Agrotech 2023: नैसर्गिक व विषमुक्त शेतीच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे - ना. देवेंद्र फडणवीस

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव व चर्चासत्र कार्यक्रम "ॲग्रोटेक 2023 " चे उद्घाटन




पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शाश्वत शेतीसह आत्मनिर्भरता साध्य होईल - ना. देवेंद्र फडणवीस 



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने मदर डेअरी समवेत सामंजस्य करार करण्यात आला असून त्यासाठी शासनातर्फे 350 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे सांगतानाच नैसर्गिक शेती व  विषमुक्त शेतीच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी प्रयोगशीलता जोपासून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  नामदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.


 


जागतिक हवामान बदलाच्या या कालखंडात शेतीप्रधान संस्कृती लाभलेल्या आपल्या देशातील शेती व्यवसायाने नेत्र दीपक प्रगती केली असून प्रचंड लोकसंख्या आपल्या देशातील जनतेला सकस अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर कृषी निविष्ठा उपलब्ध करून देत  आत्मनिर्भर देश निर्मितीमध्ये  शेतकरी बंधू-भगिनींचे योगदान निश्चितच दखलपात्र असल्याचे देखील  नामदार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. 



डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती उत्सवाच्या प्रित्यर्थ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अकोला यांचे संयुक्त विद्यमाने  27 ते 29 डिसेंबर दरम्यान भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव व चर्चासत्र कार्यक्रम "ॲग्रोटेक 2023 " चे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले.





स्वतंत्र भारताचे प्रथम कृषिमंत्री शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीचे अवचित साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव आणि चर्चासत्र कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेतीतील गुंतवणूक वाढविल्यास उत्पादकता वाढणार असल्याचे स्पष्ट करताना शासनाने गरजांना अनुसरून व शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे  अनेक योजना सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना गावातील प्राथमिक सर्वसेवा सहकारी संस्थाना कृषी व्यवसाय म्हणून  पाठबळ देणे तसेच शेतकरी मार्केटिंग व मार्केट लिंकेजेस निर्माण होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 




शेतकऱ्यांसाठी अखंडित विद्युत पुरवठा व्हावा या दृष्टीने सौर उर्जेचा वापर करून टप्प्याटप्प्यात संपूर्ण विद्युत फिडर सौर उर्जेवर करण्याचे काम सुरू करण्यात आले असून याद्वारे भविष्यात शेतकऱ्यांना वीज पुरवठा प्राप्त होणार असल्याचे देखील ना. फडणवीस यांनी स्पष्ट केले. 





अकोला विद्यापीठाद्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘शेतकरी आयडॉल’ या संकल्पनेचे त्यांनी कौतुक करून शेतकरी सन्मानाच्या दृष्टीने नागपूर येथे महाराष्ट्रातील एकमेव भव्य 'ऍग्रो कन्वेंशन सेंटर' स्थापित करण्याच्या दृष्टीने शासनाद्वारे 380 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.



पुढे बोलताना त्यांनी भाऊसाहेबांनी आयोजित केलेल्या डॉ . पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी आयोजित केलेल्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा विशेषत्वाने उल्लेख करून भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांच्या ऊर्जेतावस्थेसाठी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तसेच शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांना खुली करून देण्यासाठी घेतलेल्या अपरिमित कष्टांचा गौरव करून भाऊसाहेबांना आदरांजली अर्पण केली. अलीकडील काळामध्ये शेतीमधील आव्हाने वाढत असून तसेच शेतकरी अल्पभूधारक झाल्यामुळे  शेतीमधील गुंतवणूक कमी झाल्याचे स्पष्ट करतानाच हवामान बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना भोगावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले . या सर्व बाबी लक्षात घेता बदलत्या जलवायू परिणामांना निष्क्रिय करण्याकरिता व शेतीमध्ये आर्थिक स्थैर्य आणण्याच्या दृष्टिकोनातून वातावरणाला अनुरूप पिक वाणांची निर्मिती करण्याची गरज त्यांनी विशद केली.




कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती दिनानिमित्त कृषी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अकोला यांचे संयुक्त विद्यमाने  27 ते 29 डिसेंबर या कालावधीत  राज्यस्तरीय  भव्य कृषी प्रदर्शनी,  कृषी महोत्सव  व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव व चर्चासत्र कार्यक्रमाचे उद्घाटन आज बुधवार  27 डिसेंबर रोजी  वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते संपन्न झाले. 



या उद्घाटन सोहळ्याचे प्रसंगी अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता आढाऊ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते तर विधान परिषद सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ.विप्लव बाजोरिया , विधान परिषद सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधान परिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, ज्येष्ठ विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, विधानसभा सदस्य आ. हरीश पिंपळे, विधानसभा सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ. रणधीर सावरकर,  विधानसभा सदस्य आ. आकाश फुंडकर, माजी आ. रणजित पाटील, आ. चैनसूख संचेती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे महासंचालक रावसाहेब भागडे  यांचे सह विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्वर वानखेडे, विठ्ठल सरप पाटील, जनार्दन मोगल, केशवराव तायडे,  हेमलता अंधारे, यांचे सह अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  बी. वैष्णवी, अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, विद्यापीठ कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील, विद्यापीठ अभियंता रजनी लोणारे  उपस्थित होते.






विदर्भातील शेतकऱ्यांच्या उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी व एकूणच उत्पन्नासाठी विद्यापीठ प्रभावी रित्या राबवीत असलेल्या विविध अंगी उपक्रम जसे मॉडेल विलेज संकल्पना ओलीत आणि कोरडवाहू शेती पद्धतीचे एकात्मिक शेती मॉडेल, कृषी निविष्ठा विक्री केंद्र, शेतकरी शास्त्रज्ञ मंच, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण प्रगतीसाठी हायटेक एग्रीकल्चर फोरम, उद्योजकता विकास फोरम, आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन फोरम आदी विषयी सविस्तर माहिती विस्तृत करताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी  आपल्या प्रास्ताविक पर भाषणात  शासनाने वसंतराव नाईक कन्वेंशन सेंटरच्या विकासासाठी आणि कृषी महाविद्यालयांच्या उभारणीसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले.




याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाद्वारे शेतकरी हिताच्या राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती विशद केली तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तत्पूर्वी ना. देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते फित कापून तथा स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून तथा दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमांची दिमाखदार सुरुवात झाली. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर ऋणनिर्देश कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोलाचे प्रकल्प संचालक डॉ मुरलीधर इंगळे यांनी आभार मानले.




केवळ विदर्भात नव्हे तर राज्यासह देशभरातील शेतकरी बंधू -भगिनींना, युवक- युवतींना या प्रदर्शनीची ओढ लागलेली असते. यंदा सुद्धा अतिशय भव्यदिव्य प्रमाणामध्ये या राज्यस्तरीय प्रदर्शनी,कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ.शरद गडाख यांचे अनुभवी मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून प्रदर्शनीमध्ये फळबाग, भाजीपाला,फुल शेती व वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी व अवजारे इत्यादी विभागां सोबतच राज्याचे कृषी विभाग इतर कृषी विद्यापीठे, सलग्न कृषी संस्था व  शासनाच्या इतर  विभागांची दालने सजलीआहेत.  शेतकरी बंधूंचे ग्रामीण विकासा संबंधी कृषी संलग्नित व्यवसाय व शेतीपूरक जोडधंदे तसेच कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगा विषयीची दालने  कृषी प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण ठरत आहे.  कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांकरिता प्रेरणादायी ठरत आहे. याशिवाय गट शेती, स्वयंसहायता बचत गटांच्या यशोगाथा, महिला बचत गटांनी उत्पादित केलेले कृषी उत्पादने, शेतकऱ्यांनी तयार केलेले नाविन्यपूर्ण कृषि निविष्ठा इत्यादींची अभिनव दालने प्रदर्शनीचे आकर्षण केंद्र ठरत आहे. या प्रदर्शनीमध्ये 400 हून अधिक दालने असून ही कृषी प्रदर्शनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदपर्वणी ठरत आहे.




निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी आधुनिक शेती व्यवसायातील विविध नावीन्यपूर्ण संधींचे प्रदर्शन या निमित्ताने शेतकरी बंधू-भगिनींना बघावयास मिळणार असून ड्रोन तंत्रज्ञानासह स्वयंचलित यंत्रे -अवजारे,पीक संरक्षणाच्या विविध पद्धती, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या अनेकानेक जाती,फळे- फुले, रानभाज्या आदींचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले आहे. तसेच बचत गटांनी लावलेली खाद्य पदार्थांची स्टॉलमुळे मांडे, बाजरी, ज्वारी भाकरी,बेसन, भरीत, मुगवडे, पराठे आदीं  पदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्यासाठी नागरीक गर्दी करीत आहेत. प्रदर्शनीची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत आहे.






तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह राज्य शासनाचा कृषी विभाग व जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे सर्वच अधिकारी - कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. समस्त शेतकरी बंधू -भगिनी,  कृषीशी निगडित मंडळीं, तरुण युवक - युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थिनीनी या कृषी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा आत्मा समिती अध्यक्ष अजित कुंभार, विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे (अमरावती ) व डॉ. राजेंद्र साबळे (नागपूर) यांनी केले आहे. कृषी प्रदर्शन चे आज पहिलेच दिवशी विदर्भासह राज्यातील इतर जिल्ह्यांमधून शेतकरी बांधवांनी प्रचंड गर्दी करीत प्रगत कृषी तंत्रज्ञान जाणून घेतले.

टिप्पण्या