shiv-jayanti-festival-2024-akl: शिवजयंती उत्सव 2024; डाबकी रोड परिसरात साकारला भव्यदिव्य कोंढाणा किल्ला





ठळक मुद्दा 

सरसेनापती हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे यांचे वंशज करणार शिवपूजन





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची तिथीनुसार जयंती २८ मार्च रोजी डाबकी रोड परिसरात जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने साजरी केली जाणार आहे. यंदा १०० फूट लांब व ५० फुट उंच भव्यदिव्य कोंढाणा (सिंहगड) किल्ला उभारण्यात आला आहे. 



यानिमित्त शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे १३वे वंशज राजेंद्रसिंह उर्फ संग्रामसिंह मोहिते पाटील तसेच सुभेदार तानाजी मालुसरे यांची १३वे वंशज कुणाल मालुसरे यांच्या हस्ते शिवपूजन केले जाणार आहे. 


हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ़ रोवणाऱ्या जगातील आदर्श अशा छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरुवार २८ मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. जुने शहरातील जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती समिती तथा डाबकी रोडवासी यांच्या वतीने यंदा कोंढाणा किल्ल्याचे निर्माण करण्यात आले आहे. यावर्षी तीन दिवसीय सोहळयात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 



यामध्ये बुधवारी सामान्य ज्ञान परीक्षा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांच्या हस्ते शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर गायिका नेहल ठाकूर यांचा स्वरसंध्या कार्यक्रमात पोवाडे, भावगीत, भक्तीगीते सादर केल्या गेले.


शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन 



यावर्षी बुधवार २७  मार्च ते २९ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाळकरी विद्यार्थी तसेच शिवप्रेमींसाठी निशुल्क शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे . यामध्ये युद्धात वापरलेल्या अस्सल तलवारींचे प्रकार ज्यामध्ये कट्यार, दांडपट्टा, वाघनख, चीलखत, तोफगोळ्यांसह अनेक दुर्मिळ शस्त्रांचा समावेश आहे. २९ मार्च रोजी रांगोळी स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाचे वाटप केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. 



सरसेनापती हंबीरराव मोहिते,  तानाजी मालुसरे यांचे वंशज करणार शिवपूजन


छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील यांचे १३ वे वंशज राजेंद्र उर्फ संग्रामसिंह मोहिते पाटील तसेच सुभेदार तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज कुणाल मालुसरे यांच्या हस्ते गुरुवार २८ मार्च रोजी सायंकाळी जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या कोंढाणा किल्ल्यावर शिवरायांचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ होईल. शोभायात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी नगर येथील शिवरायांच्या पुतळ्याजवळ केला जाईल.

टिप्पण्या