lok-sabha-elections-2024-mh: ‘वंचित’ मध्ये ‘वसंत’ खरंच बहरणार का?




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत  वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये अकोला येथे येवून  पक्षाचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शुक्रवार 5 एप्रिल रोजी अधिकृत प्रवेश केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातील 'यशवंत भवन' निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा झाला. 



वसंत मोरे हे मनसेचा पुण्यातील चेहरा होते. राज ठाकरे यांचा निष्ठावान मनसैनिक अशी त्यांची ओळख होती, मात्र पक्षाकडून माझ्या निष्ठेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याचे सांगत त्यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. मोरे यांना लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती, पक्ष श्रेष्ठीकडे ही इच्छा व्यक्तही केली होती. मात्र पक्षाने त्यांना नकार दिला. त्यामुळे मनसेच्या पक्षांतर्गत राजकारणाने वसंत मोरे दुखावले होते, हे त्यांनी पत्रकार परिषद घेवून जाहीररित्या सांगितले होते. 


मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांचे उंबरठे झिजविले.  शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटत होती. मात्र पुण्याची जागा काँग्रेसकडे असल्यामुळे हा रस्ताही वसंत मोरे यांच्यासाठी बंद झाला. पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची देखील मोरे यांनी भेट घेतली होती. मात्र येथेही काही जमले नाही. शेवटी  त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. वंचितने वसंत मोरे यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांनी काल अकोला येथे येवून कार्यकर्त्यांसह प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला.





वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे पुण्यात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली. भाजपचे मुरलीधर मोहळ, काँगेसचे  आमदार रवींद्र धंगेकर यांचा सामना वसंत मोरे यांना करावा लागणार आहे. 



दरम्यान वंचितने जाहीर केलेल्या उमेदवार मधील बहुतांशी उमेदवार हे  ऐनवेळी बाहेरून आलेले उमेदवार आहेत. त्यापैकी एक वसंत मोरे. पक्षात आधीपासून असलेले निष्ठावान कार्यकर्ते मात्र अश्या उमेदवारांमुळे नाराज असल्याचं बोलल्या जात आहे. वसंत मोरे यांची मनसे मधील काम करण्याची पद्धत पुणे सह अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. तर वंचित बहुजन आघाडीची काम करण्याची पद्धत ही याहून फार वेगळी आहे. वंचित मधील नाराज कार्यकर्त्यांच्या मनातील धुसमुस आणि ‘वंचित’ च्या शिस्तबद्ध वातावरणात वसंत खरंच बहरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 




टिप्पण्या