Lok-Sabha-election-2024-akl: अकोला जिल्हयात 18 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार; लोकसभा व विधानसभा पोटनिवडणूक साठी प्रशासन सज्ज





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : लोकसभा आणि अकोला पश्चिम विधानसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक करिता भारत निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अंतिम मतदार यादी प्रमाणे जिल्ह्यातील 18 लाख 75 हजार 637 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. यंदा 18 ते 19 वयोगटातील 25 हजार 963 नवीन मतदार जोडण्यात आले आहे.



यामध्ये मुलांचा प्रमाण मुलींच्या तुलनेत अधिक आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 2056 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली. यंदा प्रथमच जिल्ह्यात 7 महिला संचालित मतदान केंद्र, 7 युवा संचालित मतदान केंद्रांची तर 6 दिव्यांग संचालित मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. दर वेळी होणाऱ्या मतमोजणीचं ठिकाण सुद्धा यावेळी बदलण्यात आलं आहे. 40 टक्के पेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तीला बेंच मार्ग अपंगत्व आहे, अशा मतदारांना अपंगत्व प्रमाणपत्र सादर करून त्याचप्रमाणे 85 पेक्षा अधिक वय असलेले मतदान केंद्रपर्यंत स्वतः जाऊ शकत नाही, अशा मतदारांना टपाली मतपत्रिकेची किंवा ' होम वोटिंग ' ची सुविधा यावेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये 85 च्यावर वय असलेल्या मतदारांची संख्या 16488 एवढी आहे. निवडणूक शांततेत पार पाडाव्या करिता मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी रविवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.



अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; तसेच अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक  जिल्हाधिका-यांची पत्र-परिषद




06-अकोला लोकसभा मतदार संघाकरीता सार्वत्रिक निवडणूक व 30-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघाकरीता पोट निवडणूक घेण्‍यात येणार असून, सर्व मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्‍यामध्‍ये आपले अमूल्‍य योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.



निवडणूकीसंबंधी नियोजनभवनात पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव व डॉ. शरद जावळे आदी यावेळी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी कुंभार म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार तात्‍काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्‍यात आलेली आहे.




निवडणूक कार्यक्रमांतर्गत 06-अकोला लोकसभा मतदार संघाकरीता सार्वत्रिक निवडणूक व 30-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघाकरीता पोट निवडणूक घेण्‍यात येणार आहे. 


भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे-

कार्यक्रमाचे टप्‍पे

निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्‍द करणे व  नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याचा दिनांक दिनांक 28/03/2024 (गुरुवार)


नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 04/04/2024 (गुरुवार)


ना‍मनिर्देशनपत्र  छाननी करण्‍याचा दिनांक 05/04/2024 (शुक्रवार)


उमेदवारी मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक दिनांक 08/04/2024 (सोमवार)


मतदानाचा दिनांक दिनांक 26/04/2024 (शुक्रवार)


मतमोजणीचा दिनांक 04/06/2024 (मंगळवार)


निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्‍याचा दिनांक 06/06/2024 (गुरुवार)





लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून आढावा




अकोला लोकसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक व अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नोडल अधिका-यांच्या, तसेच कर्मचा-यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना प्रक्रियेची माहिती दिली.




अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्चाची मर्यादा, मतदान प्रक्रिया आदी विविध बाबींची माहिती जिल्हाधिका-यांनी पक्ष प्रतिनिधींना दिली. शासकीय यंत्रणेच्या जबाबदा-या व करावयाची कार्यवाही याबाबत सर्व यंत्रणा अधिका-यांना व कर्मचा-यांना सूचना देण्यात आल्या. आदर्श आचारसंहिता अंमलात आली असून, योजना- कामांचे फलक झाकण्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण व्हावी. निवडणूकीच्या अनुषंगाने सजग राहावे. अनावश्यक रजा टाळाव्यात, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.



मनुष्यबळाचे प्रथम सरमिसळीकरण निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त मनुष्यबळाच्या प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. कुंभार यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.  यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले,  सहायक जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी श्रीमती वाजपेयी आदी उपस्थित होते. 


मतदान यंत्रांचे प्रथम सरमिसळीकरण 19 मार्चला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात येणार आहे. 


शस्त्र वापरावर निर्बंध


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शस्त्र वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री. कुंभार यांनी शनिवारी (16 मार्च) जारी केला. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शस्त्र वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 


 


टिप्पण्या