rain-flood-situation-in-akola: अकोट, तेल्हारासह अकोला शहरात पूर परिस्थिती; 16 नागरिकांना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण




भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. काल शुक्रवारी रात्री पासून आज शनिवार दुपार पर्यंत झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अकोट, तेल्हारासह अकोला शहरात सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.



अकोला शहरा जवळून वाहणाऱ्या विद्रूपा नदीला मोठा पूर आल्याने खडकी भागातील अनेक ठिकाणी या पुराचे पाणी शिरल आहे. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कार्य सुरू केलं आहे. 


"जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकाने आज सकाळपासून तेल्हारा, अकोट तालुक्यासह अकोला शहरातील 16 नागरिकांना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण केलं आहे. स्थलांतरण करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. "


-सुनील कल्ले, 

बचाव पथक प्रमुख 





खडकी भागात पाण्याच्या पातळीत सतत होत असलेली वाढ पाहता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.सध्या अकोला शहरात पावसाने विश्रांती घेतली आहे.



डाबकी रोडवर भर पावसात शिवसेनाचे आंदोलन;संत गजानन महाराज मंदिरा समोर पाणीच पाणी 



अकोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने डाबकी रोडवर श्री गजानन महाराज मंदिर जवळ मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचलेले आहे. तरीही मनपा प्रशासना तर्फे काहीही उपाय योजना येथे करण्यात आलेली नाही. यासाठी आज शनिवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने भर पावसात भाजपा व अकोला मनपा प्रशासना विरोधात घोषणेबाजी करून आंदोलन करण्यात आले.  

गजानन महाराज मंदिर ते सरस्वती किराणा पर्यंतच्या रस्त्याला पाऊस आला की नेहमीच नदीचे रूप प्राप्त होते. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या शेकडो वाहनधारकांना जीव मुठीत घेवून वाहन चालवावे लागते. दुकानदार आणि या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे पाण्यामुळे नुकसान होते. तसेच या परिसरातील आतील मार्गात जागोजागी स्पीड ब्रेकर निर्माण केल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप येते. प्रशासनाने या नागरी समस्यांकडे लक्ष देवून द्यावे, अशी मागणी आंदोलक आणि नागरिकांनी केली.

या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख राजेश मिश्रा, निवासी उपजिल्हा प्रमुख अतुल पवनीकर, उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे, उपशहर प्रमुख गजानन चव्हाण, संजय अग्रवाल,बबलू ऊके, अनिल परचुरे, रूपेश ढोरे,अमित भिरड, विक्की ठाकुर, राजेश कानपुरे, पवन शाईवाले, योगेश गीते, चेतन मारवाल, गणेश बुंदले, सचिन बेतवार, मोनू इंगळे, हेमंत चंगारे, गोटू नाहे, अजय दुबे आदी पदाधिकारी व स्थानिक रहिवासी नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.




नायगाव परिसरात जनजीवन विस्कळित  


शुक्रवारी रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला शहरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. नायगाव परिसरात नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने अतोनात नुकसान झाले आहे.

नायगांव रेलवे मोरी जवळ गुडघ्याच्या वर पावसाचे पाणी साचले आहे. या परिसरातून मुख्य शहरात येण्यासाठी नागरिकांना रेल्वे मोरी खालून येण्याचा एकमेव मार्ग आहे. मात्र येथे पाणी साचल्यामुळे नागरिकाना आपली वाहने जीव मुठीत धरून काढावी लागत आहे. अनेक वाहने याठिकाणी फसली. 

या परिसरातील घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली. काही नागरिकांच्या घरातून भांडी वाहून गेली. धन धान्याचे नुकसान झाले.

नाले सफाई नसल्याने घाण पाणी परिसरात साचल्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. महापालिका प्रशासनाने या गंभीर स्थितीची दखल घेवून त्वरित उपाय योजना करावी. येथील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात या समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी कायम स्वरुपी उपाय योजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.


रेल्वे क्रॉसिंग गेट परिसरातील भागात पाणी 


डाबकी रोड वरील गजानन नगर, आश्रय नगर, पोलीस वसाहत, लक्ष्मी नगर, बालाजी नगर, गुरुदेव नगर आदी रेल्वे क्रॉसिंग गेट परिसरातील भागात तसेच भौरद कडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचले.

या परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले. या भागात असलेल्या दीपक भंसाली यांच्या कारखान्यात पाणी गेल्याने मालाचे नुकसान झाले आहे. नाना मंगलंम कार्यालय जवळील भागात पावसामुळे पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे.



नवीन किराणा बाजारात शिरले पाणी  


वाशिम बायपास परिसरात महानगरपालिका द्वारा नाल्याचे नियोजन नसल्याने हा परिसरात पावसाचे पाणी साचले आहे.

 गंगानगर, नवीन किराणा बाजार आणि शिवसेना झोपडपट्टी मध्ये पावसाचे पाणी भरल्याने नागरिकांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. बायपास चा मोठा नालावर अतिक्रमण करुन काही लोकांनी नालाच गायब केला आहे. हा नाला पुर्ण साफ करणे आवश्यक झाले आहे. आगामी काळात या समस्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावू,असे शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यक नेता जावेद ज़कारिया यांनी सांगितले.





खोळेश्वर भागात पाणी 



खोलेश्र्वर भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या भागाची पाहणी काँगेस नेते मदन भरगड यांनी करुन नागरिकांना दिलासा दिला.













टिप्पण्या