political literacy: सुदृढ लोकशाहीसाठी राजकीय साक्षरतेची गरज - आमदार सत्यजित तांबे





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: प्रामाणिक व समर्पित लोकप्रतिनिधी निवडून येऊन समग्र विकास साधला पाहिजे ही भावना प्रत्येकाची असते. लोकशाहीचे जिवंत मूल्य रुजवण्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी निवडून येणे ही काळाची गरज आहे. सुदृढ समाज व्यवस्थेत सर्व पॅरामीटर येत असतात. मात्र मतदारांच्या वेगळ्या पद्धतीच्या निवडीमुळे असे लोकप्रतिनिधी निवडून येऊ शकत नाहीत. सबब विकास खुंटतो. म्हणून सुयोग्य व विकासाचा भोक्ता लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी राजकीय साक्षरतेची गरज असल्याचे मत जयहिंद लोक चळवळीचे प्रणेते आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. 



आमदार तांबे यांनी शासकीय विश्रामगृहात शनिवारी पत्रकारांसोबत मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी जयहिंद लोक चळवळीची भूमिका मांडली. 



समाजाच्या सर्वंकष विकासासाठी गत चार महिन्यापासून ही चळवळ राज्यात सुरू झाली आहे. या चळवळीत तरुण युवक, युवती, महिला- पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यात या लोक चळवळीचे जोमाने काम सुरू असून ज्याला ज्या क्षेत्रात काम करायचे असेल त्यांनी त्या क्षेत्रात काम करून ही लोक चळवळ बुलंद करावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 



ते म्हणाले,देशात शैक्षणिक साक्षरता निर्माण झाली, मात्र त्या दृष्टीने वैचारिक साक्षरता निर्माण झाली नाही. अशा साक्षरतेची अधिक उंची उंचावली पाहिजे, युवक शक्तीला  राजकीय साक्षरतेचे ज्ञान व आकलन झाले पाहिजे, यासाठी ही लोक चळवळ सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. 



एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी म्हटले की, राज्यात बेरोजगारी वाढली आहे. औद्योगिक वसाहती केवळ मुंबई, नागपूर ,पुणे पर्यंत मर्यादित आहेत. मात्र अशा औद्योगिक वसाहतीत मनुष्यबळाची कमतरता आहे. कारण पाहिजे तसे उत्पादन अशा वसाहतीत होत नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढायला लागले आहे. हा दृष्टिकोन ही या जय हिंद लोकचळवळीचा आहे. सर्वात मोठे समाजकारण हे राजकारण असून युवकांनी स्वच्छ व सुंदर राजकारणची कास धरून त्यादृष्टीने वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 



पूर्वी महाविद्यालयाच्या निवडणुकीतूनच राजकीय नेतृत्व पुढे येत होते. अनेक ख्यातनाम नेते हे याच प्रक्रियेतून पुढे आले आहेत. मात्र अनेक वर्षापासून महाविद्यालयातील निवडणुका या बंद आहेत. त्यामुळे राज्यात महाविद्यालयीन निवडणुका द्वारे येणारे नेतृत्व आता हरवले असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. 



जयहिंद लोक चळवळीची माहिती देताना त्यांनी सांगितले की राजकीय व आर्थिक साक्षरतेवर वर्ग 8, 9, 10 चे विद्यार्थी, महिला बचत गट आदींना सोबत घेऊन प्राशिक्षण शिबिरे प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असून यात सहभागी सर्वांना प्रमाणपत्र बहाल करण्यात येणार आहेत. या ध्रुवीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एक गाव दत्तक घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार तांबे यांनी यावेळी दिली. 





पत्रकार परिषदेत कपिल ढोके, सागर कावरे, अंशुमन देशमुख, स्वप्निल ठाकरे, श्रेयस इंगोले ,निखिल पापडेजा, जावेद पटेल, संतोष ताले आदी युवक उपस्थित होते.

टिप्पण्या