modrn-agricultural-technology: अन्नदाता शेतकरी आता ऊर्जा दाता होत आर्थिक संपन्न झाला पाहिजे - ना. नितीन गडकरी




ठळक मुद्दे

उत्पादन खर्चावर आधारित विक्री मूल्य निर्धारणासह व्यावसायिक शेतीला पर्याय नाही - ना. धनंजय मुंडे 


शिवार फेरीसाठी कृषी विद्यापीठात उसळला जनसागर पहिल्याच दिवशी तब्बल 12 हजाराहूनही अधिक शेतकरी बंधू भगिनींनी जाणून घेतले आधुनिक कृषि तंत्रज्ञान!


तीन दिवसीय शिवार फेरीचे  भव्य उद्घाटन संपन्न !





भारतीय अलंकार 24

अकोला: जगाचा पोशिंदा शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिक संपन्न होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरासह बाजारपेठेच्या मागणीनुसार शेती कौशल्य विकसित करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले. 



डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या  स्थापना दिनाचे औचित्य साधत शुक्रवार  29, शनिवार, 30 सप्टेंबर व रविवार 1 ऑक्टोबर 2023 दरम्यान आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीचे उद्घाटन शुक्रवार 29 सप्टेंबर रॊजी केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री  ना.नितीन गडकरी यांचे शुभहस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी उपस्थित शेतकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 



अन्नदाता शेतकरी आता ऊर्जादाता झाला पाहिजे याविषयी आपले स्वतःचे यशस्वी प्रयोग अधोरेखित करीत नामदार गडकरी यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना आर्थिक संपन्नतेचा नवा मूलमंत्रच दिला. खारपानपट्ट्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता येथे झिंग्याची शेती अधिक फायदेशीर ठरेल असे सांगतानाच बांबू शेती सारखे प्रयोगही आता गरजेचे असल्याचे त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना सांगितले. भविष्याचा वेध घेता हायड्रोजनचा वापर येणाऱ्या काळात त्यादृष्टीने तंत्रज्ञान आत्मसात करीत उपलब्ध पशुधनाचा देखील प्रभावी वापर करणे फायदेशीर असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. कृषी विद्यापीठांना आत्मनिर्भर होण्यासाठी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन सुद्धा ना.गडकरी यांनी याप्रसंगी दिले. 





शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि काळ सुसंगत शेतीतील बदलांसह अपारंपारिक स्त्रोतांचा  प्रभावी वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री  ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव आणि कौशल्य आधारित व्यावसायिक शेतीचा प्रभावी वापर यावर आपले अभ्यासपूर्ण विवेचन नामदार मुंडे यांनी याप्रसंगी केले सर्वार्थाने सुखी संपन्न होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगत नामदार मुंडे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना आश्वस्त केले. 






या शुभप्रसंगी अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ,  डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे चे महासंचालक रावसाहेब भागडे,  विधान परिषद सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ.विप्लव बाजोरिया, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, विधान परिषद सदस्य आ.वसंत खंडेलवाल,  विधान सभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ. रणधीर सावरकर, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील, जनार्दन मोगल, केशवराव तायडे,  हेमलता अंधारे, डॉ. वाय जी प्रसाद संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ अभियंता  रजनी लोणारे, विद्यापीठ नियंत्रक  प्रमोद पाटील, यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती लाभली होती. 



कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेला माल्यर्पण तथा दीप प्रज्वलनाने सुरुवात झालेल्या या उद्घाटन सोहळ्याचे  प्रास्ताविक तथा स्वागत पर भाषण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. विद्यापीठातील विविध उपलब्धीसह शाश्वत शेती संपन्न शेतकरी संकल्पना वास्तवात आणण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्नांना अधोरेखित करताना कुलगुरू डॉक्टर गडाख यांनी विद्यापीठापद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली व आत्मनिर्भर विद्यापीठ निर्मितीसाठी काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या. भारतीय कृषी क्रांतीचे प्रणेते ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ स्वर्गीय एम एस स्वामीनाथन यांना सभेच्या सुरुवातीलाच दोन मिनिटं मौन श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.उद्घाटन सक्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.किशोर बिडवे यांनी केले तर संचालक विस्तार शिक्षण डॉ.धनराज उंदीरवाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




दरम्यान आज शुक्रवार  29 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासूनच विद्यापीठाचे शेतकरी सदन येथे शेतकरी बांधवांनी नोंदणीस सुरुवात करीत नोंदणी नंतर विद्यापीठाचे वाहनाद्वारे नियोजित 24 संशोधन विभागांना प्रत्यक्ष भेटी देत अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान जाणून घेतले व उपस्थित शास्त्रज्ञांकडून शंका समाधान केले. यंदा प्रथमच अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवाय फेरीचे नियोजन करण्यात आले असून गहू संशोधन विभागाचे 20 एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण 210 विविध पिकांच्या जाती लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया,कडधान्य, तृणधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांचे जाती आदींचा समावेश आहे. तसेच विद्यापीठाचे महत्वाचे तंत्रज्ञान शिफारशी चे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले आहेत.  या प्रक्षेत्रावर शेतकरी बांधवांची अभूतपूर्व गर्दी उसळलेली दिसली. 



   



आज शिवार फेरीच्या पहिल्याच दिवशी 12 हजाराहूनही अधिक शेतकरी बंधू-भगिनींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वसा सोबत नेण्यासाठी गर्दी केली होती. अधिकाधिक शेतकरी बंधू भगिनीनी शिवार फेरीत सहभागी होण्यासाठी कृषि विभाग व इतर संस्था देखील प्रयत्नशील असून शेतकरी बंधू   भगिनी, युवक युवती, विद्यार्थी विद्यार्थिनी, विस्तार कार्यकर्ते आदिनी सहपरिवार शिवार फेरीत सहभागी व्हावे असे आवाहन कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी केले आहे.






एका दिवसभरात संपूर्ण विद्यापीठाचे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी उशीर न करता सकाळी 9 वाजता शेतकरी सदन येथे नोंदणी करून शिवार फेरीसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.   उद्यान विद्या विभाग सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र शेतमाल प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय कापूस संशोधन विभाग लिंबूवर्गीय फळे संशोधन विभाग सोयाबीन प्रक्षेत्र ज्वारी संशोधन विभाग धान्य संशोधन विभाग तेलबिया संशोधन विभाग कोरडवाहू संशोधन विभाग यासह पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग आणि नागार्जुन वनौषधी उद्यानाला शेतकरी बंधू भगिनींची गर्दी झालेली पाहून विद्यापीठातील सर्वांचाच उत्साह द्विगुणीत झाला होता. 



शिवार फेरीचे यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांचे नेतृत्वात सर्व समित्यांचे अध्यक्ष, सदस्य,  यांचे सह विद्यापीठातील सर्वच वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी वर्गाने अथक परिश्रम घेतले.


टिप्पण्या