buddy-cop-scheme-in-school: प्रत्येक शाळेत 'बडीकॉप: योजना राबविण्याची गरज : नीलम गोऱ्हे



ठळक मुद्दा 

फेब्रुवारी २०२४ मध्ये विधानपरिषदेचा  शतकोत्तर महोत्सव राष्ट्रपतींच्या उपस्थितीत साजरा होणार



भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला दि. ५:  मुलींची सुरक्षितता महत्वाची असून  विविध कायद्याबाबतची महिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, शाळांमधे तक्रार पेटी उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच, तसेच विद्यार्थ्यांत जाणीव-जागृती करून प्रत्येक शाळा व महाविद्यालयामध्ये एक विद्यार्थिनी, एक विद्यार्थी याप्रमाणे पोलिस कॅडेट म्हणून समाविष्ट असणारी 'बडी कॉप' योजना राबवावी, अशी सूचना  विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी येथे केली.



उपसभापती श्रीमती गोऱ्हे यांनी आज अकोला दौऱ्यात शासकीय विश्रामगृहात पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यावेळी उपस्थीत होते.




महिला अत्याचाराच्या घटनेमध्ये १५ दिवसात चार्ज शिट, विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करीत या केसेस फास्टट्रॅक कोर्टात चालवणे आवश्यक आहे. अशा घटनेतील आरोपीची हिस्ट्री  नोंद करून अशा आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे असेही श्रीमती गोऱ्हे यांनी सांगितले.



शक्ती सुधारणा विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झाल्यानंतर केंद्राकडे पाठवण्यात आले असून याबाबत केंद्राने काही दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. त्यामुळे शक्ती सुधारणा विधेयकाची जनजागृती व केंद्राच्या मंजुरीनंतर प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.



विधान परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त फेब्रुवारी २०२४ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शतकोत्तर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राज्यातील आजी-माजी आमदारांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती उपसभापती श्रीमती गोऱ्हे यांनी दिली. 


शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आजवरच्या विविध 100 प्रस्तावावरील चर्चा याबाबत ग्रंथ ही प्रकाशित करण्यात येणार आहे तसेच दीर्घकाळ विधिमंडळाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.




बैठकीला पोलीस अधीक्षक संदीप घुगे व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.



टिप्पण्या