Akola court: अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; सावत्र बापास दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पत्नीला बाहेरगावी पाठवून आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापास अकोला न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावसाची शिक्षा ठोठावली आहे.



शुक्रवार १६.०६.२०२३ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश- २. अकोला शयना पाटील यांनी आरोपी किशोर श्यामराव ढाळे, वय ३५ वर्ष, व्यवसाय- मजुरी, रा. गिता नगर, इमरॉल्ड कॉलनी, जुने शहर, अकोला, ता. जि. अकोला, यास अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी भा.द.वि. कलम ३७६ (२) (फ) अंतर्गत १० वर्ष सक्त मजुरी व रु.२५,०००/- दंड व दंड न भरल्यास १ महीना कैद, अशी शिक्षा ठोठावली 


थोडक्यात हकीकत अशी पोलीस स्टेशन सिव्हील लाईन, अकोला येथे दिनांक २१.०९.२०१४ रोजी आरोपी विरुध्द पिडीतेने रिपोर्ट दिला की, दि. २०.०९.२०१४ च्या रात्री पीडीतेच्या आईला आरोपीने सांगीतले की, त्याच्या मावशीची तब्येत खराब आहे व तिच्या देखभाल करीता भुसावळला जाण्यास सांगीतले. त्यावरुन पिडीतेची आई ही भुसावळ येथे गेली.  त्या रात्री पिडीता व तिच्या २ लहान बहीणी हया घरी झोपल्या होत्या. त्यावेळेस अंदाजे रात्री १२ वाजताच्या दरम्यान आरोपी हा दारु पिवुन आला.  त्याने पिडीतेला पाय दाबायला सांगीतले. अचानक उठुन फिर्यादीला खाली पाडले व तिच्या तोंडावर हात ठेवुन आरोपी सावत्र वडील याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशा रिपोर्ट वरुन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला.


त्यावरुन तत्कालिन तपास अधिकारी, महीला पोलीस पो.उप.नि. के. एम. आतराम, पोलीस निरिक्षक प्रकाश आर. सावकार यांनी तपास करुन आरोपी विरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट केले.


या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ११ साक्षीदाराच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये पिडीता, पिडीतेची बहीण व तीची आई यांचे साक्ष पुरावे महत्वाचे ठरले तसेच इतर साक्षी पुरावे ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा दिली. अतिरिक्त सरकारी वकील  राजेश आकोटकर यांनी प्रभावीपणे सरकार पक्षाची बाजु वि.न्यायालयात मांडली. तसेच पैरवी अधिकारी ए. एस. आय. फझलुर रेहमान काझी व ए.एस.आय. श्रीकांत गावंडे यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या