political-news-akola-vba-mva: शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही युतीचा प्रयत्न करू- ॲड. प्रकाश आंबेडकर




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: भारतीय जनता पक्ष आणि जातीयवाद रोखण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी सोबत युतीचा प्रयत्न करू तसेच महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र लढल्यास राज्यात 40 पेक्षा जास्त जागा मिळतील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यातील पत्रकार परिषदेत केले.




महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांच्यात बोलणी सुरूच आहे, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. वंचित बहुजन आघाडी कडून महाविकास आघाडीला काही सूचना करण्यात आल्या होत्या त्यामध्ये 48 उमेदवारापैकी 15 उमेदवार हे ओबीसी प्रवर्गातील असावे,  3 उमेदवार हे अल्पसंख्यांक समाजाचे असावे, अशी सूचना होती. तिसरी सूचना ही कंडीशन संदर्भात आहे असं भासविण्यात येत आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, सेक्युलर मतदारांना आश्वासित करण्यासाठी घटक पक्षांनी असे जाहीर करावे की,  आम्ही भविष्यात बीजेपी सोबत युती करणार नाही. घटक पक्षाला शक्य असेल तर त्यांनी तसा लेखी मसुदा युतीच्या वेळेस जाहीर करावा म्हणजे सेक्युलर मतदारांना खात्री होईल आणि त्यांचा विश्वास बसेल. 



ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले की,  सध्या महाविकास आघाडीतील काँग्रेस - शिवसेना यांच्यात 15 जागेवरून तर शिवसेना-  राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात 9  जागेवर घमासान सुरू आहे. 6 तारखेपर्यंत महा विकास आघाडीतील या पक्षांनी तोडगा काढून  आपला अंतिम निर्णय जाहीर करायला पाहिजे तसेच शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही युतीसाठी प्रयत्न करू असेही अँड आंबेडकर यांनी  स्पष्ट केले. 



आपण जोपर्यंत सूचना देत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या बैठकीत जाऊ नये असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी पदाधिकाऱ्यांना दिला होता. तर ही सूचना आमच्या पक्षात भांडण होऊ नये म्हणून दिली असल्याचं स्पष्टीकरण आंबेडकरांनी दिली. महाविकास आघाडीत अनेक जागांवरून वाद सुरू आहेत अस ही आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडी हे निमंत्रक आहे की घटक आहे, याबद्दल आम्हाला पण संभ्रम आहे असा प्रश्नही आंबेडकरांनी उपस्थित केला. वंचितने वर्धा लोकसभेचा उमेदवार जाहीर अध्यापही केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

तर मोदींनी अकोल्यात येऊन लढावं आपण तयार आहोत, असं एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणत आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत हसू पिकविला. तर 6 फेब्रुवारीला शरद पवार सोबत मुंबईत बैठकी बद्दल निमंत्रण आले असल्याचं आंबेडकर म्हणाले. मात्र ही बैठक मुंबई बाहेर असल्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.





पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, महासचिव मिलिंद इंगळे, मीडिया प्रमुख ॲड. नरेंद्र बेलसरे, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव , महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, महानगर कार्याध्यक्ष मजहर खान, माजी मनपा गटनेते गजानन गवई व पराग गवई यांची उपस्थिती होती.




टिप्पण्या