agriculture-farmer-cotton-seed: कृषी विभागाचा नियोजनशून्य कारभार: शेतकऱ्यांचे कडक उन्हात हाल; कपाशी बियाण्यांसाठी रस्त्यावर लांब रांगा




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : कापूस उत्पादक शेतकऱ्याला आस्मानी, सुल्तानी संकटासह कपाशीच्या बियाण्यांसाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. दोन पाकीट कपाशीच बियाणं मिळावं यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे अकोल्यात चित्र दिसून येत आहे. बुधवारी टिळक रोड वरील कृषि केंद्रावर बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी लांबचलांब रांगा लावल्या असल्याचे दिसले.





विदर्भात कापूस आणि सोयाबीनचा पेरा अधिक आहे. त्यातच अकोला जिल्ह्यात दोन्ही पिकांचा पेरा जवळपास सारखाच आहे. एका विशिष्ट कंपनीच्या बियाण्यांसाठी सध्या अकोला जिल्ह्यात कृषी केंद्रांसमोर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. बियाणे घेण्यासाठी कडक उन्हात शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत, मात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 अथवा जास्तीत जास्त 5 पाकिटेच दिली जात आहेत. 4 ते 5 तास रांगेत उभे राहूनही आपल्या पसंतीचे कपाशी बियाणे मिळाले नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येथे उपास्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या कपाशी बियाण्यांचा पुरवठा वाढविण्यात यावा, अशी मागणी आता  जोर धरू लागली. 





दुसरीकडे कृषी विभागाच्या नियोजनशून्य कारभाराने शेतकऱ्यांचे कडक उन्हात हाल होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण न करता वस्तू स्थिती मांडावी, अशी अपेक्षा व्यापारी करत आहे. तर सध्या उद्भवलेल्या या परिस्थितीवर पुढच्या खरीप हंगामात मात देता येणार असल्याचा विश्वास डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने व्यक्त केला.








“शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्या पसंतीच्या बियाण्यांचा पुरवठा वाढविण्यात यावा, अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे.”


समाधान उईके, 

शेतकरी







“जिल्ह्याला 6 ते साडे 6 लाख पाकीट कापूस बियाण्याची मागणी आहे. यामध्ये विशिष्ट कंपनीचे 4 व्हेरायटीचे केवळ 1 लाख 23,600 पाकीट जिल्ह्याला प्राप्त आहेत. यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या पसंदीच्या व्हेरायटीचे केवळ 65 ते 70 हजार पाकीट मिळणार आहे. कंपनीचा उत्पादन  यावेळी अयशस्वी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.”

मोहन सोनोने

अध्यक्ष, 

कृषीकेंद्र संचालक संघटना, 

अकोला




“विद्यापीठाने विकसित केलेल्या कापसाच्या दोन व्हेरायटी पुढच्या वर्षात शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.”

डॉ.शरद गडाख, 

कुलगुरू 

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.






BAnews24 




टिप्पण्या