women-police-trainees-akola: महिला पोलीस प्रशिक्षणार्थींचे स्वास्थ्य खराब; राजकिय नेत्यांची रुग्णालयात धाव





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पोलीस प्रशिक्षण केंद्र मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या महिला पोलीस प्रशिक्षणार्थींची प्रकृति स्वास्थ्य अचानक बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यामध्ये साठहून अधिक महिला पोलीस प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. यातील काही जणींना दोन तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. तर काहींना आज भरती करण्यात आले आहे. दूषित पाणी प्यायल्याने हा प्रकार घडला असावा किंवा अकोल्यातील तापमानात वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम प्रशिक्षणार्थी महिलांवर झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा सर्व प्रकार शुक्रवार 29 मार्च रोजी समोर आला.




प्रारंभी या रुग्ण प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्राथमिक तपासणी व औषधोपचार केल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने या सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यातील एकीला डेंग्यू, काहीना डीहायड्रेशन, तर  काहींमध्ये कावीळ आजाराची लक्षण दिसत आहे. या सर्व रुग्ण महिला पोलीस प्रशिक्षणार्थींची तब्येत धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकिय सूत्रांचे म्हणणे आहे. 



दरम्यान विविध राजकीय पक्षाचे नेत्यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन रुग्ण पोलीस महिला प्रशिक्षणार्थींची भेट घेऊन आरोग्याची विचारपूस करून काळजी घेण्याचे सांगितले. 



उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल 


पोलीस प्रशिक्षण केंद्रातील दूषित पाण्यामुळे साठ महिला पोलिसांची प्रकृती संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना माहिती दिली. यावर पोलीस  व जिल्हा प्रशासनाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेवून उपचार करण्याचे निर्देश दिले. 

भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांना घटनेची माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी यासंदर्भात दाखल घेवून पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली केली.या संदर्भात वरिष्ठ नेत्यांना माहिती दिली आहे.


सखोल तपास व्हावा- आमदार मिटकरी

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी या सर्व आजारी महिला पोलिसांची भेट घेतली. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशा सुचानाही त्यांनी दिल्या आहे. दूषित पाण्यामुळे हा आजार झाला आहे. तरी याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासनाने करावा, अशी मागणी मिटकरींनी केली आहे.



दूषित पाण्यामुळे  प्रशिक्षणार्थी पोलिसांना बाधा; प्रा. अंजली आंबेडकर यांची रुग्णालयाला भेट


पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दूषित पाण्यामुळे बाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजली आंबेडकर यांनी तातडीने देशमुख हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या प्रशिक्षणार्थी तरुणीवर अशी वेळ येणे  ही दुर्दैवी घटना आहे, असे मत अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केले.



रुग्णालयात भरती असलेल्या सर्व तरुणींना त्यांनी दिलासा दिला. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थींना दिला. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख कांबळे यांची उपस्थिती होती.




टिप्पण्या