Bhendwal Prediction 2023:bul: भेंडवळचे भाकीत 2023:देशाचा राजा कायम; सुरक्षा व्यवस्थेवर ताण, रोगराई, पिकांना अवकाळी पावसाचा फटका



ठळक मुद्दा 

12 वर्षात पहिल्यांदाच घटमांडणी मध्ये विंचू निघाल्याने देशात रोगराईचे वातावरण राहील.






भारतीय अलंकार 24

बुलढाणा: जिल्हातील भेंडवळ गावातील घटमांडणीला 350 वर्षांची परंपरा आहे चंद्रभान महाराज यांनी घटमंडणीला सुरवात केली होती. यामध्ये देशातील येणाऱ्या वर्षाच्या अर्थकारण, राजकारण, हवामान, रोगराई आदी विषयांवर भाकीत करण्यात येते. या भाकितावर शेतकरीच नव्हे तर बियाणे कंपन्यांचे ही लक्ष लागून असते. 



भेंडवळ  गावात अक्षय तृतीयेला शनिवारी संध्याकाळी वाघ महाराजांच्या शेतामध्ये घटमांडणी करण्यात आली. आज रविवार सकाळी 6 वाजता  श्री पुंजाजी महाराज आणि सारंधार महाराज यांनी भाकिते वर्तविली आहेत.



पीक पाणी भाकीत 

यामध्ये पाऊसाची परिस्थिती जून व जुलै महिन्यामध्ये कमी पाऊस राहील. ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असून अतिवृष्टी राहील. पुन्हा सप्टेंबर मध्ये कमी पाऊस राहील. गहू, तांदूळ, ज्वारी आदी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसेल. जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे पेरणी उशिरा होईल. यावर्षी पिकांवर रोगराई राहिल. कापूस पीक मध्यम होईल, कापसात तेजी असेल.ज्वारी सर्वसाधारण राहिल. तूर पीक चांगले असेल. मूग पीक सर्वसाधारण असेल. उडीद मोघम सर्वसाधारण. तीळ सर्वसाधारण मात्र नासाडी होईल.बाजरी सर्व साधारण मात्र नासाडी होईल. तांदुळाचं चांगलं पीक येईल. गहू सर्वसाधारण बाजार भाव तेजीत राहिल. हरभरा अनिश्चित कमी जास्त पीक येईल. मात्र नुकसान सुद्धा होईल. नैसर्गिक आपत्ती येत राहतील. भूकंप प्रमाण जास्त राहील.




राजा कायम 

देशा संबंधी केलेल्या भाकीतनुसार संरक्षण मजबूत राहिल, मात्र शेजारील राष्ट्राच्या कुरघोड्या असतील. देशाची आर्थिक परिस्थिती खालावेल, चढउतार होईल. राजा कायम राहील.राजा कायम आहे, पण राजाला अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच राजा कायम तणावात असेल. राजकीय उलथापालथ होतील.  




देशात रोगराई 

12 वर्षात पहिल्यांदाच घटमांडणी मध्ये विंचू निघाल्याने देशात रोगराईचे वातावरण राहील. 







या घटमांडणीच्या भाकितावर शेतकरी वर्गाचा प्रचंड विश्वास आहे. भाकिता वरून शेतकरी आपल्या पीक पेरणीचे नियोजन करतात.




अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात आली ,या घटामध्ये गहू, ज्वारी, तूर ,उडीद, मूग ,हरभरा, जवस, तीळ, बाजरी, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी ,वाटाणा, मसूर ,आणि करडी असे अठरा प्रकारचे धान्य ठेवण्यात आले. मध्यभागी चार मातीची ढेकले ठेऊन त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवली. घागरीवर पानसुपारी, पुरी ,पापड, सांडोळी , कुरडी , वडे, भजे  खाद्यपदार्थ ठेवण्यात आले. रात्रभर या ठिकाणी कोणीही नागरिक जात नाही, हे विशेष.




आज रविवारी सकाळी या धान्याच्या झालेल्या बदलावरून आणि घटाच्या आतील धान्याचे सूक्ष्म निरीक्षण करून  सारंगधर महाराज व  पुंजाजी महाराज यांनी पिकाचा आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला. 



बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भेंडवळ हे एक लहान गाव आहे. येथे दरवर्षी ही घटमांडणी केली जाते. पूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी ही प्रथा सुरु केली होती. त्यांना निळावंती नावाची विद्या अवगत होती. त्याआधारे ते ही भविष्यवाणी वर्तवित होते. त्यावर शेतकऱ्यांचा विश्वास होता. आणि आजही आहे,असे जुन्या पिढीतील नागरिक सांगतात. तपस्वी चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली ही प्रथा आजही गावात अविरत सुरू आहे. आजच्या काळात तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचं निरीक्षण करून अंदाज जाहीर करतात. या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला, तरीही शेतकरी वर्ग यावर विश्वास ठेऊन शेतीविषयक वर्षभराचे नियोजन करतात. 

 




टिप्पण्या