World Disability Day Special: जागतिक अपंग दिन विशेष: नेत्रहिन राजकुमार देशमुख यांची डोळस कामगिरी; चरणगावातील कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्व




अक्षय काळदाते 

पातुर: लहान-सहान गोष्टींच्या तक्रारी करून किंवा क्षुल्लक कारणे पुढे करून आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढणाऱ्यांसमोर चरणगावच्या जन्मापासून आंधळ्या असलेल्या राजकुमार देशमुख यांनी एक अत्यंत प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. वय वर्षे 60 असलेल्या राजकुमार देशमुख यांचे जीवनातले आतापर्यंतचे कर्तृत्व डोळसांनाही लाजविणारे आहे.

        


हात, पाय, नाक, डोळे, कान, शरीर सर्व काही धडधाकट असूनही गावात टवाळक्या करत फिरणारे किंवा काही काम धंदा न करता विविध प्रकारचे कारणे सांगून, बेरोजगारीचे कारण पुढे करून नशिबाला, कुटुंबीयांना आणि सरकारला कोसणारे अनेक जण आतापर्यंत आपण पाहिले असतील. परंतु जन्मापासून आंधळे असलेले पातूर तालुक्यातील चरणगाव येथील राजकुमार माधवराव देशमुख यांनी आज वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत आपल्या आंधळेपणाची किंवा या आंधळेपणामुळे जीवनात निर्माण झालेल्या कोणत्याही समस्येची कधीही तक्रार न करता अत्यंत सक्षम व समर्थपणे आपल्या संसाराचा गाडा चालविणारे राजकुमार यांनी सुरुवातीला ब्रेड विकण्याचे काम केले. नंतर कधी पेप्सी विकण्याचे तर कधी दूध विकण्याचे काम केले. जे काम मिळेल ते काम करून त्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची रोजी रोटी चालविण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. आपल्या मेहनतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीतून त्यांनी आपला प्रपंच व संसार चालविला. 




राजकुमार देशमुख यांना दोन मुली व एक मुलगा आहे. कुणाचीही मदत न घेता राजकुमार देशमुख यांनी आपल्या स्वकर्तृत्वाच्या जोरावर एका मुलीचा विवाह केला. त्यांची दुसरी मुलगी सरिता अमरावतीच्या कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी महाविद्यालयाच्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना भेटून त्यांची परिस्थिती सांगितली. महाविद्यालयाचे शुल्क भरू शकत नाही परंतु मुलगी हुशार आहे आणि ती अभियांत्रिकीचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करू शकते. हे लक्षात आल्यानंतर अध्यक्षांनी शुल्क भरण्यात सूट दिली. शिक्षणाचा इतर खर्च सरिता शिष्यवृत्तीमधून भागवते.




        

मुलगा पद्माबाई जैन कॉन्व्हेंट आलेगाव मध्ये आठव्या वर्गात शिकत आहे. पद्माबाई जैन कॉन्व्हेंटचे अध्यक्ष अनिल जैन यांनी सुद्धा एक रुपया फी न घेता मोफत शिक्षण देत आहेत. तोच त्यांच्या भविष्याचा आधार आणि जीवनाचा प्रकाश आहे. राजकुमार यांच्या पत्नी लहान-सहान कामे करून आपल्या पतीला प्रपंच चालविण्यासाठी हातभार लावतात. राजकुमार देशमुख आजही दोन्ही डोळ्यांनी आंधळे असतांना जमेल ते काम करून दोन पैसे मिळविण्याचे काम करतात. त्यातून ते आपल्या मुलाच्या शिक्षणाचा आणि मुलीच्या शिक्षणाचाही खर्च भागवतात. दोन्ही डोळ्यांनी अंध आणि वय वर्षे साठ असतांनाही त्यांच्यातील जगण्याचा उत्साह आणि मिळेल ते काम करण्याची धडपड पाहता डोळसांनाही लाजवेल. 




दोन्ही डोळ्यांनी आंधळे असलेल्या राजकुमार यांनी एक वेळ कोणाचा आवाज ऐकला तर दोन-चार महिन्यानंतर सुद्धा ते त्या व्यक्तीला आवाजावरून ओळखतात. त्यांच्या संपर्कात असलेल्या किंवा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवाजावरून ते ओळखतात. स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांची धडपड आणि तळमळ पाहता कधी नशिबाला तर कधीच सरकारला कोसणाऱ्या डोळसांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असेच त्यांचे कर्तृत्व आहे. आज जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने त्यांच्यापासून डोळसांनी प्रेरणा घ्यावी एवढेच.

टिप्पण्या