solar-project-paras-akola-dist: पारसवसियांचा सौर प्रकल्पाला विरोध; विस्तारित औष्णिक वीज प्रकल्पाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  जिल्ह्यातील पारस येथील सौरऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला असून पारस येथील विस्तारित औष्णिक वीज प्रकल्पाच्या मागणीसाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालया समोर सर्वपक्षीय एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारण्यात आले होते.




पारस येथे सर्वप्रथम १९६३ साली ६५ मेगा वॅटचा औष्णिक विद्युत प्रकल्प सुरु करण्यात आला. यानंतर येथील विस्तारित औष्णिक विद्युत प्रकल्पकरीता आवश्यक असलेल्या सर्व सोयी- सुविधा पाहता १९९९ साली याचं ठिकाणी २५० मेगा वॅटच्या २ औष्णिक विद्युत प्रकल्पाला मंजुरी मिळाली. २००२ मध्ये पुन्हा ६६० मेगा वॅटचा विस्तारित औष्णिक विद्युत प्रकल्पास मंजुरी मिळाली. असे एकूण १२२५ मेगा वॅटचा औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी २००९ साली ३७२ एकर शेतजमीन शेतकऱ्यांकडून शासनाने संपादित केली होती. तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे मंजूर झालेला ६६० मेगा वॅटचा विस्तारित औष्णिक प्रकल्प पारस येथून चंद्रपूर शहरात स्थानांतरण केलं, व या बदल्यात पारस येथे सौर ऊर्जा प्रकल्प देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णया विरोधात गावकरी आणि कामगार एकत्र आले. याला सर्व राजकीय पक्षाने पाठिंबा दिला.




पारस येथील सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी व औष्णिक वीज प्रकल्पाच्या मागणीसाठी बाळापूर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या वतीने आज सोमवार १९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 




सौर उर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेत्यांसह, कार्यकर्ते शेतकरी, शेतमजूर त्याच प्रमाणे पारस प्रकल्पातील कंत्राटी कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.




यावेळी माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, ज्ञानेश्वर सुलताने यांनी मार्गदर्शन केले. वंचितचे प्रमोद देंडवे, काँगेसचे प्रकाश तायडे, साजिद खान पठाण, महेन्द्र गवई, भाजपाचे जयंत मसने, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ, माजी आमदार बळीराम सिरस्कार, कृष्णा अंधारे ,पुष्पाताई इंगळे, शिवसेना शिंदे गटाचे जावेद जकरिया आदी राजकीय पक्ष नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.






याप्रसंगी सौर ऊर्जा प्रकल्प विरोधी कृती समिती तर्फे श्रीकृष्ण इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन सोपविले. सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून त्याच्या जागी भूसंपादन कायदा प्रमाणे संपादित केलेल्या जमिनीवर ६६० मे वॅट औष्णिक विद्युत प्रकल्प स्थापित करावा, अन्यथा जन आक्रोश व जन भावना लक्षात घेता तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन विवीध पातळीवर करण्यात येईल, अशी चेतावणी निवेदनकर्त्यांनी दिली. निवेदनावर माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास लांडे, प्रहारचे अरविंद पाटील, अभिलाष तायडे आदींच्या  स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या