ek-sur-ek-tal-dance-singing : अकोल्यात चार हजार विद्यार्थ्यांचा ‘एक सूर एक ताल’ सामूहिक नृत्य व गायनाचा कलाविष्कार २५ डिसेंबरला






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षि डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता, एकात्मता व मानवतेचा संदेश देणारा ‘एक सूर- एक ताल'  हा चार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला नृत्य व गायनाचा कलाविष्कार होणारा कार्यक्रम सोमवार,  २५ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता लालबहादूर शास्त्री क्रीडांगण अकोला येथे आयोजित केला आहे, अशी माहिती  श्री शिवाजी शिक्षण संस्था (अमरावती) उपाध्यक्ष तथा 'एक सूर-एक ताल' कार्यक्रम समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर यांनी दिली.



शनिवारी हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. गजानन पुंडकर यांनी 'एक सूर-एक ताल' कार्यक्रम आयोजन मागील भूमिका व कार्यक्रम आयोजन संदर्भात सविस्तर माहिती दिली.



श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संलग्न अकोला व वाशिम जिह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ४००० विद्यार्थ्यांच्या सामूहिक नृत्य व गायनाच्या या कलाविष्काराचे  सादरीकरण होणार आहे. एक सूर एक ताल या कार्यक्रमात डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांचे गौरव गीत, ७ गाणी मराठी, २ हिंदी आणि १ बंगाली भाषेतील गाणं विद्यार्थी गाणार आहेत. सोबतच विद्यार्थी यावर सामूहिक नृत्य करणार आहेत. कार्यक्रमाचे माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यात येणार आहे. यादिवशी शाळांना नाताळची सुट्टी असल्याने पालकांनी आपल्या मुलांना कार्यक्रमास पाहण्यास आवर्जून आणावे. अकोलेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. गजानन पुंडकर यांनी   यावेळी केले.





कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ (अकोला) कुलगुरू डॉ.शरद गडाख यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ॲड. गजानन पुंडकर राहतील.  मुख्य अतिथी म्हणुन विधान परिषद सदस्य ॲड. किरण सरनाईक, विधान परिषद सदस्य धीरज लिंगाडे, दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे उपस्थित राहतील. यावेळी संस्थेचे कार्यकारणी सदस्य प्राचार्य केशव गावंडे, स्वीकृत सदस्य डॉक्टर अमोल महल्ले, उपव्यवस्थापक पंडित पंडागळे, शाळा तपासणी अधिकारी प्रकाश अंधारे, शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती सचिव तथा कार्यक्रम नियोजन समिती सदस्य अकोला व वाशिम जिल्हा (एक सूर एक ताल) विजय ठोकळ यांनी दिली.



पत्रकार परिषदेला ॲड. गजानन पुंडकर यांच्यासह नानासाहेब देशमुख, एक सूर एक ताल कार्यक्रम नियोजन समितीचे सचिव मुख्याध्यापक विजय ठोकळ, हि.रा.गवई, प्रा. बबन कानकिरड  उपस्थित होते.



टिप्पण्या