lok-sabha-election-2024-akl: लोकशाहीचा उत्सव यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज;15 उमेदवार निवडणूक रिंगणात,18 लाखहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या शुक्रवार 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. यासाठी अकोला लोकसभा मतदरसंघ निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाची जय्यत तयारी पूर्णत्वास आली आहे. उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सांस्कृतिक भवन येथे  निवडणूक कर्मचारी आपल्या निवडणूक केंद्रांपर्यंत जाण्यासाठी एकत्र झाले आहेत.



अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ही संख्या मागील लोकसभेत 11 होती. 2024 च्या या तिरंगी लढतीत भाजपचे संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील रिंगणात आहे. 



अकोला लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. यामध्ये अकोला (पश्चिम), अकोला (पूर्व), अकोट, बाळापुर, मुर्तीजापूर आणि वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघांचा समावेश आहे. यंदा 18 लाख 90 हजार 814 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  


एकूण मतदार :  18 लाख 90 हजार 814 मतदार.


पुरुष  : 9 लाख 77 हजार 500


महिला : 9 लाख 13 हजार 269


सर्विस वोटर्स: 3839


मतदान केंद्र : 2056 आहे 


इलेक्ट्रोनिक वोटिंग मशिन्स : 4134


व्हीव्ही पॅट मशीन : 2503


सुरक्षा : 4200 पोलीस कर्मचारी



मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग




अकोला लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येत आहे. एकूण 2 हजार 56 मतदान केंद्रांपैकी एकूण 1 हजार 38 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग निश्चित आहे.

 

याअनुषंगाने नियोजनभवनात जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला असून, वेब कास्टिंग, जीपीएस कंट्रोल, पोल डे मॉनिटरिंग, ईव्हीएम मॉनिटरिंग आदी कार्यवाही स्वतंत्रपणे होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी आज या यंत्रणेची पाहणी करून सतर्क राहून कामे करण्याची सूचना दिली. 


 

अकोट विधानसभा मतदारसंघात 168, बाळापूर मतदारसंघात 170, अकोला (पश्चिम) मतदारसंघात 160, अकोला (पूर्व) मतदारसंघात 177, मूर्तिजापूर येथे 193 व रिसोड मतदारसंघातील 170 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येत आहे. याद्वारे मतदान केंद्रांवर थेट देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. 


मतदान करताना उत्साहाचे वातावरण रहावे, यासाठी मतदान केंद्र आकर्षक सजविण्यात आले आहेत. 




विविध थीम घेऊन आदर्श मतदान केंद्रे सुसज्ज


घनदाट अरण्ये, वाघ, हिरवीगार शेती अशा विविध थीम घेऊन मॉडेल मतदान केंद्रे सुसज्ज करण्यात आली आहेत. 

पोदार इंटरनॅशनल स्कूल येथील आदर्श मतदान केंद्रांवरील थीम कृषी संस्कृती व ग्रामीण भारताचे दर्शन घडविणारी आहे. बार्शिटाकळी येथील केंद्रावर अरण्याची थीम साकारण्यात आली आहे. 

अकोट येथील केंद्रावर नरनाळा किल्ल्याची थीम साकारली आहे. दादासाहेब दिवेकर प्राथमीक शाळा  हे तृतीयपंथी मतदारांकरीता विशेष मतदान केंद्र म्‍हणून निश्चित करण्‍यात आले आहे. तिथे रेनबो थीम साकारण्यात आली आहे. 

अकोट येथे श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय व शिवाजी महाविद्यालय, बाळापूर येथे जि. प. बांधकाम विभाग कक्ष क्र. १, न. प. प्राथमिक उर्दू शाळा क्र. 1, न.प.प्राथ.उर्दु शाळा क्र.7, कासारखेड, पातूर येथे मौलाना अबुल कलाम आझाद हॉल, न. प. मराठी मुलांची शाळा, अकोला येथे उर्दू मुलांची शाळा, महानगर पालिका कमलाबाई चांदुरकर के एम एम शाळा क्र 7, मनपा पश्चिम झोन कार्यालय, अशा विविध ठिकाणी थीम बेस्ड आदर्श मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे.  

  


तसेच महिला मतदारांसोबत येणाऱ्या लहान मुलांकरिता करमणुकीचे साधना करता खेळणी ठेवण्यात आली आहेत.


 


टिप्पण्या