lok-sabha-elections-2024-akl: ‘देवेंद्र’ ने धरले ‘नारायणा’चे’ पाय ! : देवेंद्र फडणवीस यांनी केली नारायण गव्हाणकर यांची मनधरणी; अखेर च्या दिवशी उमेदवारी अर्ज घेतला मागे





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अपक्ष उमेदवार नारायण गव्हाणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अकोला लोकसभेचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. घराणेशाहीचा आरोप करीत भाजपचेच माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी बंडखोरी करीत आपला नामांकन अर्ज भरला होता. नारायण गव्हाणकर यांच्या या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर त्यांनी आज नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे.





गव्हाणकर यांची मनधरणी करण्यात भाजपला यश मिळाले आहे. भाजपचे वरिष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गव्हाणकर यांची मनधरणी केली आहे. काल रात्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण गव्हाणकर यांना फोन करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती, आणि त्यानंतर आज दुपारी  गव्हाणकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. ‘देवेंद्र’ ने  ‘नारायणा’चे  पाय धरल्याने अनुप धोत्रे यांच्या विजयाचा मार्ग काही प्रमाणात का होइना; सुकर झाला असल्याची  चर्चा आता अकोला लोकसभा मतदार संघात रंगू लागली आहे.




देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनुसार उमेदवारी मागे घेतली असली तरी  घराणेशाहीला आपला विरोध अजूनही कायम आहे, अश्या प्रतिक्रिया उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर नारायण गव्हाणकर यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केल्या. 




गव्हाणकर यांनी अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल केला होता.

नारायण गव्हाणकर हे ओबीसी नेते असून त्यांचा जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे. ते भाजपच्या तिकिटावर 1995 आणि 2004 ला बाळापूर विधानसभेतून निवडून आले होते.


अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये रंगत चढत भाजपाने अनुप धोत्रे यांची उमेदवारी घोषित झाल्यापासून भाजपाचा आंतरिक वाद खदखदत होता. भाजपा ज्येष्ठ नेते नारायण गव्हाणकर यांनी केलेल्या बंडामुळे हा वाद चव्हट्यावर आला. अकोला लोकसभेत भाजपला घरचाच आहेर मिळाला असल्याचे आता बोलल्या जात होते.  माजी केंद्रिय मंत्री तथा भाजपा खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजपाच्या एका गटात काहीसा नाराजीचा सूर निघाला होता. आता मात्र ही नाराजी जाहीर रित्या सर्व समक्ष आली होती. भाजप बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी घराणेशाहीला विरोध करत आपली नाराजी व्यक्त केली होती. 

नारायण गव्हाणकर भाजपच्या तिकिटावर 1995 आणि 2004 ला बाळापूर विधानसभेतून निवडून आले होते. यानंतर 1999 आणि 2009 मध्ये त्यांनी निवडणूक लढली. मात्र त्यांना  पराभव स्वीकारावा लागला. पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची खंत याआधी अनेकदा गव्हाणकर यांनी व्यक्त केली होती.

आता मात्र गव्हाणकर यांनी याविरोधात बंड पुकारून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. दरम्यान नारायण गव्हाणकर यांनी  अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल केला होता. नारायण गव्हाणकर यांच्या या भूमिकेमुळे भाजपची डोके दुखी वाढली होती. कारण मोठया प्रमाणात मत विभाजन होणारं होते. ही बाब हेरून अनुप धोत्रे यांच्या विजयासाठी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिशः यात लक्ष घालून नारायण गव्हाणकर यांची मनधरणी केली.





टिप्पण्या