pushpendra-kulshrestha-akl: अकोल्यात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या जाहीर व्याख्यानाला पावसाची हजेरी; श्रोत्यांची उडाली तारांबळ





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: धर्म शब्दाचा गैरवापर करणाऱ्यांनीच भारताची संस्कृती कमकुवत करुन हानी केली आहे,असे मत आंतरराष्ट्रिय  वक्ते, विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी व्यक्त केले. 



राष्ट्र जागृती मंच अकोलाच्या विद्यमाने मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात रविवारी आयोजित जाहीर व्याख्यानात   पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी राष्ट्रहित प्रबोधन केले. व्याख्यान सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने श्रोत्यांची तारांबळ उडाली होती.


कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले की,संस्कृती आणि सभ्यता वाचवण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. हेच काम आधी झाले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. हा धागा धरुन त्यांनी कुणाचेही नाव न घेता थेट काँगेस पक्षावर टिकास्र सोडले. हिंदुस्थानची ओळख महात्मा गांधींमुळे नाहीतर आचार्य चाणक्य यांच्या मुळे आहे, असे देखील कुलश्रेष्ठ म्हणाले.



पुष्पेंद्र म्हणाले की, हिंदू राष्ट्र आणि हिंदू देवता हे सर्व पक्ष दत्तक घेत आहेत. ७०० वर्षांत तुम्ही पहिल्यांदाच स्वतःला अनुभवत आहात. तुम्ही बदललात तर देशाची व्यवस्थाही बदलते. न्याय व्यवस्थाही बदलत आहे. देशापेक्षा राष्ट्र मोठे असते. देश सीमांच्या आत आहे आणि राष्ट्राच्या सीमांच्या पलीकडे आहे. जे राष्ट्र देशाच्या सत्ताधारी व्यवस्थेवर अवलंबून असते, ते राष्ट्र अधोगतीच असते.  ज्या दिवशी सनातन समाज आपली सामूहिक शक्ती दाखवेल, त्या दिवशी जगातील प्रत्येक शक्ती  नतमस्तक होईल,असा विश्र्वास कुल श्रेष्ठ यांनी व्यक्त केला.  



कुलश्रेष्ठ यांनी राष्ट्र, राष्ट्रीयत्व आणि आव्हाने यावर संपूर्ण भाषण मध्ये भाष्य केले. पावसाने व्यत्यय आणला म्हणुन नाहीतर आज अकोल्यात पाच तास बोललो असतो, असे कुलश्रेष्ठ म्हणाले. अनेक संघटना निर्माण होतात, त्या बिघडतात, पक्ष तुटतात, विघटन होतात, शंभर वर्षाच्या वर त्या टिकत नाहीत. कारण राष्ट्रापेक्षा कोणी वरचढ नसते, असे देखील कुल श्रेष्ठ म्हणाले. 





युवकांना उद्देशून कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले की, तुमची भूमिका आणि क्षमता ठरवा आणि ते काम पूर्ण ताकदीने करा, हा सर्वात मोठा राष्ट्रवाद आहे. 



कुलश्रेष्ठ म्हणाले, भारताचे पहिले पंतप्रधान चाचा नेहरू नव्हते तर सुभाषचंद्र बोस होते. आझाद हिंद फौजेने स्वराज्याची घोषणा केली, स्वतःचे रेडिओ स्टेशन स्थापन केले. ज्याला जगातील ११ देशांनी मान्यता दिली होती. आज फक्त दोनच देशांनी अफगाणिस्तानला मान्यता दिली आहे. कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले की, सुभाषचंद्र बोस यांच्या घराची १९६८ पर्यंत हेरगिरी करण्यात आली होती, त्याचा अहवाल ब्रिटनला पाठवण्यात आला होता.






पावसामुळे तारांबळ 


कुलश्रेष्ठ यांचे भाषण सुरू असताना पावसाने हजेरी लावली. यामुळे श्रोत्यांची तारांबळ उडाली. अनेकांनी आसन सोडणे उचित ठरविले. कार्यक्रम स्थलापासून काढता पाय घेतला. तर काहींनी मेन कापडाचा , कार्यक्रमांचे बॅनरचा आधार घेत आपल्या जागेवरच बसले. मात्र पावसाचा जोर वाढल्याने अखेर भाषण थांबवावे लागले. लोकांनी घरचा रस्ता धरला.




कुलश्रेष्ठ यांच्या डोक्यावर जाहिरात फलक 


पावसाने हजेरी लावल्यामुळे आयोजकांची मोठी पंचाईत झाली. अकोल्यात पाउस येणार याचा पूर्वानुमान असताना सुध्दा आयोजकांनी प्रमुख वक्ता आणि श्रोत्यांसाठी कुठलीच पर्यायी व्यवस्था केलेली नव्हती. यामुळे ऐनवेळी गोंधळ उडाला. अशातच प्रमुख वक्ता पुषपेंद्र कुलश्रेष्ठ यांना पाऊस लागू नये, यासाठी दोन युवकांनी कार्यक्रम स्थळी असलेले याच कार्यक्रमाचे जाहिरात फलक कुलश्रेष्ठ यांच्या डोक्यावर धरुन त्यांचा पावसापासून बचाव केला.





यज्ञ झाला अयशस्वी 


कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान सूरू होण्यापूर्वी आयोजकांनी जाहिर रित्या संगितले की, अकोल्यात अवकाळी पावसाची स्थिती बघता, आजचा कार्यक्रम सुचारू पार पाडण्यासाठी पावसाचा व्यत्यय होवू नये, यासाठी यज्ञ करण्यात आला.मात्र पावसाने हजेरी लावल्याने यज्ञ अयशस्वी झाला असल्याची चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये झाली.



नागरिकांनी घेतला आसरा 


पावसापासून बचाव होण्यासाठी कार्यक्रम स्थळी कुठलीच व्यवस्था नसल्याने नागरिकांनी बाहेर येऊन मिळेल त्या ठिकाणीं आसरा घेतला. कुणी दुकानात, कुणी परिसरातील घरांमध्ये आसरा घेऊन पावसापासून बचाव केला.







टिप्पण्या