political-maharashtra-VBA-akl: बंदद्वार चर्चेत रचला गेला संविधान बदलविण्याचा घाट - प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: केंद्रातील सरकार व त्यांचे पाठीराखे मोदी यांच्या नेतृत्वातच संविधान बदलण्याचा घाट रचत आहे. नुकतीच भाजपा आणि आरएसएस यांच्यात एक बंदद्वार चर्चा झाली. या चर्चेमध्ये, जर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा चे 400 पेक्षा जास्त खासदार जिंकले तर एका वर्षात संविधान बदलवू, असे ठरविण्यात आले असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. 


सोमवारी व्हीआयपी सर्किट हाऊस अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. प्रकाश आंबेडकर बोलत होते.




ते पुढे म्हणाले की,  भाजपचे माजी मंत्री, आरएसएस समिती प्रमुख व कर्नाटकाचे अनंत हेगडे यांच्यात नुकतीच बंदद्वार चर्चा झाली. यावेळी त्यांनी ठरविले की,  भाजपा चे 400 पेक्षा जास्त खासदार जिंकले तर एका वर्षात संविधान बदलू,  ही बाब अत्यंत गंभीर आहे.  संविधान बदलण्यासाठी  संतांच्या विचारसरणीचे लोक व काही ओबीसी मंडळींना हाताशी धरून मोदींचा हा प्रयत्न सुरू आहे. असे जर झाल्यास ते अराजकतेला आमंत्रण देणारे असेल आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. संपूर्ण भारत देशाची अर्थव्यवस्था सात ते आठ उद्योजकाच्या घशात उतरविण्यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्न करीत आहे. केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केल्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय आणि सामाजिक अराजकता मोठ्या प्रमाणात वाढणार  आहे.  त्याला आर्थिक स्वरूपात उत्तर देण्याचे काम हे सात ते आठ उद्योजक करतील. या उद्योजकांच्या हातात भारतीय राज्यव्यवस्था गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.



आगामी काळात भारतीय राजकीय व्यवस्थेचे झोनमध्ये विभाजन करून त्या झोनचे नियंत्रण हे विशिष्ट वर्गाला दिले जाईल, अशी शंका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करून यावर केंद्र शासनाने आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी अशी मागणी सुद्धा केली.

भारतीय जनता पार्टी 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याची भाषा करीत आहे. आजची परिस्थिती पाहता त्यांची संख्या 150 च्या वर जाणार नाही. फक्त मतदाराने दिलेले मत त्याला बघता यावे व मतदाराच्या हातूनच ती मतपत्रिका पेटीत जावी असे ते म्हणाले.





पत्रकार परिषदेला डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, बालमुकुंद भिरड, प्रमोद देंडवे, मिलींद इंगळे, ॲड. नरेंद्र बेलसरे,  मजहर खान,  विकास सदांशिव, गोपाल राऊत, गजानन गवई,  किशोर जामनिक, पराग गवई, नितीन सपकाळ आदी उपस्थित होते.



निवडणूक आयोगाकडे सामूहिक तक्रार नोंदवा- ॲड.आंबेडकर यांचे आवाहन 


ईव्हीएम मशीन संदर्भात काँग्रेस निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याची माहिती आहे. मात्र त्यांनी एकट्याने न जाता भाजप विरोधातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम संदर्भात तक्रार नोंदवावी. ईव्हीएमला आमचा विरोध नाही मात्र त्यांनी दिलेले मत त्याला बघता यावे व त्याच्या हातूनच तो कागद मतपेटीत जावा अशी मागणी विरोधकांनी रेटून झाली पाहिजे, असेही ॲड. आंबेडकर म्हणाले. 



ॲड. आंबेडकरांचे मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र


वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना महाविकास आघाडीच्या घडामोडी बद्दल पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र विकास आघाडी यांच्यात जागा वाटपाबाबत एकमत होत नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते याचा विचार करता जागा वाटपाचा तोडगा निघाला पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे. पत्रात त्यांनी असे म्हटले की, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात दहा जागा वरून मतभेद सुरू आहेत असे दिसते. मी या विषयावर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेंनिथला यांच्याशी 9 मार्च रोजी बोललो. तेव्हा त्यांनी सुद्धा हेच सांगितले की, शिवसेना 18 जागा बद्दल आग्रही आहे आणि त्यांच्या बोलण्यात कुठलाही लवचिकपणा नाही त्यामुळे आम्हालाही चिंता वाटते. मी रमेश चेंनिथाला  यांना असे म्हटले की, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी असे आपण एकत्र येऊ. 

तेव्हा त्यांनी मला सांगितले की, 10 मार्च रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आपल्या सोबत बोलणार आहेत. मात्र अजून पर्यंत बाळासाहेब थोरात यांचा संदेश माझ्यापर्यंत आलेला नाही. भाजप आणि आरएसएस यांचा पराभव करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे. या सर्व घडामोडीची माहिती आपणास व्हावी याकरिता हा पत्र व्यवहार करत आहे.

टिप्पण्या