walkathon-child-rights-akola: बालकांच्या हक्कासाठी चालली हजारो पावले!



ठळक मुद्दे 

तिक्ष्णगत संस्था तथा बालहक्क संरक्षण आयोगाच्यावतीने आयोजित ऐतिहासिक वॉकेथॉनला उदंड प्रतिसाद


तिक्ष्णगत प्रिमीयर लीगची शानदार सुरुवात





भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला : बालकांवरील अन्याय, अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि समाजात बालकांप्रति संवेदना जागृत करण्यासाठी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी आणि बालहक्क संरक्षण आयोग, मुंबईच्या वतीने रविवार, १० डिसेंबर रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक वॉकेथॉन उपक्रमाला आबालवृद्धांचा उदंड प्रतिसाद मिळाला. बालकांच्या हक्कासाठी यावेळी हजारो पावले चालली.




बालकांच्या हक्काच्या जागृतीसाठी रविवारी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी आणि बालहक्क संरक्षण आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरडीजी कॉलेज- सिव्हिल लाइन चौक - पोस्ट ऑफिस - अशोक वाटिका - नेहरू पार्क चौक आणि पुन्हा आरडीजी कॉलेज या मार्गावर वॉकेथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वॉकेथॉनला लहान मुले, युवक- युवतींसह सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वॉकेथॉनच्या माध्यमातून आम्ही बालकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे मत तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष, प्रख्यात उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुगत वाघमारे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.






तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी, अकोला ही संस्था गेल्या तब्बल वीस वर्षांपासून महिला, बालक आणि उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करीत आहे. याच पाश्र्वभूमीवर भारत सरकारच्या अंतर्गत संस्थेकडे चाईल्ड लाईन या विशेष उपक्रमाचे काम देण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये सुद्धा संस्थेने उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली आहे. गेल्या तीन वर्षांंपासून संस्थेच्या माध्यमातून महिला, बालके तसेच उद्योगांसाठी समाजोपयोगी अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासोबतच क्रीडा आणि मनोरंजनाच्या क्षेत्रामध्येही गेल्या तीन वर्षांपासून संस्था अग्रेसर असून, बालकांच्या विकासासाठी, अकोला जिल्ह्यातून नवे खेळाडू निर्माण करण्यासाठी तिक्ष्णगत महोत्सवाचे आयोजन केले जाते. याच पाश्र्वभूमीवर यावर्षी सुद्धा १० डिसेंबर २०२३ पासून तिक्ष्णगत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवात बालकांच्या अधिकारसंबंधी जनजागृती कार्यक्रमापासून करण्यात आली. यावर्षी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग सुद्धा वॉकेथॉन कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सहभागी झाले आहेत. 




या कार्यक्रमामध्ये मानवाधिकार फोरमचे कुशल जैन आणि त्यांची टीम, श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थिनी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. अकोला येथील वॉकेथॉननंतर मूर्तिजापूर या ठिकाणीसुद्धा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. तेथेही अबालवृद्धांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लगेचच तिक्ष्णगत चषकचे उद्घाटन मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये करण्यात आले. 




कार्यक्रमाचे आयोजक डॉ. सुगत वाघमारे आणि तिक्ष्णगत वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आयोजित वॉकेथॉन कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, आरोग्य विभागाच्या उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगाच्या सायली पालखेडकर तसेच अ‍ॅड. संजय सेंगर, अ‍ॅड. नितीन धूत, अ‍ॅड. अनिता गुरव, राधादेवी गोयंका महाविद्यालयच्या मेंढे, संजय खडसे, जीएसटी असिस्टंट कमिशनर संतोष पोवाराज यांचा समावेश होता. 



कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्रीकांत पिंजरकर, विशाल शिंदे, उमेश शिरसाट, श्वेता शिरसाट, राहुल चौरपगार, सनी वाळके, रोहित भाकरे, राजेश मनोहर, विद्या उंबरकर, मिलिंद इंगळे, पवन कसबे यांनी अथक परिश्रम घेतले.



टिप्पण्या