sorghum-germplasm-day-pkv: ज्वारीसह इतर तृणधान्य पीक शास्त्रज्ञांची आज वाशिमला मांदियाळी !








ठळक मुद्दे 

*कृषी संशोधन केंद्र वाशिम येथे  "ज्वारी शेती" दिनाचे आयोजन आज !


*"Sorghum Germplasm Day"  ज्वारी जननद्रव्याच्या पैदास कार्यक्रमासाठी अकोला कृषि विद्यापीठाचा महत्वाकांक्षी उपक्रम!




भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:जागतिक हवामान बदलाच्या या कालखंडात अनिश्चित पाऊसमान, बाजार भावासह वन्य प्राण्यांच्या प्रकोप आणि अनेक कारणांमुळे ज्वारीसह इतर तृणधान्य पिकांचे क्षेत्र दिवसे गणिक घटक जात आहे. मात्र आता बाजारामध्ये ज्वारी पिकाला मिळणारा अधिकचा दर,विविध मूल्यवर्धित उप- पदार्थ आणि महत्वाचे म्हणजे पशुधनासाठी कडबा यामुळे ज्वारी पिकाकडे शेतकरी बांधवांचे लक्षवेधने काळाची गरज आहे. नेमकी हीच गरज ओळखत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात कृषी संशोधन केंद्र वाशिम येथे अति प्राचीन व दुर्मिळ असलेल्या ज्वारीच्या 25000 हुनही अधिक जणूकांची लागवड करून त्यांचे उत्तम संगोपन केले आहे. हा अतिशय अवघड आणि देशातील पहिलाच प्रयत्न असून सदर ज्वारी पिकाच्या वाहनांची उत्तम वाढ झाली असून पीक सुद्धा बहरलेले आहे. या प्रयोगाविषयी जाणून घेण्यासाठी तथा ज्वारी पिकाच्या विविध जातींचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्वारी तथा तृणधान्य वर्गीय पिकांचे शास्त्रज्ञ आणि वाशीम -अकोल्यासह विदर्भासह महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधून प्रयोगशील शेतकरी बंधू-भगिनी आज सोमवार 13 मार्च रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, वाशिमला भेट देणार आहेत व निमित्त आहे. " राष्ट्रीय स्तरावरील ज्वारी शेती दिन कार्यक्रम ".




विभागीय कृषी संशोधन केंद्र वाशिम येथील प्रक्षेत्रावर आयोजित ज्वारी शेती दिन कार्यक्रमासाठी  जिल्हा परिषद वाशिमचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, स्व.वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी पाटील, यजमान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू. डॉ.शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले तसेच कृषी आयुक्त  सुनील  चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. 



कार्यक्रमाला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहा निर्देशक डॉ.  टी. आर. शर्मा हे प्रमुख अतिथी म्हणून  लाभणार असून राष्ट्रीय पादप अनुवांशिक संसाधन ब्युरो, नवी दिल्लीचे संचालक डॉ. ज्ञानेंद्र प्रताप सिंग,  भारतीय तृणधान्य संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ.  तारा सत्यवती उपस्थित आदी विशेषत्वाने राहणार आहेत. याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे , संचालक शिक्षण डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाचा कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.




आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचे निमित्ताने आयोजित या उपक्रमाचे माध्यमातून तृणधान्य पिकांचे  पुढील विकासासाठी व उपयोगासाठी ज्वारी शेतीदिन कार्यक्रमासाठी देशातील संपूर्ण ज्वारी संशोधक या कार्यक्रमाद्वारे त्यांना आवश्यक ते जननद्रव्यांची निवड करू शकतील व त्याचा उपयोग त्यांच्या ज्वार सुधार कार्यक्रमात करू शकतील.  सध्या महाराष्ट्रातील राहुरी, परभणी, अकोला या केंद्रांसोबतच राष्ट्रीय स्तरावर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना, तामिळनाडू, हरियाणा, उत्तराखंड लुधियाना, पंजाब, सुरत, उदयपूर, राजस्थान या ज्वारी संशोधन केंद्राद्वारे ज्वारी संशोधनाचा  कार्यक्रम राबवला जातो सोबतच आंतरराष्ट्रीय अर्धशुस्क उष्ण कटिबंधीय पीक संशोधन संस्था (ICRISAT), हैदराबाद तसेच भारतीय तृणधान्य संशोधन संस्था (IIMR), हैदराबाद येथेही ज्वारी संशोधनाचे कार्य अविरत चालू असून वरील सर्व शास्त्रज्ञ सदर ज्वारी शेती दिनासाठी हजेरी लावणार आहेत.



अश्या या ज्वारी पिकाचे भारतातील सर्व उपलब्ध जननद्रव्यांचा (Germplasm) संग्रह राष्ट्रीय पादप आनुवांशीक संसाधन ब्यूरो (NBPGR), नवी दिल्ली यांच्या सहाय्याने येथील कृषी संशोधन केंद्र, वाशिम, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला येथे उपलब्ध होऊन त्याची लागवड वाशिम शिवारात करण्यात आलेली आहे. सध्या ही पीक वाणे  कंसात दाणे भरणे ते दाणे परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत.  या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने घेतलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची मूळ संकल्पना माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व नियोजनबद्ध संकल्पनेतून साकार होत असून संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात आकारास येत आहे.




ही सर्व जननद्रव्ये संख्येने फार मोठी असल्यामुळे सोळा एकर शेतामध्ये पसरलेली असून सदर जननद्रव्यांची संवर्धित प्रणाली (Augmented design) मध्ये लागवड करण्यात आलेली आहे. यातील खूप जननद्रव्ये  ही अतिशय दुर्मिळ स्वरूपाची आहेत. त्यासाठी एकंदरीत पूर्ण परिसरात नऊ विभाग करण्यात आलेले असून त्यासोबत ज्वारीचे सध्याचे सहा वैशिष्ट्यपूर्ण वाण हे नियंत्रक वाण म्हणून वापरण्यात आलेले आहेत.  कुठलेही पिकात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर जननद्रव्ये चाचणीचा कार्यक्रम आपल्या देशात प्रथमच होत असल्यामुळे भारतातील हा आगळावेगळा प्रकल्प असून राष्ट्रीय स्तरावरील हा जननद्रव्ये तपासणीचा विक्रम सुद्धा आहे. सदर जननद्रव्याची वेगवेगळ्या अवस्थेतील 26 गुणवैशिष्ट्ये या प्रकल्पात तपासण्यात येणार असून आतापर्यंत त्यामधील वेगवेगळ्या पीक अवस्थेतील नऊ गुणवैशिष्ट्ये तपासणी पूर्ण झालेले आहे.  तसेच उर्वरित सतरा गुणवैशिष्ट्ये हे पिकाच्या पुढील अवस्थेतील असून त्यांचे अवस्थेनुसार पुढील काळात तपासणी कार्य पूर्ण होईल. या जननद्रव्यांमध्ये गोड ज्वारी, एकेरी कापण्याची वैरण ज्वारी, दुहेरी कापण्याची वैरण ज्वारी, हुरडयाची ज्वारी, लाह्यांसाठीची ज्वारी, खरीपाची दुहेरी धान्य व कळब्यासाठीची ज्वारी तसेच रब्बीसाठी वापरल्या जाणाऱ्या ठोकळ मोत्यासारखे दाणे असणारी ज्वारी व सोबतच वेगवेगळ्या रंगाची रंगीत ज्वारी जननदिवे यामध्ये उपलब्ध आहेत. ज्वारी पिकांचा हा वैविध्यपूर्ण खजिना सध्या कृषी संशोधन केंद्र, वाशिमच्या शिवारात डौलाने उभा असून सर्व ज्वारी संशोधनातील ज्वारी पैदासकार तसेच ज्वारी रोगशास्त्रज्ञ व ज्वारी कीटकशास्त्रज्ञ या वाणांची तपासणी व त्याचा आपल्या ज्वारी सुधारणा कार्यक्रमात समावेश करणार असून त्यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे.  




सदर वाण हे मुळात वेगवेगळ्या देशातील तसेच संपूर्ण भारतातील असल्यामुळे या सगळ्या वाणांचा एकाच वेळी एकत्रित अभ्यास या प्रकल्पातून होत असून त्याचा उपयोग ज्वारी संशोधनाची दशा व दिशा बदलण्यासाठी होऊ शकतो. सर्व  वाणांचा पैदास कार्यक्रमातील वेगवेगळ्या पैदास पद्धती वापरून व त्यांचा योग्य समन्वय ठेवून ज्वारीच्या अधिक उत्पादन, अधिक गुणवत्ता व वेगवेगळ्या ताणास अधिक प्रतिबंधक क्षमता असणाऱ्या वाणांची निर्मिती ही काळाची गरज असून त्या दृष्टीने याचा परिणामकारक उपयोग होऊ शकतो व त्यामुळे ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यास याचा निश्चितपणे फार मोठा फायदा होईल. या वाणांची पेरणी ही आठ नोव्हेंबरला घेण्यात आलेली असून मार्च महिन्याच्या शेवटी ते काढण्यास उपयुक्त राहील असा कयास आहे.  



ज्वारी जननद्रव्ये तपासणी कार्यक्रम राष्ट्रीय पादप आनुवांशीक संसाधन ब्युरो (NBPGR), नवी दिल्ली यांनी पुरस्कृत केलेला असून त्यामध्ये भारतीय तृणधान्य संशोधन संस्था (IIMR), हैदराबाद व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला हे या प्रकल्पातील मुख्य भागीदार आहेत.  सदर प्रकल्पात डॉ. सुशील पांडे व डॉ. सुनील गोमासे शास्त्रज्ञ, राष्ट्रीय पादप आनुवांशीक संसाधन ब्युरो, नवी दिल्ली डॉ. आर. बी. घोराडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला तसेच डॉ. भरत गीते व  एस. पी. गुठे शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, वाशिम यांचा प्रामुख्याने या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत वाटा आहे.





राष्ट्रीय स्तरावरील या "ज्वारी शेती दिन" कार्यक्रमाचा परिसरातील शेतकरी बंधू-भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या