ration-grain-scam-case-akola: बहुचर्चित रेशन धान्य गहू घोटाळा प्रकरण: ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर सह तत्कालीन सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना शिक्षा; तब्बल 24 वर्षांनी लागला निकाल





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सन २००० मध्ये महाराष्ट्रात गाजलेला आणि अकोल्यात घडलेला रेशन धान्य गहू घोटाळा प्रकरणाचा निकाल तब्बल २४ वर्षांनी लागला असून,या प्रकरणात मुख्य आरोपीसह सात अधिकारी कर्मचारी यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. तर ट्रक चालकांची सबळ पुरावा अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. बहुचर्चित या प्रकरणात एकूण ४१ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.



सन २००० साली अकोला व वाशिम जिल्हयातील सर्वसामान्य नागरीकांना रेशनकार्डवर वितरीत करण्यात येणारा ४५ लाख ७३ हजार २२६ रूपये किंमतीचा ४८ ट्रक गहु मालेगाव, मंगरूळपीर, रिसोर्ड आणि वाशिम येथे न पोहचल्याने, रेशनचा गहु गायब झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याप्रकरणात पोलीस स्टेशन अकोट फाईल अकोला येथे एकुण ०३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात मुख्य आरोपी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणुन रामदयाल गुप्ता याचेसह ट्रकचे ड्रायव्हर, तत्कालीन निवासी जिल्हाधीकारी, पुरवठा अधिकारी तसेच इतर सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना मुख्य आरोपीने गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करून रेशन घोटाळा केला होता. 



या प्रकरणात २९ फेब्रुवारी २०२४ रोजी  मुख्य न्यायदंडाधिकारी अकोला यांचे न्यायलयाने २४ वर्षानंतर निकाल दिला असून, निकालामध्ये मुख्य आरोपी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर रामदयाल गुप्ता याला कलम ४०७ अन्वये ०५ वर्ष शिक्षा व ४० हजार दंड, कलम ४२० अन्वये ०५ वर्ष शिक्षा १५ हजार दंड, ४६८ अन्वये ०३ वर्ष शिक्षा व १० हजार दंड, कलम २०१ अन्वये ०२ वर्ष शिक्षा व दोन हजार दंड तसेच सातही सरकारी अधिकारी कर्मचा-यांना ०२ वर्ष शिक्षा ठोठाविण्यात आली. 



यामध्ये जवळपास ४१ साक्षीदार तपासण्यात आले होते. तसेच ट्रकचे चालकांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. 



या गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस स्टेशन अकोट फाईल ठाणेदार पोलीस निरिक्षक शेख सुलतान यांनी केला असुन सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील दीपक काटे आणि विद्या सोनटक्के यांनी काम पाहले. पैरवी अधिकारी म्हणुन राजेंद्र पाटिल सी.एम.एस. सेल व पोलीस हवालदार अनिल धनबर पो.स्टे. अकोट फाईल यांनी काम पाहले.

टिप्पण्या