Satyashodhak-marathi-movie: 'सत्यशोधक' चित्रपटाला कर सवलत देण्याबाबत शासन सकारात्मक





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

मुंबई/अकोला:  देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'सत्यशोधक' चित्रपटाला कर सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या.




चित्रपटांवर आकारण्यात येणाऱ्या 18 टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी 9 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असते. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची कर सवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक असून ते भावी पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार असल्याने चित्रपटाला करसवलत दिली पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वित्त, महसूल व सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.



'सत्यशोधक ' चित्रपट  अकोल्याचे प्रा . निलेश रावसाहेब जळमकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेली अप्रतिम कलाकृती. महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनातील संघर्षमय प्रसंगांची वास्तव मांडणी करताना चित्रपटात आलेला ओघवतेपणा  प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले साकारणारे संदीप कुलकर्णी व राजश्री देशपांडे यांचे सह सर्व कलाकार आपापल्या भूमिका जगल्याचा प्रत्यय येतो. माजी आमदार तुकाराम बिडकर, डॉ. सुनील गजरे, सुरेश विश्वकर्मा यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. 



आशयाला साजेसे पार्श्वसंगीत उल्लेखनीय आहे.  दोनशे -पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा काळ चित्रीकरणातून उभा करताना छायाचित्रकार, तंत्रज्ञांनी केलेल्या मेहनतीला तोड नाही. मनाचा ठाव घेणारी कवी किशोर बळी यांची गीते आणि सुश्राव्य संगीत संयोजन तसेच प्रभावी संवाद ही अंगेही तितकीच महत्वपूर्ण आहेत.सर्वांनी अवश्य पहावा असा हा चित्रपट आहे. निर्माते, दिग्दर्शक, प्रमुख व सहकलाकार, गायक, गीतकार, संगीतकार, चित्रीकरण, ध्वनि व प्रकाश योजना, तांत्रिक बाजू सांभाळणारे सर्व तंत्रज्ञ आणि या महत्त्वपूर्ण कलाकृतीमध्ये योगदान आहे. हा चित्रपट पश्चिम विदर्भातील कलाकार व निर्मात्यांनी साकारलेला आहे, हे येथे उल्लेखनीय आहे. चित्रपट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना मोफत दाखवावा, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.





टिप्पण्या