akola court : अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या व लहान मुले पळवून नेणाऱ्या कुख्यात चंदऱ्याला 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा





ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: रेल्वे प्रवासादरम्यान भरकटलेल्या अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या आणि लहान मुले पळवून नेण्यात सराईत असलेला कुख्यात सुधाकर ऊर्फ शंकर ऊर्फ चंदऱ्या जंगलूजी उईके याला अकोला न्यायलयाने भारतीय दंड विधान व पॉक्सो कायदाच्या विविध कलम अंतर्गत दोषी ठरवत 20 वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. शर्मा यांच्या न्यायालयाने हा निकाल 30 नोव्हेंबर रोजी दिला.




कोरोना काळात उघडकीस आलेले हे प्रकरण असून चाईल्ड हेल्पलाईनच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला होता. 22 ऑगस्ट 2020 मध्ये लॉकडाउन काळात चाईल्ड हेल्पलाईनचे समन्वयक पद्माकर सदाशिव व त्यांची चमू रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर फेरफटका मारत असताना उईके हा एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसह संशयास्पद स्थितीत मिळून आला होता. रेल्वे पोलिसांना याबाबत सूचना दिल्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे  संशय बळावला. आरोपी सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीला महिला व बालकल्याण समितीसमोर हजर केले असता वैद्यकीय तपासणीअंती 18 ते 19 आठवड्यांची गरोदर असल्याची बाब समोर आली. यामुळे पोलिस उपनिरीक्षक तानाजी बहीरम यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. 



तपासा दरम्यान असे निष्पन्न झाले की, उईके हा शेगाव इथे कचरा गोळा करणे व भीक मागण्याचे काम करीत होता व तिथेच एका पिंपळाच्या पारावर राहत होता. पीडित अल्पवयीन मुलगी वर्ष-दीड वर्षापासून आरोपी सोबत राहत होती. आपल्या बहिणीसोबत पीडिता ही बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी या ठिकाणी जात असताना शेगाव येथे रेल्वे फलाटावर उतरली होती. गाडी सुरू झाल्यानंतर ती परत गाडीमध्ये चढू शकली नव्हती. उईके याने तिला गाठून विश्वासात घेवून त्याच्या सोबत ठेवले. स्वतःसोबत तिलाही तो भीक मागायला लावत होता. या दरम्यान वारंवार आरोपीने  अल्पवयीन पिडीते सोबत शारिरीक संबंध केले. त्यातुन तिला गर्भधारणा झाली.या प्रकरणात सरकार तर्फे एकुण 19 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.



लॉकडाऊनमुळे वैद्यकीय अहवाल व इतर प्राथमिक अहवाल उशीरा प्राप्त झाला. त्या दरम्यान चौकशी करिता ताब्यात घेतलेला आरोपी उइके हा फरार झाला होता. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करीत वर्धा येथून त्याला ताब्यात घेवून चौकशीअंती त्याचेविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यान पीडित मुलीला तिच्या नातेवाइकाच्या स्वाधीन केल्यानंतर तिथे ती प्रसूत झाली. जन्मलेले नवजात बाळ नातेवाइकाच्या मदतीने गैरकायदेशीर मार्गाने दत्तक देण्याचा प्रयत्न देखील झाला होता. परंतू पोलिसांनी हा डाव हाणून पाडला. 


नवजात बाळाला डीएनए चाचणीकरिता अकोला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. रक्त नमुना दिल्यानंतर बाळाला शिशुगृहाच्या स्वाधीन करण्यात आले होते. चाचणीमध्ये आरोपी उईके व पीडिता हे त्या बालकाचे जैविक माता पिता असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. 



उईके हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याला मुले पळविण्याच्या गुन्ह्यात आर्वी न्यायालयाने अडीच वर्षाची शिक्षाही ठोठावली होती. तत्कालीन तपास अधिकारी किरण साळवे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणी दरम्यान प्रयत्न करूनही पीडित मुलगी साक्ष देण्यासाठी न्यायालयासमोर आली नाही. तथापि बोरगाव गोंडी व जामखुटा येथील साक्षीदारांनी या प्रकरणी न्यायालय समक्ष साक्ष दिली. समोर आलेले साक्षपुरावे ग्राह्य धरून सुधाकर ऊर्फ शंकर उईके (रा. लादगड ता. आर्वी ) याला 376 (2) (एन) 376 (3) भादंवि व पोक्सो कायद्याच्या कलम 5 (जे) (2) मध्ये 20 वर्षे कारावास 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्षे अतिरिक्त कारावास 363 कलमाखाली 7 वर्षे कारावास 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली. एकूण 30 हजार रुपये दंड त्याला ठोठावण्यात आला असून दंडाची रक्कम त्याने भरल्यास ही रक्कम पीडिता सापडून न आल्यामुळे सदर बाळाच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. सदर खटल्यात सरकार पक्षाची बाजू अतिरिक्त सरकारी वकील किरण खोत यांनी भक्कम मांडली. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल प्रिया शेंगोकार व रेल्वे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल खोडके यांनी सहकार्य केले.


टिप्पण्या