भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बोरगाव मंजू येथे काल दोन गटात क्षुल्लक कारणावरून राडा झाला होता. यामधील दोन्ही गटातील आरोपींना बोरगाव मंजु पोलीसांनी अटक केली आहे. आतापर्यंत दोन्हीं गटातील मिळून एकूण आठ आरोपींना पोलीसांनी अटक केली असून, यात आरोपींची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे.
याबाबात सविस्तर वृत्त असे की, काल सोमवार रोजी रात्री आठ वाजताचे सुमारास बोरगाव मंजू येथील दोन लोक धनगरपुरा वस्ती मधुन बैल घेवून जात असतांना तेथील उपास्थित असलेल्या लोकांनी त्यांना बैल चोरीचे आहेत काय, असे विचारले. यामुळे त्यांचे मध्ये किरकोळ वाद झाला. सदर वादाचे पर्यावसान भांडणात झाले. त्यावेळी दोन्ही गटातील जवळपास तीस पस्तीस लोक यांनी एकत्र येवून गैरकायद्याची मंडळी जमवुन एकमेकांना लोखंडी पाइप व लाकडी काठयांनी मारहाण केली व एकमेकांवर दगडफेक केली. त्यामध्ये दोन्ही गटाचे लोक जखमी झाले.
श्रीकांत उर्फ अनिकेत राजेंद्र गवळी (रा. धनगरपूरा बोरगाव मंजू) यांचे रिपोर्ट वरून आरोपी मोहम्मद अयफास मो. अफसर, शेख जुबेर शेख मुशी, शेख सददाम उर्फ सज्जु शेख गणी, शेख इमरान मुस्तफा कुरेशी व अन्य 10 ते 12 लोकांवर कलम 324, 143, 147, 148, 149 भादंवि सहकलम 135 महा. पोलीस अधि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शेख जुबेर शेख मुशी (रा. कसाबपुरा बोरगाव मंजू) यांचे रिपोर्ट वरून आरोपी अनिकेत राजेंद्र गवळी, योगेश भाऊराव मोरे, केशव साहेबराव मोरे, साहेबराव नारायण मोरे व अन्य 10 ते 12 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी आवश्यक उपलब्ध पोलीस स्टाफ सह घटनास्थळावर जावून घटनेमध्ये जखमी झालेल्या इसमांना उपचाराकरीता अकोला पाठविले व परीस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गुन्हयातील अनिकेत राजेंद्र गवळी, योगेश भाउराव मोरे, केशव साहेबराव मोरे, साहेबराव नारायण मोरे, मोहम्मद अयफास मो. अफसर, शेख जुबेर शेख मुन्शी, शेख सददाम उर्फ सज्जु शेख गणी, शेख इमरान मुस्तफा कुरेशी यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दोन्ही गुन्हयातील इतर आरोपीतांना निष्पन्न करून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुर्तिजापूर मनोहर दाभाडे यांनी भेट देवून नागरीकांना शांतता राखण्यास सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे नागरिकांना आवाहन कऱण्यात आले. सध्या बोरगाव मंजु येथील परीस्थिती नियंत्रणात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा