lok-sabha-elections-2024-akl: मोदीजी विकासाची कावड यात्रा घेवून निघाले आहेत - अमित शाह यांचे प्रतिपादन; अकोला लोकसभा मतदार संघात विराट ‘नमो संवाद’




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोल्याची कावड यात्रा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे, ज्या पद्धतीने सर्वजण पूर्णा नदीचे पाणी घेऊन महादेवाला अर्पण करतात. तसंच मोदीजींनीही विकासाच्या कावडयात्रेत पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण अशा चारही दिशा ठरवून, मोदीजी विकासाची कावड यात्रा घेवून निघाले आहेत. विकसित भारत हे मोदींचे स्वप्न आहे. आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थ व्यवस्था होऊन मोदींचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री तथा महायुतीचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी व्यक्त केला.



INDI Alliance मधील लोक म्हणायचे की, राम मंदिर बांधू नका, पण आपले पंतप्रधान मोदीजी यांच्यामुळे राम भक्तांची वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाली असल्याचे शाह म्हणाले.



काँग्रेस पक्ष आणि चिदंबरम म्हणतात की, आम्ही CAA रद्द करू.  अहो चिदंबरम जी, जोपर्यंत भाजपचे एक लहान मूलही जिवंत आहे, तोपर्यंत आम्ही CAA ला हात लावू देणार नाही, असा दम अमित शाह यांनी विरोधकांवर धरला.




देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने वाढते आहे. आताही मोदी यांनी चारशे पारचा नारा दिला आहे. आमच्या साठी हे लक्ष देखील कठीण नाही. आमची ताकद कितीही वाढली तरी आम्ही सत्तेचा दुरुपयोग करीत नाही. त्यामुळे आरक्षणास पात्र असणाऱ्या एस.सी, एस.टी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण आम्ही कधीही हटवणार नाही, असे ठाम प्रतिपादन  अमित शाह यांनी यावेळी केले. 




अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपा,शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, कुणबी सेना, रिपाई कवाडे गट, मराठा महासंघ महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांच्या विराट प्रचार सभेत गृहमंत्री अमित शाह बोलत होते. 


अकोला क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या या सभेत उन पावसाचा खेळ चालला. मात्र तरी देखिल अकोलकर महायुती प्रेमी नागरीक सभेत ठाण मांडून होते.


अमित शाह पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या वाढत्या ताकदीचा उपयोग देशवासीयांच्या भल्यासाठी व देश हितासाठी केला आहे. आमची ताकद वाढताच आम्ही भारतीय जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काश्मीरचे स्पेशल 370 कलम हटविले. गेल्या 70 वर्षे कॉंग्रेसने काश्मीरचा सांभाळ अनौवरस पुत्रा सारखा केला होता. आम्ही काश्मीर प्रदेशाला भारताचा कायदेशीर अविभाज्य भाग बनविला आहे.  करोडो रामभक्तांच्या श्रध्येचा विचार करून आमच्या सरकारने कोर्टात राममंदिराची बाजू व्यवस्थितपणे मांडली व हा खटला आम्ही जिंकला आणि ठरल्याप्रमाणे अयोध्येला प्रभूश्रीरामाचे भव्य-दिव्य मंदिर निर्माण केले. आमची ताकद वाढतच आम्ही या वाढलेल्या ताकदीने  सी.ए.ए  कायदा लागू केला अफगाणिस्थान, पाकीस्थान, बांगलादेश, या तिन्ही देशात तेथील हिंदू अल्पसंख्यांक समाजावर भीषण अत्याचार झाले. तेथील हिंदू, शीख, बौद्ध, जैन शरणार्थी  भारताकडे म्हणजे आपल्या मायभूमीकडे आशेने पाहत होते. या सर्व निराश्रिताना भारताने सी.ए.ए कायद्याने आश्रय दिला. तेव्हा हा कायदा देश विरोधी कसा अशा प्रश्न अमित शहा यांनी उपस्थित  केला.



अमित शहा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छात्रपती शिवाजी महाराज, संत गजानन महाराज, संत सेवालाल महाराज, संत गाडगे महराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जय जयकाराने केली. जय श्रीराम नारे देत त्यांनी या विराट सभे वातावरण प्रचंड उत्साहात बदलले. 



शाह यांचे भाषणापूर्वी पावसाचे आगमन झाले होते. पावसाची तमा न बाळगता हजारो श्रोते अमित शाह यांचे भाषण कान देऊन ऐकत होते. आपल्या प्रभावी व आक्रमक शैलीत बोलतांना अमित शाह यांनी राज्यातील नेते शरद पवार यांचेवर जोरदार टीका केली. शरद पवार हे दहा वर्षे यु.पी.ए सरकारमध्ये मंत्री  होते तेव्हा या दहा वर्षात शरद पवारांनी व त्यांच्या यु.पी.ए ने महाराष्ट्राला काय दिले असा सवाल अमित शहा यांनी उपस्थित केला. 



सरकारी आकडेवारी नुसार पवार व यु.पी.ए ने महाराष्ट्राला दहा वर्षात 1 लाख 91 हजार करोड दिले तर आमच्या मोदी सरकारने मावळत्या दहा वर्षात महाराष्ट्राला 7 लाख 15 हजार कोटी रुपये दिल्याचे शाह म्हणाले. 



आम्ही सत्तेत आलोतर देशातील सी.ए.ए कायदा रद्द करू असे आश्वासन कॉंग्रेस वाले एका समुदायाला देत आहेत. कॉंग्रेसच्या या विधानाचा शाह यांनी खरपूस समाचार घेतला. देशातील जनता व आम्ही कॉंग्रेसला कधीही सत्तेत येऊ देणार नाही त्यामुळे सी.ए.ए कायदा रद्द होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही असे शहा म्हणाले. 


कॉंग्रेसने मुस्लिमांकडे केवळ एक व्होट बँक म्हणून बघितले आहे, त्यांच्यातील अन्यायाला कधी ही वाचा फोडली नाही. आम्ही मात्र ट्रिपल तलाख पद्धत रद्द करून मुस्लीम स्त्रियांचा आशीर्वाद घेतला असे शाह म्हणाले. 


आपल्या भाषणाचा एक मुद्दा संपल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह हे जनतेला अकोला लोकसभा मतदार संघातून अनुप धोत्रे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत होते. 








या विराट प्रचार सभेच्या व्यासपीठावर   भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारताकळे, खासदार भावना गवळी, नकुल देशमुख, बळीराम सिरस्कार, आमदार वसंत खंडेलवाल, प्रदेश भाजपा मीडिया समय वन प्रमुख विश्वास पाठक, प्रवक्ते आशिष चंद्रानी माजी आमदार वसंत खोटरे, विजय अग्रवाल, विजय जाधव, तेजराव थोरात, कृष्णा शर्मा, किशोर पाटील, श्याम बडे, जयंत मसने, राजेश काळे, पंकज साबळे, विजय देशमुख, श्रीरंग  पिंजरकर, कृष्णा देशमुख, संदीप पाटील, चैनसुख संचेती, दिलीप जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.



भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात राज्य आणि केंद्र सरकारची माहिती देऊन उपस्थिततांचे मन जिंकून घेतले. आमदार हरीश पिंपळे गोपीकिशन बाजोरिया, तुकाराम बिडकर, आमदार अमोल मिटकरी, विठ्ठल लोखंडकर, जयदीप कवाडे, चैनसुख संचेती, आमदार रणधीर सावरकर,  उमेदवार अनुप धोत्रे यांनी दहा वर्षाचा लेखाजोखा तसेच आगामी विकसित संकल्पना प्रस्तुत केला. कार्यक्रमाचा संचालन भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन लोकसभा संयोजक विजय अग्रवाल यांनी केले.



खासदार संजय धोत्रे यांची अनुपस्थिती जाणविली


अकोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत प्रकृतीच्या कारणामुळे खासदार संजय धोत्रे यांना उपस्थित राहता आले नाही. यावेळी कार्यकर्त्यांना, चाहत्यांना संजय धोत्रे यांची अनुपस्थिती जाणविली. अकोला मतदार संघातून त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी मिळाली असल्याने अकोला जिल्हात भाजपला निवडून आणू, अशी ग्वाही जनतेने सभेस मोठ्या संख्येने उपस्थिति दर्शवून दिले.


अयोध्येसाठी स्पेशल रेल्वे सुरू करावी



सलग पाचव्यांदा अकोला लोकसभा हा गड अभेद्य ठेवण्यासाठी भाजपने खासदार पुत्र अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून रणशिंग फुंकले आहे. आज झालेल्या जाहीर सभेत अनुप धोत्रे यांनी अकोल्यात अयोध्येसाठी स्पेशल रेल्वे सुरू करावी, अशी मुख्य मागणी अमित शाह यांच्याकडे केली.



आमदार रणधीर सावरकर यांची खरी तळमळ


आमदार रणधीर सावरकर यांची या जाहीर सभेत खरी तळमळ कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना पहावयास मिळाली. सभास्थळी प्रत्येक कार्यकर्त्यांना आणि येणाऱ्या नागरिकांना त्यांनी आदराने आणि सन्मानाने वागणूक दिली. पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली.मात्र आमदार सावरकर यांनी व्यासपीठावरून खाली उतरून  परिस्थिती नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे त्यांनी या सभास्थळी जातीने लक्ष दिले आणि त्यांचा आपुलकीचा आणि बंधू भावाचा हाच गुण वाखण्यासारखा आहे ,अशी प्रतिक्रिया जनतेतून येत होती.



क्षणचित्रे



पाऊस आल्यावर सुद्धा नागरिक मंडप सोडून गेले नाही उलट मोठ्या संख्येने उपस्थित झाले. 


अकोल्याच्या इतिहासामध्ये तीन तास चालणारी ही एकमेव जाहीर सभा आहे.

 

सभा सुरू होण्याच्या आधी व सभा संपल्यानंतर अकोला शहराच्या सतरा किलोमीटर रस्ता तीन तास जाम झाला 


विरोधकांच्या अपप्रचारानंतर सुद्धा नागरिकांची उपस्थिती व सभेबद्दल अनेक अफवांचा बाजार केल्यावर सुद्धा नागरिकांनी महायुतीवर विश्वास व्यक्त केला. 


ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती वाजत गाजत वेगवेगळ्या मोदींच्या नावाचे गजर करून नागरिक सभेत सहभागी झाले होते.


टिप्पण्या