cinematic-kidnapping-case: व्याजाने घेतलेल्या पैश्यांच्या वसुलीसाठी इसमाचे सिनेस्टाईल अपहरण; आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी




भारतीय अलंकार न्यूज 24

पातूर : व्याजाने घेतलेल्या पैश्यांच्या वसुलीसाठी चक्क एका इसमाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आलेगावातून थेट वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील फार्म हाऊसपर्यंत सिनेस्टाईल अपहरण केल्याची ही घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी शनिवारी 9 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस पोलिसांनी अटक केली होती. आरोपीस आज 10 डिसेंबरला पातूर न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.



या घटनेबाबत पीडित अयाजोद्दीन अनिसोद्दीन उर्फ बंडू (48) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ग्राम ईसवी ता. मेहकर जि. बुलडाणा येथील शेख नवाज शेख निजाम यांचेकडून त्यांनी 2019 मध्ये चार टप्प्यात एकूण 4 लाख रूपये 15 टक्के दराने व्याजाने घेतले होते. त्याची परतफेड ते हप्त्यानुसार आजवर करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.‌ पुढे म्हटले आहे की, शुक्रवारी 8 डिसेंबरला दुपारी दोनचे सुमारास त्यांचे मित्र शाम हिवराळे, गोपाल घाईत, सैयद युनुस सैयद युसुफ, शेख सालर शेख बहार यांच्यासोबत भावाकडील गाडी घेऊन चालक इम्रान खान मोबीन खान याचेसह कामानिमित्त जानेफळ येथे गेले होते. दुपारी साडेतीनला अमोल राजपूत यांना भेटून तेथून आलेगावसाठी 6.30 वाजता परतण्यासाठी निघाले होते. दरम्यान, ते देऊळगांव साकरशा, उमरा, मळसूरमार्ग परततांना मळसूर फाट्याजवळ एक गाडी थांबलेली होती. त्यातील शेख नवाज शेख निजाम, रा. ईसवी ता. मेहकर व त्यांचे साथीदार यांनी त्यांचे अपहरण करुन त्यांना गाडीने चौफुलीमार्गे पांगरखेड ता. मेहकर गावाबाहेर नेले. मांगुळ झनकमार्गे त्यांना एका फार्म हाऊसवर नेले. तेथे मला व्याजाचे पैसे परत कर नाही तर उलटा टांगतो, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी साडेसहाला एकाने त्यांना भावाच्या गाडीजवळ मोटर सायकलने नेले. तेथून गाडीने त्यांना रिसोड येथील पोलिस स्टेशनजवळ सोडून दिले. पोलिस स्टेशनला गेल्यानंतर तेथे चान्नीचे ठाणेदार विजय चव्हाण अंमलदार दादाराव आढवू सुनील भाकरे उमेश सांगळे हर्षल श्रीवास महिला पोलीस उज्वला वीटेवाले हे पोलिस पोहचले. त्यांना सर्व हकीकत सांगीतली. त्यानंतर ज्या ठिकाणी अपहरण करून ठेवण्यात आले होते त्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली व तेथून पीडित व आरोपीला ताब्यात घेण्यात आले.



परिसरात खळबळ


अपहरण झालेले अयाजोद्दीन अनिसोद्दीन यांचा भाऊ एजाजोद्दीन अनिसोद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या भावाचे व्याजाने घेतलेल्या पैश्यांसाठी नवाज याने अपहरण करुन त्यांना रात्रभर डांबून ठेवण्यात आले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी


याप्रकरणी पोलिसांनी शेख नवाज शेख निजाम, रा. ईसवी ता. मेहकर यास अटक केली असून आज न्यायालयासमोर हजर केले असता इतर आरोपींचा शोध व अपहरणात वापरलेले वाहन जप्त करण्यासाठी तीन दिवसांची कोठडी मागितली. मात्र न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.



ठाणेदारावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न 


चान्नीचे ठाणेदार विजय चव्हाण, पोलीस अंमलदार दादाराव आढाव, सुनील भाकरे, उमेश सांगळे रिसोडला गेले होते. पीडित बंडूला रिसोड ठाण्यात आणले होते. दरम्यान, ठाणेदार विजय चव्हाण व त्यांची टीम संबंधित ज्या ठिकाणी पीडित याला अपहरण करून डांबण्यात आले होते त्या फार्म हाऊसवर गेली होती. घटनास्थळाची पाहणी करत असताना तेथील एका जणाने ठाणेदारावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र ठाणेदार विजय चव्हाण यांनी पिस्तूल काढताच अज्ञात आरोपीने पळ काढला.

टिप्पण्या