Youth festival: नृत्यविष्काराने गाजला आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचा दुसरा दिवस




भारतीय अलंकार 24

अकोला:  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विदर्भातील कृषी व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तीन दिवसीय आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे कृषी महाविद्यालय अकोलाच्या  स्वर्गीय के आर ठाकरे सभागृहात आयोजन करण्यात आले असून आज महोत्सवाचे दुसरे दिवशी भारतीय शास्त्रीय नृत्य समूह लोक नृत्य, तथा वैयक्तिक नृत्य प्रकारांनी युवा वर्गातील जोश ओसंडून वाहताना दिसला. तब्बल 18 हून अधिक कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी या युवा महोत्सवात सहभागी होत स्वतःतील सुप्त कला गुणांचा समाजाला परिचय करून देत स्वतःतील व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न केला. 




आज संपन्न झालेल्या नृत्य स्पर्धांमध्ये दिंडी गरबा आदिवासी नृत्य पहावा जोगवा वाघ्या मुरळी इत्यादी नृत्य प्रकार प्रस्तुत करत युवा वर्गाने संपूर्ण सभागृहालाच आपल्या ताब्यात घेतले. ग्रामीण भागातून आलेल्या आणि शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमधील या कलागुणांचा उपस्थित श्रोता वर्गाने भरभरून आस्वाद घेतला. 



विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख तथा अधिष्ठाता कृषी डॉ.श्यामसुंदर माने यांचे मार्गदर्शनात कृषी महाविद्यालय अकोला चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या  युवा महोत्सवाचे आयोजनासाठी महाविद्यालयाच्या जिमखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मोहन तोटावार, कृषी महाविद्यालय अकोला तील प्राध्यापक डॉ. वीरेंद्रसिंह ठाकूर, डॉ. गणेश भगत, डॉ.दिलीप धुळे, डॉ. गिरीश जेऊघाले, डॉ. संजय कोकाटे, डॉ. सारिका मोटे.डॉ. गोदावरी गायकवाड, डॉ. मनोज मारावार, प्रा. ए बी झोपे, डॉ. प्रेरणा चिकटे ताले व इतर प्राध्यापक वृंद अथक परिश्रम घेत आहेत.



तर सभागृहात विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी सह त्यांचे कोच प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होत महोत्सव यशस्वी करीत आहेत.



मानवतेच्या निरामय जगताचे पाईक व्हा -कवी किशोर बळी



शेती शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शेती आणि शेतकऱ्यांची सामाजिक तथा आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःला झोकून देणे काळाची गरज असल्याचे वास्तविक प्रतिपादन चला हवा येऊ द्या तथा हास्य जत्रा फेम सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी, समीक्षक, निवेदक  किशोर बळी यांनी केले. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विदर्भातील कृषी व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तीन दिवसीय आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे कृषी महाविद्यालय अकोलाच्या  स्वर्गीय के आर ठाकरे सभागृहात संपन्न झालेल्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून आपल्या खुमासदार शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 


'भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बंधू भगिनी आहेत' हे नित्याची प्रार्थना आपण वास्तवात आणताना किती प्रामाणिक आहोत याचा विचार करण्यास श्री बळी आणि उपस्थित युवा वर्गाला बाध्य केले. 




आपल्या मार्गदर्शनात सुप्रसिद्ध 'रमश्याचे' रेखाचित्र रेखाटताना सभागृहाला गदगदून हसायला लावणाऱ्या  कवी किशोर बळी यांनी विनोद निर्मिती मागील विविध कारणांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून उहापोह करत उपस्थित विद्यार्थ्यांच्या मनाचा ताबा घेतला. 



कृषी महाविद्यालय अकोलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या उद्घाटन सोहळ्याचे प्रसंगी महाविद्यालयाच्या जिमखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मोहन तोटावार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे, प्रा. मंगला घनबहादुर यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. तर सभागृहात विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी सह त्यांचे कोच प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. 



तीन दिवसीय युवा महोत्सवाच्या संपूर्ण रूपरेषेला आपल्या प्रास्ताविकात सादर करत डॉ. तोटावार यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख तथा अधिष्ठाता कृषी डॉ.श्यामसुंदर माने यांचे मार्गदर्शन तथा सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एक तरी कला गुण जोपासावा असे आवाहन करताना विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखत आपले व्यक्तिमत्व घडवावे यासाठी अनेक अनेक दाखले देत युवा वर्गाला आत्मचिंतनास भाग पाडले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन  डॉ.प्रेरणा चिकटे आणि डॉ. योगिता सानप यांनी केले तर प्राध्यापक डॉ.मंगला घनबहादुर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

टिप्पण्या