advocate-couple-murder-case वकिल दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन खुन: मुख्य आरोपी तीन साथीदारांसह जेरबंद




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  राहुरी येथील वकिल दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन खुन करणारा सराईत आरोपी त्याचे ०३ साथीदारांसह २४ तासाचे आत जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरने ही यशस्वी कारवाई केली आहे.


अधिकृत सूत्रानी दिलेल्या माहिती नुसार, २५  जानेवारी २०२४ रोजी  राजाराम जयवंत आढाव (वय ५२ वर्षे), मनिषा राजाराम आढाव (वय ४२ वर्षे), (दोन्ही रा. मानोरी, ता. राहुरी, जि अहमदनगर)  हे वकिल दांम्पत्य त्यांचे राहते घरुन राहुरी कोर्टामध्ये गेले होते. परंतु दुपारनंतर त्यांचे नातेवाईकांनी त्यांचेशी संपर्क केला असता त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नसल्या कारणाने लता राजेश शिंदे (वय ३८ वर्षे, रा बाजारपेठ, पानसरे गल्ली, संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरुन राहुरी पोलीस स्टेशन मनुष्य मिसींग रजि. नंबर २६/२०२४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.


राहुरी परिसरामधुन वकिल दांम्पत्य मिसींग झाल्याची घटना घडल्याने राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पो.नि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आढाव वकिल दांम्पत्याचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या.


या आदेशान्वये पो. नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार पो.उपनि. तुषार धाकराव तसेच पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, अमृत आढाव, सागर ससाणे, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, भिमराज खर्से, प्रमोद जाधव, रणजित जाधव, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे, यांचे तीन वेगवेगळे पथक तयार करुन पथकास सुचना देवुन वकिल दांम्पत्याचा शोध घेणे कामी रवाना केले.


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत याबाबत माहिती घेत असतांना, राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयीत कार दिवसा व रात्रीचे वेळी गेलेली असल्याचे दिसुन आले. या कारचा शोध घेत असतांना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशींग (रा. राहुरी) याचे वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकिल दांम्पत्याकडे असल्याचे व सीसी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसुन आलेली संशयीत कार किरण दुशींग वापरत असल्याची माहिती मिळाली.


पोलीस पथकास किरण दुशींग याची मागील गुन्हेगारी पार्श्वभुमी माहित असल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे पुर्ण नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय ३२ वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सखोल व बारकाईने तपास करता त्याने मागील काही दिवसापासुन त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर) , शुभम संजीत महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर) ,  बबन सुनिल मोरे (रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांचे सह कट करुन वकिल दांम्पत्याला कोर्ट केसच्या कामकाजाकरीता बोलावुन घेतले. त्यानंतर त्यांना किरण दुशींग याने स्वतःचे गाडीत बसवुन घरी घेवुन जावुन त्यांचे घरामध्ये दोघांचेही हात पाय बांधुन ठेवुन ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु वकिल दांम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये ५ ते ६ तास त्यांचा छळ केला. त्यानंतर त्यांना वकिल दांम्पत्याचे गाडीमध्ये बसवुन त्यांना मानोरी गावाचे बाहेर घेवुन जावुन रात्रीचे सुमारास दोघांचे डोक्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्या घालुन त्यांचा श्वास गुदमरुन खुन केले बाबत व त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये दगड बांधुन टाकून दिले व त्यानंतर वकिल दांम्पत्याची गाडी राहुरी कोर्ट परिसरामध्ये लावली असल्याचे सांगितले. आरोपीने सांगितलेल्या हकीगतीवरुन खात्री करता उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये वकिल दांम्पत्याचे मृतदेह आढळुन आले आहेत.


त्यादरम्यान  घडलेल्या घटनेबाबत माहिती मिळाल्याने तक्रारदार लता राजेश शिंदे (वय ३८ वर्षे, रा. बाजारपेठ, पानसरे गल्ली, संगमनेर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राहुरी पोलीस ठाणे गु.र.नं. ३०२, ३६३, २०१ भा दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


आरोपी किरण दुशींग याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (वय २३ वर्षे, रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर), शुभम संजीत महाडिक (वय २५ वर्षे, रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी, ता. राहुरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (वय २० वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील  पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेतले असुन त्यांना पुढील तपासकामी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.


किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी खुन, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे  गुन्हे पोलीस स्टेशन संगमनेर तालुका, वावी, नाशिक ग्रा., यवत पुणे ग्रामीण, राहुरी, वडनेर भैरव आदी ठिकाणी दाखल आहेत. 



टिप्पण्या