suicide-case-woman-akl-gmc: शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात महिलेची आत्महत्या प्रकरण पोहोचले सभागृहात; जबाबदार कोण रूग्णालय प्रशासन, संपकरी की कौटुंबिक छळ ?






भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील ढीसाळ व बेजबाबदार कामाच्या पुढे जाऊन तेथे एका महिला रुग्णाने फाशी घेऊन आत्महत्या करण्याची वेळ आली, मृत्यु कधी आणि कसा झाला हे कोड्यात टाकणारे ठरते, या सर्व कारभाराची शासनाने चौकशी व कारवाई करावी अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहात पाँईंट आँफ ईनफाँरमेशन द्वारे मुद्दा उपस्थित करून  केली. 



आमदार रणजीत सावरकर यांनी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात एका रुग्ण महिलेने फाशी घेवून आत्महत्या केली, एवढे मोठे प्रकरणं होवूनही रुग्णालय प्रशासन याबाबात अनभिज्ञ होते, यामुळे रुग्णालयाचा ढसाळ बेजबाबदार कारभाराची चौकशी झाली पाहिजे, असा मुद्दा आज शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केला.



आपल्या नवजात बाळाला रुग्णालयात उपचारासाठी सोडून देवून दोन दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या महिलेने रुग्णालयाच्या आवारातीलच एका गृहात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले.या घटनेमुळे रुग्णालय परिसरामध्ये खळबळ उडाली. सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारातच एका अल्पवयीन मुलीवर तोतया डॉक्टरने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे नुकतेच उघडकीस आले होते. आता या  आत्महत्त्येच्या घटने मुळे रूग्णालय कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे.




वाशिमच्या पंचशील नगर भागातील गोदावरी खिल्लारे नामक 25 वर्षीय विवाहीता प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल होती. तीने एका बालिकेला जन्मही दिला होता. या बालिकेला सीसीयु कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान दोन दिवसापुर्वी आपल्या या नवजात पोटच्या गोळ्याला सोडून जावून गोदावरी बेपत्ता झाली होती. बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकानी कोतवाली पोलिस स्टेशनला याबाबतची तक्रार दिली होती. यानंतर शुक्रवारी सकाळी सफाई कामगार कामासाठी गेला असता त्याला स्वच्छतागृहाचे दार खिळखिळे असल्याचे दिसून आले. त्याने आत जावून पाहले असता, त्याला गळ फास घेतलेल्या स्थितीत एक महिला आढळून आली. अत्यंत कुजलेल्या स्थितीत मृतदेह होता. यावेळी तेथे उपस्थित काही जण पाहण्यासाठी गेले असता सदर महिला ही गोदावरी असल्याचे लक्षात आले. यानंतर लगेच घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलीस स्टेशन ला देण्यात आली. सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास पाठविला. घटनेमागील नेमके कारण समोर आले नसले तरी कौटुंबीक मानसिक छळातून तीने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. 




दरम्यान सासरची मंडळी गोदावरीच्या मृत्युला जबाबदार असल्याचा आरोप गोदावरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला असून पोलिसांनी योग्यरित्या तपास करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गोदावरीचा भाऊ महादेव भोंगळ याने केली आहे. काही दिवसाअगोदरच एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. पाठोपाठ ही घटना घडली असून सर्वोपचार रुग्णालयाचा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.   लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांच्या पार्श्वभूमिवर अकोला पूर्वचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी विधान सभेत प्रश्न उपस्थित केला असून  सर्वोपचार रुग्णालयातील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यान विरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.




दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन मागणीच्या संपात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिकांनी सुद्धा सहभाग घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर संपाचा परिणाम झाला आहे. रुग्णालयातील 235 परिचारिका संपावर गेल्या असल्याने ओपीडी, अतिदक्षता विभागासह इतर विभागातील रुग्णसेवा वर परिणाम झालेला आहे. हे या घटनेतून प्रकर्षाने समोर आले आहे.  




तर दुसरी कडे मृत महिलेचा सासर मंडळी कडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचे देखील समोर आले आहे. महिलेला मुल होत नसल्याने तिचा अतोनात छळ सुरू होता. त्यातच तिने एका मुलीला जन्म दिल्याने सासर कडले नाराज झाले. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मृत महिलेच्या पतीने तिला सांगितले होते की, "मुलगा झाला तरच घरी परतायचे. मुलगी झाली तर घरी यायचेच नाही," कदाचित यासर्व गोष्टींचा तिच्या मनावर परिणाम होवून मानसिक कुचंबणातून महिलेने टोकाचे पावूल उचलले असेल, अशी घटनास्थळी उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती. एकंदरीत याप्रकरणात जबाबदार कोण रूग्णालय प्रशासन, संपकरी की कौटुंबिक छळ…हे पोलीस तपासातून पुढे येईल. 






टिप्पण्या