incident-of-theft-in-patur-akola: पातूरातील चोरीच्या घटनेने खळबळ; व्यापारी विश्वात उलटसुलट चर्चा, हवाला रॅकेट सक्रिय असल्याची कुजबुज

  file image 





भारतीय अलंकार न्यूज 24

पातूर : एका खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या आंगडीया सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यास चोरट्यांनी चांगलाच हात दाखविला.  त्याच्याकडील ऐंशी लाखाची रोकड हातोहात लंपास केल्याची घटना पातूरात रविवारी रात्री घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार सदर रक्कम हवालातील असून, दोन कोटीपेक्षा अधिक रक्कम चोरट्यांनी हातोहात उडविल्याची  कुजबुज सुरू आहे. मर्यादित रोखीपेक्षा अधिक रक्कम हाताळण्यावर बंधन असूनही सदर रक्कम नेण्यात येत असल्याने हवाला रॅकेट सक्रिय असल्याचे अधोरेखित होत आहे.  



याबाबत अमरावती येथील रहिवासी संबंधित युवक राजू प्रजापती यांनी पातुर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार तो 26 नोव्हेंबर च्या रात्री साडेनऊ वाजता एका लक्झरी बसने प्रवास करीत होता. ही बस रात्री साडेनऊ वाजता पातुर जवळील एका ढाब्यावर थांबली. त्या ठिकाणी हा युवक लघुशंकेकरिता खाली उतरला व नंतर ढाब्यावर जाऊन त्यांनी फ्रुटी विकत घेतली व परत बस मध्ये आला. तेव्हा त्याला त्याची बॅग दिसली नाही. या बॅगमध्ये आंगडिया सर्विस चे वेगवेगळे व्यापाऱ्यांचे 80 लाख रुपये होते. तसेच सोबत त्याची छोटी बॅग होती. त्यामध्ये त्याचे आधार कार्ड, वोटिंग कार्ड, एटीएम कार्ड व नगदी सहा हजार रुपये होते. ती सुद्धा गायब झाल्याचे दिसले. असे तक्रारीत नमूद असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एकूण 80 लाख 6 हजार रुपये व कागदपत्रे गहाळ झाल्याने याप्रकरणी या युवकाने पातुर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.




पैसे नेमके कुणाचे?

संबंधित युवकाने पोलिसात तक्रार देताना 80 लाख रुपये हे आंगडिया सर्विस चे वेगवेगळे व्यापाऱ्यांचे असल्याचे म्हटले आहे. परंतु एवढीच रक्कम होती की त्यापेक्षाही जास्त होती ? एव्हढी मोठी रक्कम पाठविण्यासाठी बँकिंग यंत्रणेचा वापर का करण्यात आला नाही ? नक्की काय लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे ? एव्हढी मोठी रक्कम बसमध्ये बेवारस ठेवून फिर्यादी खाली उतरून लघुशंकेसाठी जाणे शंकास्पद नाही का ? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत

परंतु एवढी मोठी रक्कम लक्झरी बसने घेऊन जाण्याचा उद्देश काय ? एवढी मोठी रक्कम बस मधुन नेता येते का आणि ही रक्कम नेमकी कोणाची होती? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सखोल चौकशी नंतरच याबाबतचे खरे गौडबंगाल समोर येऊ शकते.

टिप्पण्या