truck-tanker-drivers-strike : अकोलासह राज्यातील 18 जिल्ह्यांना संपाचा फटका: दुसऱ्या दिवशी अकोल्यातील काही पेट्रोल पंपावर ठणठणाट तर काही ठिकाणी रांगा





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात पेट्रोल टँकर चालकांनी कालपासून बंद पुकारला आहे .या बंदचा फटका वाहनधारकांना बसला आहे. महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांना संपाचा फटका बसला आहे.


अकोला शहरातील उमरी भागात पेट्रोल आणि डिझल साठा संपल्यामुळे या भागातील दोन्ही पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत.




काल सांयकाळपासून अकोला जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या आहेत. उमरी भागातील दोन्ही पेट्रोल पंप आता बंद झाल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर 3 दिवस पुरवण्यात येणारं पेट्रोल - डिझल अचानक लोकांनी गर्दी केल्यामुळे लवकर संपुष्टात येणार असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. अकोला शहरातील पेट्रोल पंपावर काल दुपार पासून गर्दी उसळल्याने आणि नागरिकांनी आपल्या वाहनात अतिरिक्त पेट्रोल भरून घेतल्यामुळे अनेक ठिकाणी ठणठणात निर्माण झाला आहे, तसे फलकही पेट्रोल पंप समोर लावण्यात आले. ही बाब हेरून अनेकांनी आज सकाळपासून गावाबाहेरील पेट्रोल पंपाकडे आपला मोर्चा वळविला. आज सकाळी  शहरापासून जवळ असलेल्या गावातील पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केलेली दिसून आली.





दरम्यान याबाबत पेट्रोल पंप मालक संचालक संघटनांनी अद्याप कोणतीच भूमिका स्पष्ट केली नसल्याने पेट्रोल पेट्रोल पंप 3 दिवस बंद राहणार अशी अधिकृत माहिती नाही. मात्र संपामुळे पेट्रोलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पेट्रोल पंप वर गर्दी केली आहे. तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहणार अशी अफवा सुद्धा पसरविण्यात येत असून, अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे.


केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात बदल केल्यानंतर देशभरातील ट्रकचालक आक्रमक झाले आहेत. नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारला आहे.




इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी संप पुकारल्याची बातमी कळताच राज्यातील अनेक पेट्रोलपंपावर वाहनचालकांनी सोमवारी रात्री मोठी गर्दी केली होती. काही पंपांवर ३ किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या.

पेट्रोल मिळेल की नाही या धास्तीने अनेकांनी वाहनांच्या टाक्या फुल करून घेतल्या. परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अकोला शहरातील उमरी भागातल्या  पेट्रोल पंपावर आज सकाळपासूनच नो स्टॉकचे बोर्ड लागल्यामुळे ज्यांच्याकडे पेट्रोल- डिझेल नाही अश्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे आज सकाळपासून अनेक वाहनधारक पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबून आहेत. रिधोरा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत असल्यामुळे वाहनधारकांनी तिकडे गर्दी केली. सकाळ पासून या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी झुंबड उडाली.


संपामुळे 18 जिल्ह्यांना बसला फटका 



दरम्यान, इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी संप पुकारल्यामुळे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, अकोला, नागपूर, अमरावती, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांना  इंधन पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे इंधनटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.





टिप्पण्या