budget-of-zilla-parishad-akola: जिल्हा परिषदचे 38.60 कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर; आरोग्य व लघुसिंचनासाठी अत्यल्प तरतूद




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, महिला, अपंग, विद्यार्थी आणि सर्व घटकांचा विकास करण्यासाठीचा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेचा ३८ कोटी ६० लाख ९० हजार रुपयांचा अर्थसंकल्प जि.प उपाध्यक्ष तथा अर्थ समिती सभापती सुनील फाटकर यांनी सादर केला. गतवर्षीपेक्षा यंदाच्या अंदाजपत्रकात चार कोटींची घट झाली आहे.


जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा छत्रपती राजश्री शाहू महाराज सभागृहात बुधवार २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करून जि.प उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनील फाटकर यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. 


ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने भरीव तरतूद



ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने शेतकरी वर्गाला देखील प्राधान्य दिले असून अनेक शेतीपयोगी साहित्य नव्वद टक्के अनुदानावर देण्याची तरतूद केली. शिवाय महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून सुद्धा स्त्रियांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने अनेक योजना कार्यान्वित केल्या.दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना देखील अनुदान वाटपात तरतूद यंदा वाढविली.दरम्यान समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दुधाळ जनावरे योजना मागासवर्गीय घटकांसाठी राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद उत्पन्न वाढीसाठी मिनिमार्केट देखील बांधण्यात येणार आहे.


सभेला यांची प्रमुख उपस्थिती 

सभेला सभापती आम्रपाली खंडारे, माया नाईक, रिजवाना परविन, योगीता रोकडे, सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने व ठाकरे गटाचे गटनेता गोपाल दातकर, डॉ प्रशांत अढाऊ, पुष्पा इंगळे, काँग्रेसचे चंद्रशेखर चिंचोळकर, भाजपच्या माया कावरे, राष्ट्रवादीच्या किरण अवताडे-मोहोड, तसेच प्रतिभा भोजने, राम गव्हाणकर, संजय अढाऊ, विनोद देशमुख, अनंत अवचार, सुशांत बोर्डे, मीरा पाचपोर, मीना बावणे, वर्षा वझीरे, अर्चना राऊत, स्फूर्ती गावंडे, गोपाल भटकर, सीईओ बी वैष्णवी, यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.



विभागनिहाय अशी केली तरतूद



शिक्षण - ३ कोटी १० लाख १३ हजार

कृषी- १ कोटी २४ लाख ९ हजार

समाजकल्याण-१ कोटी ८२ लाख ७७ हजार

आरोग्य -८७ लाख २० हजार

महिला व बालकल्याण -  १ कोटी ४० लाख १३ हजार

बांधकाम -५ कोटी ४३ लाख ६६ हजार

पाणीपुरवठा -१४ कोटी १७ लाख ३ हजार

लघुसिंचन -३९ लाख ४० हजार

पशुसंवर्धन -९० लाख ८ हजार


आरोग्य व लघुसिंचनासाठी अत्यल्प तरतूद


जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आधीच कोलमडली असताना जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात हा विभाग दुर्लक्षित राहला. यंदाच्या बजेटमध्ये आरोग्यावर केवळ ८७ लाख वीस हजारांची तरतूद करण्यात आली तर लघु सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणारी वाढ पाहता यावर केवळ ३९ लाख ४० हजार एवढाच निधी ठेवण्यात आला.

टिप्पण्या