akola crime: रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करण्याच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला; मलकापुरात राडा, पाच जखमी

   File image 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: खदान पोलीस ठाण्यांतर्गत मलकापूर येथे रविवार रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान वाढदिवसाचा केक कापण्यावरून वाद होवून मारहाण झाल्याची घटना घडली. यामध्ये पाच  जखमी झाले. यामधील एका युवकावर आरोपींनी चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.  जखमी तरुणाला सर्वोपचार रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले.  घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनजय सायरे सहकाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले होते.



वाढदिवस साजरा करण्यावरुन झाला राडा !


3 डिसेंबर रोजी रात्री 08.30 च्या सुमारास मलकापूर चौकात केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांना नागरिकांनी थांबविले. यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. याचे रूपांतर हाणामारीत होवून प्राणघातक हल्ले झाले. यानंतर यातील काही युवकांनी मलकापूर येथील नागरिकांवर  धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला चढविला. एसडीपीओ सुभाष दुधगावकर, खदान पोलिसांचे एसएचओ धनंजय सायरे पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. यांनतर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान गंभीर जखमी युवकाला त्वरित सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. दरम्यान ही घटना जुन्या वादातून घडल्याचेही बोलल्या जात आहे.



शुभम शांताराम वानखडे 28, अमित सुनील गोपनारायण 29, राजू प्रभाकर गोपनारायण 36, पवन मोहन गोपनारायण 27, हीरा कांबळे, सर्व रा. मलकापूर अशी जखमींची नावे आहेत.  



याप्रकरणी खदान पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले असून, इतरांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. प्राणघातक हल्ल्यातील घटनेचा पंचनामा करून रात्री उशिरा पर्यंत खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलिस करीत आहेत. 



अलीकडे तरुणाईचा वाढदिवस रस्त्यावरच साजरा करणे, रस्त्यांवर विनाकारण मोठे फटाके फोडणे ही अकोल्यात एक नवी फॅशन बनली आहे. एवढेच नाही तर तलवार किंवा धारधार चाकूने केक कापून मोठया आवाजात गाणी वाजवून धिंगाणा घालण्याची क्रेझ वाढत आहे. यात बऱ्याच ठिकाणी तरुणींचा सुध्दा सहभाग असतो. या युवक युवतीना नागरिकांनी हटकल्यास त्यांच्याशी हुज्जत घालतात.  अकोला पोलिसांनी यावर नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात याहूनही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टिप्पण्या