lok-sabha-election-2024-akl: मुकुल वासनिकांच्या वक्तव्याला प्रकाश आंबेडकरांनी दिल्या शुभेच्छा; तर वंचितच्या व्यासपीठावर काँग्रेस नेत्याच्या एन्ट्रीने राजकिय वर्तुळात खळबळ






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड.नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर येथे आयोजित प्रचार सभेत काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांनी अकोला लोकसभेतील लढत केवळ भाजप आणि काँग्रेसमध्ये असल्याचा वक्तव्य केलं होतं , मात्र मुकुल वासनिकांच्या या वक्तव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुभेच्छा दिल्या आहे. तर वंचित आमच्या सोबत आली नाही याचा कारण मतदारांनी शोधावं असेही मुकुल वासनिक म्हणाले होते , तर वेड्यांना मी उत्तर देत नाही म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं. मात्र अकोल्यात जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. याच जाहीर सभेत काँग्रेसचे जेष्ठ नेते यांनी थेट येवून अनेक खुलासे केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर राजकिय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे.



काँग्रेस आमच्या सोबत नाही आली काही हरकत नाही, मात्र त्यांनी मुस्लिमांना उमेदवारी दिली नसल्याचं आंबेडकर म्हणाले. CAA आणि NRC हे दोन्ही गैर कायदेशीर असल्याचं ही ते म्हणाले. युवा पिढी नाईट लाईफ मागत आहे, आम्ही सत्तेत आल्यावर कायदा तयार करून नाईट लाईफ सुरू करण्याचं आश्वासनही आंबेडकर यांनी दिलं.




मोदीच्या कार्यकाळात देश कर्जात डुबला - प्रकाश आंबेडकर यांचा आरोप 



नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता मोदींच्या कार्यकाळात देशावरील कर्ज कितीतरी पटीने वाढले, हे ताज्या आकडे वरून स्पष्ट झाले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.


शनिवारी सायंकाळी मुस्लिम समाजाच्या वतीने फतेह चौकात आयोजित सभेत  ते बोलत होते. 


आंबेडकर पुढे म्हणाले की, मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. देशातील किसान आजही दिल्लीत आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमाल त्यांच्या शेतातच खरेदी करावा, असे मोदी सरकारचे धोरण आहे याला विरोध म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले. 

मोदींच्या हुकूमशाहीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही सांगता येत नाही. केंद्र सरकारने आणलेला एन आर सी , सी ए ए हा कायदा बेकायदेशीर असून अन्यायकारक आहे. भारतात जन्मलेल्या लोकांना जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागेल. देशात अशी काही जमात आहे की, त्यांचा राहण्याचा ठाव ठिकाणा नसतो दोन वेळचे जेवण भेटलं तरी त्यांच्यासाठी खूप आहे अशा लोकांकडे जन्माचा दाखला नसेल तर त्यांना आतंकवादी म्हणणार काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या अन्यायकारक कायद्याचा विरोध करण्यासाठी संसदेत आवाज उठवणे गरजेचे आहे. यासाठी मी आपणास सर्वांना विनंती करतो की, येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकजुटीने एका ताकदीने वंचित बहुजन आघाडी पाठीशी आपण उभे राहावे. 






काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वंचितच्या व्यासपीठावर !



काँग्रेसचे अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व खारपान पट्टा आंदोलनाचे प्रमुख प्रवर्तक डॉ.पुरुषोत्तम दातकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावर येऊन मनोगत व्यक्त केल्याने काँग्रेसच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. भाजपा आणि काँग्रेस या पक्षाचे उमेदवार संघाच्या विचारधारेशी जुळलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी बहुजनांचा आधारस्तंभ ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन डॉ. दातकर यांनी केले.


ते म्हणाले की, मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. मात्र मला माझं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भाजपामधून आलेल्या लोकांच्या हातात काँग्रेस पक्ष गेला. त्यामुळे ते वरून  काँग्रेसचे जरी दिसत असले तरी ते आतून भारतीय जनता पार्टीचा छुप्या पद्धतीने  प्रचार करत आहेत. म्हणून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.


डॉ. दातकर पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत युती करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच ही युती होऊ दिली नाही. ते प्रसार माध्यमातून खोटी माहिती देत होते. वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मी संपर्कात होतो. मात्र नाना पटोले यांनी काँग्रेस सोबत एक प्रकारे गद्दारी केली,असा थेट आरोप दातकर यांनी केला.



मी काँग्रेसमध्येच - डॉ.दातकर


“मी काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसमध्येच राहील. मी माझे मत व्यक्त केले. आणि यापुढे सुद्धा मी करत राहील. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष हा भाजपच्या दावणीला बांधलेला आहे,  याचा राहुल गांधींनी विचार करावा.”

-डॉ. पुरुषोत्तम दातकर

ज्येष्ठ काँग्रेस नेते व खारपानपट्टा आंदोलनाचे प्रमुख.



बाळापूर तालुक्यातही कॉग्रेसला मोठा धक्का 




बाळापूर तालुक्यातील कॉग्रेसच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फतेह चौक येथील जाहीर प्रचारसभेत  एड बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते घेतला वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश.


टिप्पण्या