lok-sabha-election-2024-akl : अकोल्यात मतदारांचा मतदानासाठी निरुत्साह; आतापर्यंत केवळ 32.15% मतदान





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला अकोला लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता पासून रिमझिम पावसात प्रारंभ झाला. यामध्ये युवा, प्रौढ आणि वृध्द अश्या तीन पिढ्या एकत्रित येवून मतदान करीत आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत अकोला मतदार संघात केवळ 7.17% मतदान झाले. 11 वाजेपर्यंत 17.39 % मतदान झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत 32.15 मतदान झाले. 


उमेदवारांनी केले मतदान 


अकोला लोकसभा मतदार संघातील उमेदवार ज्यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे, अशा उमेदवारांकडे आज सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.  महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील, महायुतीचे अनुप धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते.



आधी लगीन लोकशाहीचे 


अकोला मतदारसंघ तेल्हारा तालुका मधील दहिगाव अवताडे येथील मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वर राहुल महादेवराव सोळंके (रा.दहिगाव) यांचे सरपंच रविकिरण काकड, पोलीस पाटील अरविंद अवताडे, तलाठी संदीप ढोक यांनी स्वागत केले. सकाळी 9 पर्यंत मतदान 7.17% मतदान झाले.




अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजता पासून विविध मतदान केंद्रावर शांततेत मतदानाला सुरुवात झाली. विविध मतदान केंद्रांवर विविध थीम साकारण्यात आले असून, महिला युवा दिव्यांग विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. उन्हाचा पारा कमी झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र दुपारी उन्हाचा पारा वाढला. यामुळे मतदानावर परिणाम होत असल्याचे म्हंटला जात आहे. मात्र मतदारांनी आपला हक्क बजावावा, असे आवाहन आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले.


विदेशातून खास मतदानासाठी अकोल्यात




अकोला येथील युवा मतदार परिमल असनारे शिक्षणानिमित्त सिंगापूर येथे असतात. मात्र मतदान हा आपला महत्त्वाचा अधिकार असून तो प्रत्येकाने बजावला पाहिजे हा संदेश देत परिमल असनारे यांनी सिंगापूर वरून येत अकोला येथील एलआरटी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी प्रत्येकाने मतदान करावे व लोकशाही मजबूत करावी, असा संदेश दिला. सिंगापूर वरून येत मतदानाचा हक्क मी बजावला आहे. आपणही बजावावा असे आवाहन केले.



जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले सपत्निक मतदान



जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी सीताबाई कला महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर  सकाळी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिका-यांसमवेत डॉ.जुईली अजित कुंभार यांनीही मतदान केले. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मतदान आपला महत्त्वाचा अधिकार असून प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी कुंभार यांनी सीताबाई कला महाविद्यालयातील मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा घेतला.



आजोबा, आजींनी बजावला मतदानाचा हक्क




तेल्हारा येथील भावजी रावजी पोहरकर  वय 102 वर्ष  या आजोबांनी तेल्हारा बूथ न. प. शाळा क्र 2 येथे मतदानाचे कर्तव्य पार पाडले. तर 100 वर्षाच्या रमाबाई रामभाऊ मांडेकर, शिवाजी नगर यांचे निवडणूक आयोगाने घरी येवून मतदान घेतले व आजीने मत मतपेटी मध्ये टाकले.




मतदान प्रक्रिया काही वेळासाठी झाली ठप्प



पारस मतदान केंद्र क्र. 112 तालुका बाळापूर पारस जिल्हा परिषद शाळा केंद्र येथे राजेंद्र पातोडे यांनी मतदान करण्यास पहिला नंबर लावला. तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदार तपासणी करून बोटाला शाई लावून दिली. मात्र त्यांनतर 45 मिनिट झाले तरी त्यांचे मतदान होवू शकले नाही.BU काम करीत नसल्याने जेवढा वेळ मतदान प्रक्रिया बंद झाली. तेवढा वेळ वाढवून द्यावा.तसेच सदोष केबल आणि BU बदलून द्यावे, अशी मागणी पातोडे यांनी केली. मात्र केंद्राध्यक्ष वेळ वाढवून देण्यासाठी राजी नसल्याने अखेर राजेंद्र पातोडे यांनी संबंधितांकडे तक्रार दाखल केली.


दुसरा प्रकार तेल्हारा तालुक्यातील मतदान केंद्र क्र. 333 उमरी येथील मतदान दोन तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प पडली होती. तर तिसरा प्रकार मातोडा कुरुम मूर्तिजापूर येथे घडला. येथील मशीन योग्य काम करीत नसल्याची तक्रार मतदारांनी केली.


टिप्पण्या