Crime news: आरोपी हॉटेल संचालकाच्या मागावर पोलीस पथक नागपूरला!





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शुभम डेकोरेटर्सचे संचालक व हॉटेल व्हीएस इम्पेरियलचे वेंडॉर रविंद्र उर्फ रवी शर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणात हॉटेल व्हीएस इम्पेरियलचे संचालक विनोद अग्रवाल यांच्याविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाणे येथे भादंवि कलम 306, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस पथक नागपूर येथे गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.





मानसिक छळ व गार्डनसाठी गुंतवलेले 30 ते 40 लाख रुपये न दिल्याने मानसिक दडपणातून रवींद्र शर्मा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करून शर्मा यांच्या पत्नी आरती शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी हॉटेल व्ही एस इम्पोरियलचे संचालक विनोद अग्रवाल यांच्याविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी फरार झाला होता. आरोपीच्या मागावर पोलीस होते. आरोपी नागपूर येथे असल्याचे कळतात पोलिसांनी शनिवारी आरोपीचा शोध घेत नागपूर गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली.






विनोद महावीर प्रसाद अग्रवाल यांनी रवींद्र मदनलाल शर्मा (शुभम डेकोरेटर्स) यांना हॉटेल व्ही एस येथे अधिकृत व्हेंडर नेमले होते. त्यानंतर शर्मा यांनी या ठिकाणी गार्डन तयार केले. यासाठी सुमारे 30 ते 40 लाख रुपये खर्च रवींद्र शर्मा यांनी स्वतः केला. त्यानंतर शर्मा यांनी त्यांच्या डेकोरेशनसह विविध बाबीवर केलेला खर्च व भाड्याची रक्कम अग्रवाल यांच्याकडे मागितली. परंतु त्यांनी विविध कारणे समोर करून पैसे देण्यास नकार दिला. तसेच अग्रवाल यांनी वाद घातल्याने प्रचंड मानसिक दडपणात आलेल्या रवींद्र शर्मा यांनी जीवन यात्रा संपविण्या सारखे टोकाचे पाऊल उचलले असा आरोप शर्मा यांची पत्नी आरती शर्मा यांनी केला. याबाबत डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी विनोद अग्रवाल यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले करुन तपास हाती घेतला आहे. 

टिप्पण्या