Akola crime murder case: अकोला रेल्वे स्टेशन परिसरात कुख्यात गुन्हेगाराची निर्घृण हत्या





भारतीय अलंकार 24

अकोला: अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या कुख्यात गुन्हेगाराची रविवार 12 जूनच्या मध्यरात्रीनंतर तीक्ष्ण शस्त्राने निघृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली. रेल्वे स्टेशन सारख्या गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे शहर हादरले आहे. 



या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.  पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याची परिसरात चर्चा आहे. 




अकोला रेल्वे स्थानक परिसरातील गेट क्रमांक 2 समोर रविवारच्या रात्री 1.30 वाजताच्या सुमारास सराईत गुन्हेगार अनिल लताळ याच्यावर धारधार शस्त्राने वार करुन गंभीररित्या जखमी करुन हल्लेखोर पसार झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 



अनपेक्षित घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. रात्रीच्या प्रवासासाठी आलेल्या प्रवाशांची धावपळ उडाली. परिसरात हजर असलेल्यांनी घाबरून जाऊन प्लॅटफार्म गाठले. दरम्यान पोलिसांना तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रामदास पेठ पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले, तेंव्हा लताळ गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांनी तातडीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.




घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयावरून रात्रीच एकाला ताब्यात घेतले.  या हत्याकांडात एकुण चौघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होते आहे. शहरातील आंबेडकर नगरमधील रहिवासी असलेला अनिल लताळचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असून, त्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजते.



New update 


हत्या केल्यानंतर मुख्य आरोपी रवी ओंकार त्रिपाठी याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, आणि मी एकट्यानेच हा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र  पोलिसांना आरोपी त्रिपाठीच्या जबानीवर संशय आला. यानंतर घटना स्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.  या हत्याकांडात आणखी तीन आरोपींचा सामावेश असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिस निरीक्षक महेंद्र कदम यांनी पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.  या हत्या प्रकरणातील आरोपी सोनू गौतम बनसोडे (20, रा. अकोट फाईल), अमर महेंद्र उज्जैनकर (20, रा. आपातापा रोड) आणि अभिजित संभाजी हांडे (23, रा. लाडीस फाईल) यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.  

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अकोला शहर सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट फाइल  ठाण्याचे पोलीस निरीक्षक तथा रामदास पेठ ठाण्याचे प्रभारी ठाणेदार महेन्द्र कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशिर, प्रशांत इंगळे, अस्लम शहा, गिरीश तिडके, छोटू पवार यांनी कारवाई केली.   



रवी त्रिपाठी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून अनिल लताळची हत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र हत्या का केली, त्यामागील कारण व उद्देश काय आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास  पोलीस करत आहेत.


New update

सर्व आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायलयाने सर्व आरोपींना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


टिप्पण्या