भारतीय अलंकार 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वाशिम बायपास चौक जवळ मुख्य रस्त्यावर शनिवार 17 जूनच्या रात्री 11 ते 11: 30 वाजताच्या सुमारास समाजसेवी प्रा. रणजित इंगळे यांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी ही घटना वाऱ्या सारखी पसरताच शहर हादरून गेले आहे.
शनिवारी रात्री अकरा साडे अकरा वाजताच्या सुमारास एक व्यक्ती वाशिम बायपास वरील एका हार्डवेअर दुकानासमोर रस्त्यावर पडला असून त्याच्या डोक्यावर कोणीतरी जड हत्याराने वार केला असल्याची माहिती जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांना मिळाली. माहिती मिळताच लगेच जुने शहर पोलिसांचा ताफा घडनास्थळी पोहचला. पोलीसांनी तेथे जावून पाहणी केली असता, येथे उभ्या असलेल्या एका ट्रकच्या मागील बाजूस अंधारात एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त माहिती नुसार, हत्या झालेल्या इसमाचे नाव रणजित देवराव इंगळे वय 48 वर्ष राहणार गंगा नगर बायपास असल्याचे समोर आले. मयत हे दोन्ही पायाने अपंग असून अकोल्यातील एस. ए. कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्ती नंतर जुने बस स्थानक जवळ सेतू केन्द्र व साप्ताहिक वृत्तपत्र चालवित होते. तसेच सामजिक कार्यात अग्रेसर होते, अशी माहिती समोर आली.
घटनास्थळी मृतक प्रा. इंगळे यांची दुचाकी गाडी उभी होती. गाडीचे कुठलेच नुकसान झालेले नाही. गाडीवर ठेवलेल्या पिशव्या व पैसे देखील जसेच्या तसेच होते. मृतक रणजित इंगळे यांना मारेकऱ्यांनी मारत घासत ओढून अंधारात रस्त्ताकडेला फेकले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले व जुने शहरचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे हे आपल्या कर्मचाऱ्यान सह घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ञ आल्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. आताच हाती आलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी परिसरातील सिसीटिव्ही तपासले असता हत्यारा कॅमेराबद्ध झाला आहे. मात्र चेहरा अस्पष्ट असल्याचे कळते.
सामाजिक कार्यात अग्रेसर, अनेकांना सर्वोतोपरी मदत करणारे, हसतमुख मनमिळावू असलेले दिव्यांग प्रा.रणजित इंगळे यांच्याशी कोणाचे एवढे शत्रुत्व असेल की, अशा प्रकारे त्यांची भर रस्त्यावर निर्घृण हत्या व्हावी, हा प्रश्न रणजित इंगळे यांच्या परिचितांना पडला आहे. हत्येमागील सूत्रधार कोण आणि कोणत्या हेतूने ही हत्या करण्यात आली, याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
आज दुपारी अंत्ययात्रा
अकोल्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते तथा दैनिक सम्राटचे अकोला जिल्हा प्रतिनिधी पत्रकार प्रा. रणजित इंगळे यांचे दिनांक 17/06/2023 रोजी रात्री 11.35 मि. निधन झाले. त्यांच्या निधनाने फुले शाहु आंबेडकरी चळवळीचे कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे, त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर गंगानगर-1 वाशिम बायपास रोड येथून आज दि 18/06/2023 रोजी दुपारी 2 वाजता निघणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा