुर्तावर करण्यात येणाऱ्या  घट मांडणीतील भविष्यवाणी मधून पाऊस, पिक पाणी बाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भेंडवळच्या घट मांडणी मधून करण्यात आलेल्या भाकितानुसार जून, जुलै हे महिने कमी पावसाचे असणार आहेत. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



घटमांडणीतील भाकितानुसार यावर्षी पाऊस चांगला झाला तरी खरिपाची पिकं साधारण राहतील. तर रब्बीच्या हंगामात गव्हाचे पीक चांगले होईल. तर काही पिकांवर रोगराईचा परिणाम होण्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी येथील घटमांडणीमधून राजकीय भाकित केले जाते. मात्र यावर्षी आचारसंहिता असल्याने यावर विस्तारपूर्वक भाकित कऱण्यात आले नाही.


बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गाव घटमांडणी परंपरेसाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. याच घटमांडणीला भेंडवळचे भाकीत असे म्हणतात. दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहत असतात.  भेंडवळची घटमांडणी आज शनिवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास जाहीर करण्यात आली. यामध्ये पाऊस आणि शेती पिकांबाबत मोठे भाकीत करण्यात आले आहे. तसेच यंदा देशाचा राजा कायम राहणार आहे. चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

      


खरीप पिके साधारण राहतील


चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी घट मांडणी करण्यात आली. यानंतर  आज घट मांडणीतील भाकित वर्तवण्यात आले आहे. यंदा देशाचा राजा कायम राहील. चांगला पाऊस होईल, तर खरीप पिके साधारण राहतील. याशिवाय रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगले राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार आहे. भेंडवळच्या भविष्यवाणी नुसार, यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल. जुलैमध्ये चांगला पाऊस होईल. तर ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल. सप्टेंबर महिन्यात अवकाळी सारखा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 



 


अशी केली जाते घटमांडणी

अक्षय तृतीयेला सायंकाळी घटमांडणी करण्यात येते. यावेळी घटामध्ये अंबाडी, कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, मटकी, तांदूळ, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी आणि मसूर अशी अठरा प्रकारची धान्य गोलाकार मांडण्यात येतात.

घटाच्या मधोमध खड्डा खोदून त्यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक असलेली चार मातीची ढेकळे ठेवण्यात येतात. आणि त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते. घागरीवर पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी आणि चारा-पाण्याचे प्रतीक असलेले सांडोळी, कुरडई, पापड ठेवण्यात येतात.

बाजूला खाणार म्हणजे चवीचे प्रतीक भजे आणि वडा ठेवण्यात येते. तर घागरीच्या बाजूला राजा आणि राज्याची गादी म्हणजेच पान-सुपारी ठेवण्यात येतात. रात्रभर कुणीही या घटकाकडे फिरकत नाही. त्यानंतर आज सकाळी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करत त्यामध्ये रात्रीदरम्यान झालेल्या बदलावरून भाकीत वर्तविले जाते.

टिप्पण्या