Akola crime: निष्पाप विद्यार्थ्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या- हजारों अकोलेकरांची मागणी





ठळक मुद्दे 

*आमदार नितीन देशमुख यांनी केले मोर्चाचे नेतृत्व 

*शहरात वाढलेली गुन्हेगारी थांबवा 

*खटल्यात उज्वल निकम यांची नियुक्ती करा 

*अकोल्यात निघाला विराट मुकमोर्चा 

*रुग्ण वाहिकेसाठी थांबविला मोर्चा 





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शिक्षण हब म्हणून अकोला शहराला नवी ओळख मिळाली आहे. पश्चिम विदर्भातून अकोल्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात. असाच एक बाहेरगावहून अकोल्यात शिकायला आलेल्या निष्पाप विद्यार्थ्याची गावगुंडांनी नववर्षाचा पहिल्या दिवशी हत्या केली, याचे पडसाद संपूर्ण पश्चिम विदर्भात उमटले आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर वेळीच अंकुश लागावा, यासाठी आज अकोला शहरात विराट मुकमोर्चा निघाला.



विशाल झालटे या विद्यार्थ्याच्या हत्याप्रकरणी गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी आज मंगळवारी उद्धव ठाकरे शिवसेना आणि विद्यार्थ्यांच्या वतीने शहरात मुक मोर्चा काढण्यात आला. या निष्पाप विद्यार्थीच्या हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम नियुक्त करावी,अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीसाठी तसेच शहरात वाढलेली गुन्हेगारी थांबविण्यासाठी संभाजी पार्क ते पोलीस अधीक्षक कार्यालय मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शहरातील पालक, सामाजिक संघटना आणि विद्यार्थी हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मृतक विशाल झाल्टे याच्या वडिलांनी यावेळी केली.  






बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी विद्यार्थी विशाल मधुकर झालटे हा अकोला शहरात खासगी शिकवणी वर्गात शिकायला आला होता. त्याची बहीण व तो अकोल्यात राहायचे. घटनेच्या दिवशी मेसचा डबा आला नाही. त्यात बहिणीला भूक लागली म्हणून तिच्यासाठी काही तरी खायला आणायला तो बाहेर पडला. मात्र  परतताना रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या काही युवकांनी त्याला हेरले आणि त्याची हत्या केली. शहरातील या गुन्हेगारांच्या टोळीने केवळ मित्राच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणुन एका निष्पाप मुलाची हत्या केली, ही घटना अत्यंत विदारक आहे. शहरातील कायद्या सुव्यवस्था ढेपाळली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी केला.





रुग्णवाहिकेसाठी थांबला मोर्चा 

मोर्चा मार्गात नेहरू पार्क पासून गोरक्षण रोडच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवहिकेला मोकळा रस्ता मिळावा, यासाठी मोर्चा काही वेळासाठी थांबविण्यात आला होता. संपूर्ण मार्ग अतिशय शिस्तबद्ध हा मोर्चा निघाला. 












टिप्पण्या